मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय १५

बृहत्संहिता - अध्याय १५

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


श्वेतपुष्पे, अग्निहोत्री, मांत्रिक, सूत्रज्ञ, भाष्यज्ञ, रत्नांच्या खाणींवर योजलेले, नापित, ब्राम्हाण, कुंभार, पुरोहित, ज्योतिषी हे कृतिकानक्षत्राचा आश्रय करणारे होत ॥१॥

उत्तमव्रतस्थ, पण्य (विकण्याचा जिन्नस,) राजा, धनवान, योगयुक्त, गाडयांवर जीविका करणारे, गाई, वृषभ, जलचरप्राणी, शेतीलोक, पर्वत, ऐश्वर्ययुक्त हे रोहिणींचा आश्रय करणारे होत ॥२॥

सुगंधद्रव्ये, वस्त्रे, जलोद्भव पदार्थ, पुष्पे, फले, रत्ने, वनवासी,  पक्षी, आरण्यपशु, सोमपान करणारे, गाणारे, कामयुक्त, लेखहर (जासूद,) हे मृगशीर्ष नक्षत्राचा आश्रय करून रहाणारे होत ॥३॥

वध, बंध, अनृत, परस्त्री, चौर्य शाठय (परकार्यविमुख,) भेद, या सर्वांच्याठाईं जे तत्पर ते; तुषधान्य (साळी इत्यादी,) उग्र, मंत्रवेत्ते, वशीकरणादि कर्मवेत्ते, वेतालोत्थापनादि कर्म जाणणारे, हे सर्व आर्द्रानक्षत्राचा आश्रय करणारे होत ॥४॥

सत्यभाषी, दानशील, शुद्ध (परद्रव्यादिकीं अलुब्ध, कुलीन, सुरूप, बुद्धिमान, यशस्वी, द्रव्यवान्. उत्तमधान्य, वणिज (व्यापारी,) सेवक, शिल्पिजन (सुतार, कुंभार इ.,) हे पुनर्वसुनक्षत्राचा आश्रय करणारे होत ॥५॥

यव, गोधूम, शाली, इक्षु, वनें, प्रधान, राजे, सलिलोपजीवी (धीवरादिक,) साधु, यज्ञाच्याठाई आसक्त, पुत्रकाम्यादि इष्टिंच्याठाई आसक्त हे सर्व पुष्यनक्षत्राचा आश्रय करणारे होत ॥६॥

कृत्रिमद्रव्ये (कसबाची मोत्ये इ.,) कंद, मूल, फल, कीट, सर्प, विष, परद्रव्यहरण करणारे, शाली इत्यादि धान्य, सर्वदेहचिकित्सक (वैद्य,) हे आश्लेषांचा आश्रय करणारे होत ॥७॥

धनधान्ययुक्त कोठारे, पर्वतवासी, पितृभक्त, व्यापारी, शूर, मांसभक्षक, स्त्रियांचा द्वेष करणारे मनुष्य हे मघानक्षत्राचा आश्रय करणारे होत ॥८॥

नट, तरुण स्त्री, सर्वजनप्रिय, गायक, शिल्पी (चित्रकारादिक,) पण्य (क्रयविक्रयद्रव्य,) कापूस, लवण, मध, तेल, बालक, हे पूर्वांचा आश्रय करणारे होत ॥९॥

मृदुस्वभाव, शुद्ध, नीतिज्ञ, पाखंडिलोकांत आसक्त, दानरत, शास्त्ररत, शोभनधान्ये (स्वसिकशाली,) अतिधनयुक्त, धर्मानुरत, राजे हे सर्व उत्तरानक्षत्राचा आश्रय करणारे होत ॥१०॥

चोर, हत्ती, गाडयांतून जाणारे, हत्तींचे महात, शिल्पी, पण्य, तुषधान्य, श्रुतयुक्त (बहुश्रुत,) व्यापारी, तेजस्वी, हे हस्तनक्षत्राचा आश्रय करणारे होत ॥११॥

अलंकरणादिकींकुशल, मणिलक्षणज्ञ (रत्नपारखी,) रंगज्ञ (रंगारी,) लेखक, गायक, गंधयुक्तिज्ञ (बहुत सुगंधिद्रव्ये एकत्र करून कांही एक नवीन सुगंध उत्पन्न करणारे,) गणितकुशल, कोष्टी, डोळ्यांचे वैद्य, राजधान्ये (कमोदइ. शाली,) हे चित्रानक्षत्राचा आश्रय करणारे होत ॥१२॥

पक्षी, अरण्यपशु, अश्व, व्यापारी, धान्ये, वातबहुल (हरभरे इत्यादिवातधान्ये,) क्षणिकमित्र, लहानप्राणी, तपस्वी, क्रयविक्रयकुशल हे स्वातीनक्षत्राचा आश्रय करणारे होत ॥१३॥

तांबडी पुष्पे व फले आहेत ज्यांस असे वृक्ष, तिल, मूग, कापूस, माष, चणक, इंद्राचे व अग्नीचे भक्त हे विशाखा नक्षत्राचा आ. करणारे होत ॥१४॥

वलयुक्त, गणमुख्य, साधुरत, गोष्ठिरत, वाहनरत किंवा गमनरत, लोकांमध्ये जे साधु ते, शरद्दतूमध्ये जे धान्यादि उत्पन्न झाले ते सर्व, हे अनुराधानक्षत्राचा आश्रय करणारे होत ॥१५॥

अतिशूर, कुलीन, द्रव्यवान, यशस्वी, परद्रव्यहारक, शत्रू जिंकण्याची इच्छा करणारे राजे,, सेनापति हे ज्येष्ठानक्षत्राचा आश्रय करणारे होत ॥१६॥

औषध, वैद्य, समुद्रायामध्ये मुख्य, पुष्पे, मूले, फले यांचा व्यापार करणारे; बीजे, अतिधनवान, फलमूलांवर वांचणारे (उपजीविका करणारे,) हे मूलनक्षत्राचा आश्रय करणारे होत ॥१७॥

मृदुपदार्थ, जलमार्गाने जाणारे, सत्ययुक्त, शौचयुक्त, धनयुक्त, सेतु (पूल) करणारे, उदकाने वांचणारे, उदकापासून झालेली फले व पुष्पे हे पूर्वाषांढांचा आश्रय करणारे होत ॥१८॥

महामात्र (महात,) मल्ल, गज, अश्व, देवताभक्त, वृक्ष, योद्धे, भोगयुक्त, तेजस्वी हे उत्तराषाढानक्षत्राचा आश्रय करणारे होत ॥१९॥

मायावी, सर्वकाल उद्योगी,  व्यापारादिकर्मांचाठाई समर्थ, उत्साहयुक्त, धर्मयुक्त, भगवद्भक्त, खरे बोलणारे हे सर्व श्रवणनक्षत्राचा आश्रय करणारे होत ॥२०॥

मानरहित, नपुंसक, अस्थिरमित्र, स्त्रियांचा द्वेष करणारे, दानतत्पर, बहुतद्रव्ययुक्त, शांतिपरमनुष्य, हे धनिष्ठा नक्षत्राचा आश्रय करणारे होत ॥२१॥

फांस घालणारे, मत्स्यबंधक, जलोत्पन्नद्रव्ये, जलचरजीव, डुकरे बांधणारे, परीट, मद्यप, पक्षी धरणारे, हे सर्व शततारका नक्षत्राचा आश्रय करणारे होत ॥२२॥

चोर, पशुपालक, क्रूर, कृपण, नीचकर्मत, शठ (अप्रमाणि, दुष्ट, दुराचरणी इ. दुर्गुणी,) धर्मव्रतांनी रहित, बाहुयुद्ध जाणणारे मनुष्य हे पूर्वाषाढांचा आश्रय करणारे होत ॥२३॥

ब्राम्हाण, यज्ञ करणारे, दाते, तपस्वी, द्रव्य व ऐश्वर्य यांनी युक्त, चतुर्थाश्रमी (संन्याशी,) पाखंडी, राजे, उत्तमधान्य (साळी इ,) हे उत्तराभाद्रपदांचा आश्रय करणारे होत ॥२४॥

उदकोत्पन्नद्रव्ये, फले, पुष्पे, लवण, रत्ने, शंख, मोतीं, कमले, सुगंधपुष्पे, सुगंधिद्रव्ये, व्यापारी, नाविक, हे रेवती नक्षत्राचा आश्रय करणारे होत ॥२५॥

घोडे घेणारे, सेनापति, वैद्य, सेवक, अश्व, स्वार, व्यापारी, सुरूप, अश्वरक्षक, हे अश्विनीनक्षत्राचा आश्रय करणारे होत ॥२६॥

रक्तव मांस खाणारे, क्रूर, वध, बंधन, ताडन, करणारे; तुषधान्य, नीचकुलोत्पन्न, नि:सत्त्व हे भरणीनक्षत्राचा आश्रय करणारे होत ॥२७॥

पूर्वा, पूर्वाषा., पूर्वाभा., ही नक्षत्रे ब्राम्हाणांची होत. उत्तरा, उत्तराषा., उत्तराभा., ही क्षत्रियांची होत. रेवती, अनुराधा, मघा, रोहिणी ही शेतीलोकांची (वैश्यांची,) होत ॥२८॥

पुनर्वसु, हस्त, अभिजित, अश्विनी ही नक्षत्रे वैश्यांची होत. मूल, आर्द्रा, स्वाती, शततारका, ही नक्षत्रे होणार्‍या उग्र जातींची होत ॥२९॥

मृगशीर्ष, ज्येष्ठा, चित्रा, धनिष्ठा, ही नक्षत्रे सेवा करणारांची होत. आश्लेषा, विशाखा, श्रवण, भरणी ही नक्षत्रे चंडाल जातीचीं होत ॥३०॥

सूर्य व शनि यांनी भोगलेले, मंगळाने भेदन केलेले व वक्रत्वाने दूषित केलेले, ग्रहण झालेले, उल्केने ताडित, चंद्राने पीडित (चंद्र ज्या नक्षत्राच्या योगतारेचा भेद करील किंवा आच्छादन करील किंवा मधून जाईल किंवा दक्षिण भागाने जाईल) ते नक्षत्र उपहत, असे ऋषि म्हणतात. असे उपहत झालेले नक्षत्र आपल्या पूर्वोक्त वर्गाचा नाश करिते व याहून अन्यप्रकारचे असेल तर वृद्धि करिते ॥३१॥३२॥


॥ इतिनक्षत्रव्यूह:पंचदशोध्याय: ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 18, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP