(हा वातचक्राध्याय आचार्यकृत नव्हे, कारण पूर्वाध्यायातील तेराव्या श्लोकाने वायु सांगितला आहे; परंतु विस्तार यात आहे यास्तव येथे व्याख्या करतो असे टीकाकार म्हणतात)
आषाढपौर्णमासीस पूर्वसमुद्राच्या लाटा हालिवण्याने कंपित असा, चंद्रसूर्यकिरण हेच मानेवरील केस, यांच्या ताडनाने मिश्रित असा पूर्वदिशेचा वारा जर आकाशात वाहील तर सर्वत्र वृष्टि होऊन शरद्दतूतील धान्ये व वसंतऋतूतील धान्ये पृथ्वीवर होतील ॥१॥
या आषाढीयोगी सूर्यास्तसमयी मलयपर्वताच्या शिखराचे ताडन करणारा वारा आग्नेयीकडुन वाहील तर नित्यतप्त, अग्निशिखांनी आलिंगित अशी भूमि स्वशरीरातून निघाले जे ऊष्मे (वाफा) त्यांनीकरून बहुत भस्माते ओकते (सर्व जळून भस्म होते) ॥२॥
या आषाढीयोगी, सूर्यास्तसमयी ताडपत्रे, वेलींचा विस्तार व वृक्ष यांहीकरून वानरांते नाचविणारा, शब्द करणारा, फार कठीण असा दक्षिणवारा सुटेल त सर्व उद्योगांनी उन्नत व हत्तीसारखे ताडवृक्षरूप अंकुशांनी रूद्ध वानरांसारखे मेघ अल्पउदकाचे कण सोडतात (अल्पवृष्टि होते.) ॥३॥
आषाढीयोगी सूर्यास्ती बारीक एलची, रायआंवळी, लवंग यांच्या समुदायाते समुद्रामध्ये कांपविणारा असा निऋतिदिसेकडील वारा सुटेल तर क्षुधा तृषा यांनी मेलेल्या मनुष्यांच्या अस्थिसकलांचा जो बहुत विस्तार तोच आहे परिधानीय वस्त्र जिला अशी भूमि प्रेतस्त्रीसारखी मत्त व तीव्रचापल्ययुक्त अशी होते म्ह० अन्नपाणी नाही यास्तव बहुत लोक मरतात ॥४॥
आषाढीयोगी, सूर्यास्तसमयी धूळ उडविणारा अत्यंत चपल असा वायु पश्चिमेकडून वाहील तर, पृथ्वीवर धान्ये होतील. श्रेष्ठमनुष्यांची युद्धे होऊन जागोजाग वसा, मांस, रक्त यांनी भूमी युक्त होईल. (बहुत युद्धे होतील) ॥५॥
आषाढी पौर्णमासीस सूर्यास्तसमयी फार वेगवान, मेघांचा शत्रू (उडविणारा) गरुडासारखा (वेगाने जाणारा) असा वायव्य दिशेकडून वारा सुटेल तर उदकधारांनी अत्यंत आनंदित, बेडकांच्या शब्दांनी युक्त व बहुत सुखाने धान्य होण्याची चिन्हे समजली आहेत जिची, अशी भूमि भाग्ययुक्त सेनेचेपरी शोभते. असे जाणावे ॥६॥
आषाढीपौर्णमासीस सूर्यास्तकाली अत्यंत सुगंधी, कदंबपुष्पांच्या सुगंधाने सुवासित वायु, उत्तरेकडुन वाहील तर, विजांच्या भ्रमणाने सर्व तेजांचे आकलन (आकार ज्ञान) करणारे व मत्त मेघ उन्मत्तासारखे चंद्रकिरण न दिसणार्या भूमीते उदकधारांना पूर्ण करतील (विजा फार लवून अतिवृष्टि होईल) ॥७॥
आषाढपौर्णमासीस सूयास्तकाली, शीतल, देवांनी घेण्याजोगा, पुन्नाग (सुरंगीचे झाडा) कृष्णागरु, पारिजातक यांच्या पुष्पांनी सुगंधित मोठा शब्द करणारा असा वायु ईशानीकडून सुटेल तर, उदकपूर्ण, धान्ययुक्त, अशी भूमि होईल. धर्मिष्ठ, शरण येणारे आहेत शत्रू ज्यांस, असे राजे ब्राम्हाणादि चारही वर्णांचे रक्षण करतील ॥८॥
॥ इतिवातचक्रंनामसप्तविंशोध्याय: ॥२७॥