११ व्या दिवशीं प्रातःकालीं उठून घराचें सारवण करुन अशौचास स्पर्श केलेलीं वस्त्रें धुतल्यावर सचैल स्नान करावें. स्नानानंतर संध्या पंचमहायज्ञादि कर्मास सपिंडांची शुद्धि होते. ११ व्या दिवशीं संगमकालीं स्नानानें शुद्धि होते, असें कांहीं ग्रंथकार ह्नणतात. ११ व्या दिवशीं पुत्नादि कर्त्यासही पंचमहादि कर्माचा अधिकार प्राप्त होतो. सपिंडांस दर्श व वार्षिक श्राद्धाचा अधिकार प्राप्त होतो. पण नांदीश्राद्ध मात्र ४ पुरुषांपर्यतच्या सपिंडांनीं सपिंडीकरणाचे पूर्वी करुं नये.
नंतर दहा दिवसांचें कर्म करणार्या अमुख्य कर्त्यानें किंवा मुख्य पुत्रादिक कर्त्यानें ११ व्या दिवसाचें वृषोत्सर्गादिक सर्व कर्म करावे. ज्या प्रेताच्या उद्देशानें ११ व्या दिवशीं वृषोत्सर्ग केला जात नाही त्याची शतशः श्राद्धें केली तरी त्याचें प्रेतत्व राहते. ह्या वृषोत्सर्गाचे काली सर्व कर्म स्वतःच करावें. काम्य वृषोत्सर्गाप्रमाणें आचार्यवरण करुं नये. हा वृषोत्सर्ग घरी करुं नये. हा बाराव्या दिवशींही सांगितला आहे. क्वचित् ग्रंथांत मृत दिवशींही सांगितला आहे. तूळ व मेष या संक्रांती दिवशी किंवा बांधवाचे मृतदिवशीं हा करावा. १ वर्षाचे आंत मातापितरांचे वृषोत्सर्गकर्माचे ठायीं वृद्धिश्राद्ध करुं नये. वर्षानंतर करावे.