माता, पिता, हे मरण पावल्यास वर्षपर्यत परान्न, गंधमाल्यादि भोग, मैथुन व अभ्यंगस्नान हीं वर्ज करावींत. तीर्थयात्रा, विवाहादिक, वृद्धिश्राद्धयुक्त सर्व कर्में व शिवपूजा ही वर्ज करावी. संध्या, उपासन, देवपूजा व पंचमहायज्ञ यांशिवाय इतर सर्व कर्में वर्ज करावींत. '' ज्याचे माता, पिता मृत झाले त्याचा देह एक वर्षपर्यंत अशुचि होतो, म्हणून त्यानें कोणतेंही देवकर्म व पितृकर्म करुं नये, '' असें कांही ग्रंथकार म्हणतात. महातीर्थाची यात्रा, उपवास, व्रतें व दुसर्याचें सपिंडीश्राद्ध ही शहाण्या पुरुषानें एक वर्षपर्यंत वर्ज करावींत. यास अपवाद -- '' माता, पिता मरण पावली असतां पत्नी, पुत्र, पौत्र, भ्राता, भ्रातृपुत्र, सून, माता व पितृव्य यांची सपिंडी करावी, इतरांची कधींही करुं नये. अकराव्या दिवसापर्यतचीं श्राद्धें सर्वकाल करावीं. माता, पिता मरण पावलीं असतां इतरांचें पार्वणश्राद्ध करुं नये. मृतांचें गयाश्राद्ध पूर्ण वर्षानंतर प्रशस्त आहे. तीर्थश्राद्ध, गयाश्राद्ध, अन्य पितृश्राद्ध हीं माता, पिता मृत असतां वर्षामध्यें करुं नयेत, असें गरुडपुराणांत आहे. वर्षाती सपिंडी करण्याचा पक्ष असेल तरच हे सर्व निषेध होत; बाराव्या दिवशीं सपिंडी करण्याचा पक्ष असल्यास हे निषेध नाहींत, असें कांही ग्रंथकार म्हणतात. उलट, बाराव्या दिवशीं सपिंडी करण्याचा पक्ष असतांही हे निषेध आहेत, असें दुसरे ग्रंथकार म्हणतात. याची व्यवस्था अशीः-- वृद्धिप्राप्तीवांचून पूर्वी सपिंडीचा अपकर्ष केला तरी प्रेतास पितृत्वाची प्राप्ति वर्षातीच होते. कारण '' सपिंडी केली असतां मनुष्य वर्षानंतर प्रेतदेह सोडून भोगदेहास जातो '' इत्यादि वचन आहे. यावरुन सपिंडी केली तरी वृद्धिसंज्ञक दैवकर्म व पित्र्यकर्म यांस अधिकार नाहीं. वृद्धिनिमित्तानें अपकर्ष केला तरी वृद्धि इत्यादि कर्मास अधिकार आहे. यासाठींच संकटादिक असतां मृतपितृक अपत्याचें संस्काररुप मंगलकार्य व मृतमातापितृक पुत्रानें आपल्या अपत्याचे संस्कारादिक प्रथम वर्षीही करावे, असें कालतत्त्वनिर्णयांत सांगितलें आहे. दर्श, महालय, इत्यादि श्राद्ध व नित्यतर्पण यांचीही व्यवस्था अशीच जाणावी.