ब्रह्मचर्य पाळल्यावर समावर्तन करावें व नंतर स्त्रीपरिग्रह करुन पुत्रोत्पत्ति केल्यावर यज्ञांनीं यजन करावें. यानंतर वानप्रस्थाश्रम स्वीकारुन संन्यास ग्रहण करावा, असा आश्रमांचा समुच्चयपक्ष आहे. ब्रह्मचर्यापासूनच किंवा गृहस्थाश्रमापासून किंवा वानप्रस्थाश्रमापासून संन्यास घ्यावा. तसेंच पुनः अव्रती किंवा व्रती, स्नातक किंवा अस्नातक, विच्छिनाग्नि किंवा अनग्निक असतांही ज्या दिवशीं कडकडीत वैराग्य उत्पन्न होईल त्याच दिवशीं संन्यास ग्रहण करावा. असाही आश्रमाचा विकल्पपक्ष सांगितला आहे. विद्वानानें ब्रह्मचर्यापासून, गृहस्थाश्रमापासून किंवा वानप्रस्थाश्रमापासून संन्यास घ्यावा, अथवा आतुर किंवा दुःखित असतां संन्यास ग्रहण करावा. या वाक्यांत आतुर म्हणजे मरण्यास टेंकलेला व दुःखित म्हणजे चोर, व्याघ्र इत्यादि कांस भ्यालेला असा अर्थ घ्यावा. आतुराच्या संन्यासाविषयीं विधि व क्रिया नाहीं. प्रेष मात्र उच्चारुन संन्यास करवावा. दंडग्रहणादिरुप विविदिषाख्य संन्यासाचा अधिकार ब्राह्मणांसच आहे. पण विद्वत्संन्यासाचा अधिकार क्षत्रिय व वैश्य यांसही आहे. कलियुगांत जो संन्यासाचा निषेध केला आहे तो त्रिदंडि संन्यासपर आहे, असें प्राचीन म्हणतात.