११ व्या दिवशीं शय्यादानाविषयीं विधि करावयास सांगितला आहे तो असाः-- मृतानें उपभोगिलेलीं वस्त्रें, वाहनें, भाजनें, व मृतास इष्ट असलेल्या सर्व वस्तु सिद्ध कराव्या. सुवर्णाचा प्रेतपुरुष करुन शय्यादानकालीं शय्येवर स्थापावा; नंतर पूजा करुन मृतशय्येचें यथाविधि दान करावें. मजबूत काष्ठांची, दृढ हस्तिदंती पट्ट्यांनी युक्त व सुशोभित असलेली भरजरी किनखाप इत्यादिकांनीं अलंकृत केलेली, परांच्या गादींनी आच्छादिलेली, उत्तम प्रकारच्या उशा व गिरद्या यांनीं युक्त असलेली, पलंगपोसानें युक्त व गंध, धूप इत्यादि पदार्थानी सुवासित अशी शय्या करावी. व उशाकडचे भागास घृतानें भरलेला कलश ठेवावा. तांबूल, केशर, बुका, अर्गजा, इत्यादिक सुगंधि चूर्णे. कापूर, कृष्णागरु, चंदन, समई, चर्मी जोडा, छत्री, चवरी, आसन, पात्र व सप्तधान्यें, हे पदार्थ, भक्तीनें पार्श्व भागीं ठेवावे. शय्येवर राहणारास जे दुसरे उपकारक पदार्थ होतील तेही जवळ ठेवावे. झारी, कमंडलु इत्यादिक द्यावें, व पंचरंगी चांदवा वर बांधावा. नंतर नानाविध आभरणांनीं भूषित असें द्विजदांपत्य त्या शय्येवर बसवून त्या स्त्रीपुरुषांची पूजा करुन मधुपर्क करावा. दानाचा मंत्र
'' यथानकृष्ण शयनं शून्यं सागरजातया । शय्या तस्याप्यशून्यास्तु तथा जन्मनि ॥ तस्मादशून्य शयनं केशवस्यशिवस्यच । शय्यातस्याप्यशून्यास्तु तथा जन्मनि जन्मनि ॥ ''
असें म्हणून त्या द्विजदांपत्यांस ते सर्व पदार्थ देऊन नमस्कार करुन विसर्जन करावें. पद्मपुराणांत तर ललाटसंबंधीं अस्थि घेऊन त्यांचें चूर्ण करुन पायसासहित त्याचें द्विजदंपतीस भोजन घालावें हा विधि सनातन आहे असें सांगितलें. पण महाराष्ट्र देशादिकांतील शिष्टांस हें संमत नाहीं. म्हणून त्याचा ज्या देशांत प्रचार असेल तेथें असो. शय्यादानप्रभावानें हा मृत झालेला प्राणी स्वर्ग, इंद्रपुरी, लोकपालांची स्थानें यांचे ठायीं निर्भय होत्साता पृथ्वीवर प्राणी आहेत तोंपर्यत सुखानें राहतो. प्रेतशय्येचा प्रतिग्रह करणारा पुत्रपुरुष होत नाही. म्हणून ती शय्या दान घेतली असतां पुनः संस्कारास पात्र होतो.