प्रत्येक मासाचें १ याप्रमाणें १२ मासांचीं १२ ऊनमासिक, त्रैपक्षिक, ऊनषाण्मासिक व ऊनाद्विक, अशीं १६ मासिकें जाणावींत. यांविषयी दुसरी मतें निर्णयसिंधूंत सांगितलीं आहेत. आतां यांचे काळ सांगतोः-- मासाचे प्रथम दिवशी मासिक करावें. आद्य मासिक ११ व्या दिवशी करावें. १।२ अथवा ३ दिवसांनीं कमी किंवा तिसर्या भागांनी कमी अशा काळीं ऊनमासिक, व ऊनषाण्मासिक हीं करावींत. त्रैपक्षिक तीनपक्षांनीं म्हणजे ४५ दिवसांनीं करावें किंवा ऊनमासिक १२ व्या दिवशीं करावें. त्यांत ऊनमासिक, ऊनषाण्मासिक व ऊनाद्विक या मासिकांचा एक दिवसानें कमी अशा दिवशीं करण्याचा पक्ष असल्यास पंचमीस मृत झालेल्याचें तृतीयेस, २ दिवसांनी अशा दिवशीं करण्याचा पक्ष असल्यास द्वितीयेस, व ३ दिवसांनीं कमी अशा दिवशीं करण्याचा पक्ष असल्यास प्रतिपदेस करावें, असें कांही ग्रंथकार म्हणतात. ऊनषाण्मासिक व ऊनाद्विक हीं मृत दिवसाचे पूर्वदिवशीं करावींत, असें माधव म्हणतो. तीनपक्ष अतिक्रांत झाल्यावर मृत दिवशीं त्रैपक्षिक करावें.