आतुर संन्यास घेतांना संकल्प, प्रेषोच्चार व अभयदान, हीं तीन प्रधानकर्मे अवश्य करावींत व अष्टश्राद्धांपासून दंडग्रहणापर्यंतचें अंगभूत कर्म यथासंभव करावें.
त्याचा प्रयोग
मंत्रस्नान करुन शुद्ध वस्त्र परिधान केल्यावर '' ज्ञानप्राप्तिद्वरा मोक्षसिद्धयर्थमातुरविधिना संन्यासमहं करिष्ये '' असा संकल्प करावा. नंतर पांच केश शिल्लक ठेवून वपन करावें, व संध्यादि औपासन होमापर्यंत यथासंभव कर्म करुन आपले ठिकाणी समारोप करावा. अग्निहोत्री असल्यास प्राजापत्यादि स्थानीं पूर्णाहुति करुन आपले ठायीं श्रौताग्नीचा समारोप करावा. उच्छिन्न अग्नीचा समारोप पुनरधानाचा संभव असल्यास करावा, तसें नसल्यास समारोप करुं नये. विधुर इत्यादिकांस अग्नि नसल्यानें समारोप आवश्यक नाहीं. नंतर उदक घेऊन त्यांत '' एषहवाअग्नेर्योनिर्यः प्राणः प्राणंगच्छ स्वाहा १ आपोवैसर्वादेवताः सर्वभ्योजुहोमि स्वाहा २ भूः स्वाहा '' या मंत्रानें हवन करावें. व हुतशेष जल '' आशुः शिशान० '' या अनुवाकानें अभिमंत्रण करुन '' पुत्रेषणावित्तेषणालोकेषणा मयात्यक्ताः स्वाहा '' या मंत्रानें थोडेसें उदक प्राशन करावें. '' अभयं सर्वभूतेम्यो मत्तः स्वाहा '' या मंत्रानें दुसर्यानें प्राशन करावें. '' संन्यस्तं मया '' या मंत्रानें तिसर्यानें सर्व प्राशंन करुन पूर्वीप्रमाणें सावित्रीप्रवेश करावा. नंतर पूर्वाभिमुख ऊर्ध्वबाहु होऊन पूर्वीप्रमाणें प्रेषोच्चार करुन '' अभयं सर्वभूतेम्यो '' या मंत्रानें पूर्वेस उदक टाकावें. शिखा उपटून यज्ञोपवीत तोडावें व '' भूः स्वाहा '' या मंत्रानें उदकांत आहुति द्यावी. पुत्राचे घरी राहूं नये. अथवा अत्यंत आतुर असल्यास प्रेषोच्चार मात्र करावा. वांचल्यास स्वस्थ होऊन महावाक्यांचा उपदेश दंडग्रहण इत्यादि सर्व विधि करावा. याप्रमाणें आतुर विधीनें संन्यास घेऊन मरण पावल्यास मृतयतीसारखाच संस्कार करावा.