या धर्माब्धिसार ग्रंथांत पहिल्या छेदांत कालाचा सामान्य निर्णय सांगितला. दुसर्या परिच्छेदांत विशेषतः कालनिर्णय सांगितला. तिसर्या परिच्छेदाच्या पूर्वार्धीत गर्भाधानादि संस्कार, आह्निक, आधान इत्यादि सविस्तर मिश्र विषय, देवप्रतिष्ठा, शांत्यादिक व नित्यनैमित्तिक कर्मे इत्तके विषय सांगितले. तिसर्या परिच्छेदाच्या उत्तरार्धात जीवत्पितृकाचा निर्णय, श्राद्धाधिकार, काल इत्यादिकांचा निर्णय, श्राद्धपद्धति, सूतकादिकांचा निर्णय, दुर्मरण असतांही निर्णय, अंत्येष्टिसंस्कारादिविधि व विस्तारसहित संन्यास असे विषय सांगितले. विद्वानांच्या संतोषार्थ व शास्त्रव्युत्पत्ति नसणार्या अज्ञान्यांचे शास्त्राज्ञानुरुप कष्ट दूर व्हावे म्हणून या ग्रंथांत प्रायश्चित्त, व्यवहार व सर्व दानांचा विधि, याशिवाय सर्वही धर्मशास्त्रार्थ संक्षेपतः सांगितला आहे. मूळचे श्लोक क्वचित् क्वचित् अशुद्ध असल्यानें या ग्रंथांत कित्येक नवेही श्लोक शुद्ध करुन लिहिले आहेत.