मीमांसा व धर्मशास्त्र जाणणारे, बुद्धिमान् व निरलस पंडित महाविद्वानांनीं केलेले पूर्वीचे ग्रंथ पाहून कृतकार्य होतात म्हणून माझा हा ग्रंथ करण्याचा उद्योंग त्यांच्याकरितां नाही तर जे मंदबुद्धि, आळशी व अविद्वान् असून धर्माचे बाबतींत निर्णय जाणण्याची इच्छा करितात त्यांच्यासाठीं धर्मसिंधुनास नांवाचा हा सुबोध ग्रंथ मी केला आहे; या ग्रंथानें भक्तवत्सल श्रीमद्विठ्ठल संतुष्ट असो.
माझा ग्रंथ क्वचित् स्थळीं शब्दार्थानें जरी सदोष असला तरी कोंड्यानें युक्त असलेले सुदाम्याचे पोहे जसे श्रीहरीनें चांगले शुद्ध करुन भक्षण केले त्याप्रमाणें हा माझा ग्रंथ विद्वानांनी विचारपूर्वक शोध करुन प्रेमानें स्वीकारावा. विद्वान् ब्राह्मणांत केवळ सार्वभौम असे महात्मे श्रीकाश्युपाध्याय होऊन गेले त्यांपासून उपाध्यायकुलावतंस असे यज्ञेश्वरोपाध्याय व अनंतोपाध्याय असे दोन पुत्र झाले. त्यांत श्रौतमार्गात निष्णांत, ज्योतिषी, वेदांग जें उत्तम शास्त्र व्याकरण, त्यांत चांगले पढलेले असे यज्ञेश्वरोपाध्याय होते. भक्तांत श्रेष्ठ असून अनंताचा अंशभूत अवतार असल्यानें अनंत गुणांचे वसतिस्थान असे अनंतोपाध्याय होते. त्यांनीं आपली कोंकण नांवाची जन्मभूमि सोडून श्रीपंढरीक्षेत्रांत श्रीपांडुरंगाच्याजवळ वास्तव्य करुन पांडुरंगाच्या भक्तीनें भीमानदीच्या तटाकीं मुक्तीप्रत जाते झाले.
त्या अनंतोपाध्यायांचा काशीनाथ नामक पुत्र या धर्मसिंधुसार नांवाचा ग्रंथ रचिता झाला.
इतिश्रीमत्काश्युपाध्यायसूरिसूनुयज्ञेश्वरोपाध्यायानुजानन्तोपाध्यायसूरिसुतकाशीनाथोपाध्यायविरचितेधर्मसिन्धुसारेतृतीयपरिच्छेदोत्तरार्धसमाप्तम् ॥