पर्यकशौच करविलेल्या यतीनें कटीची शुद्धता करुन कटिसूत्र व कौपीन धारण करुन वस्त्रानें कटि गुंडाळावी व गुरुच्या आज्ञेनें उंच आसनावर बसून सभासदांशीं वेदांताविषयीं किंचित् उपन्यास करावा. गुरु असलेल्या यतीनें शिष्ययतीचे मस्तकावर शंखानें पुरुषसूक्तानें अभिषेक करावा व वस्त्र, गंध, धूप, दीप, नैवेद्य, या उपचारांनी पूजा करावी. नंतर वस्त्र वर धरुन यतीसह विश्वरुप अध्याय '' पश्यामि देवान् '' येथपासून '' भुंक्ष्वराज्यं समृद्धं '' येथपर्यत पठण करुन पूर्वी कल्पिलेलें नांव ठेवावें. यानंतर शिष्यास असें सांगावे कीं, इतःपर संन्यासास अधिकारी असणारास त्वां संन्यासदीक्षा द्यावी व योगपट्टादिक करावें. ज्येष्ठ यतींना नमस्कार करावा. नंतर गुरुनें कटिसूत्र व पंचमुद्रालंकृत पूर्वीचा दंड शिष्यास द्यावा व सांप्रदायानुसार त्यास नमस्कार करावा. यानंतर संन्यांसी व इतर गृहस्थाश्रमी पुरुषांनी त्यास नमस्कार करावा. शिष्यानें '' नारायण '' असें म्हणून उंच आसनावरुन उठून त्यावर गुरुस बसवावें व यथाविधि नमस्कार करुन अन्य यतींस नमस्कार करावा. याप्रमाणें गृह्याग्निमान् व विधुरादिक यांचा विविदिषासंन्यासप्रयोग सांगितला.