मासाचे प्रथम दिवशी मासिक करावें. असें वचन असल्यामुळें मृतदिवस हा मासिकाचा मुख्य काळ आहे पण तो अशौचाचे प्रतिबंधानें अंतरतो म्हणून तें अशौचानंतर ११ व्या दिवशीं करावें. म्हणून या आद्यमासिकश्राद्धी ब्राह्मणास भोजन घालावें किंवा अग्नींत होम करावा. पुनः ब्राह्मणास भोजन घालावे. अशी या श्राद्धीं द्विरावृत्ति होईल. याप्रमाणें प्रथममासिकासाठीं द्विरावृत्ति सांगितली. या वचनांत येथें द्विरावृत्ति होईल असें जें सांगितलें तें सपिंड्याधिकारांत अपकर्ष करुन कर्तव्य असलेली जीं षोडश मासिकें तीं १२ वा इस्यादिक दिवशीं करण्याचा पक्ष असल्यास त्याविषयी योजावें. षोडश मासिकें ११ व्या दिवशींच करण्याचा पक्ष असल्यास १६ मासिकांच्या १६ आवृत्ति व महैकोद्दिष्ट मिळून १७ आवृत्ति प्राप्त झाल्यानें ' या स्थळीं द्विरावृत्ति होईल ' या वचनाची संगति लागणार नाही. तसेंच सपिंड्याधिकारांत अपकर्षानें करावयाची मासिकें १२ व्या दिवशीं करणें असल्यास ११ व्या दिवशीं महैकोद्दिष्ट केल्यावर '' अतिक्रांतमाद्यमासिकं करिष्ये '' असा संकल्प करुन आद्यमासिक मात्र ब्राह्मण किंवा दर्भबटु यांजवर प्रेताचें आवाहन करुन अन्नानें किंवा आमान्नानें करावें. आद्यमासिकाचा अग्नींत होम करुं नये. कारण ' पुनः ब्राह्मणास भोजन घालावें. ' असें विशेष वचन आहे. तात्पर्यः-- एक महैकोद्दिष्ट व आद्य मासिक एक याप्रमाणे एकोद्दिष्टाची द्विरावृत्ति स्पष्टच आहे. आद्यमासिकावांचून महैकोद्दिष्टाचीच द्विरावृत्ति करावी, असें जें म्हणतात तें चुकीचें आहे. प्रथमादिकाचाही मृत दिवसच काळ असल्यानें तोही अतिक्रांत होतो, म्हणून ११ व्या दिवशीं '' आद्यमासिकमाद्याद्विकंच तंत्रेण करिष्ये '' असा संकल्प करुन दोन्हीही तंत्रानें करावीं, असें कांही ग्रंथकार म्हणतात. दुसर्या ग्रंथकारांचे मतें मासाचे प्रथम दिवशीं मासिक करावें; व संवत्सर झाल्यावर वार्षिक करावें. असें वचन असल्यामुळें दुसर्या वर्षाचे आरंभीं प्रथमाब्दिक करावें. ११ व्या दिवशीं प्रथमाब्दिक करावें असें आहे. याप्रमाणें तिसर्या पक्षांत सपिंडीकरणाचा पक्ष असतां ११ व्या दिवशीं आद्यमासिक, ऊनमासीं ऊनमासिक, दुसर्या मासाच्या आरंभी द्वितीय मासिक व पक्षत्रयाचे ठायीं त्रैपक्षिक, हीं एकोद्दिष्ट विधीनें करुन अवशिष्ट बारा मासिकें अपकर्षानें तशींच करुन सपिंडी करावी. याप्रमाणें दुसर्या पक्षाविषयींही जाणावे.
११ व्या दिवशीं तंत्रानें षोडश मासिकाचा अपकर्ष करुन करण्याचा पक्ष असल्यास महैकोद्दिष्ट केल्यावर देशकालाचा उच्चार करुन '' अतिक्रांतमाद्यमासिकं सपिंड्यधिकारार्थ मप कृष्योन मासिकादि न्यूनाब्दिकांतानि पंचदश मासिकानिच तंत्रेण एकोद्दिष्ट विधिना करिष्ये '' असा संकल्प करुन तंत्रानें सोळाही मासिकें करावीं. कित्येतांच्या मतें आद्यमासिक व आद्याब्दिक अतिक्रांत असतां '' ऊनादि मासिकादीनिच '' इत्यादि संकल्प करावा.
मासिकेः-- १ आद्यमासिक, २ ऊनमासिक, ३ द्वितीय मासिक, ४ त्रैपक्षिक, ५ त्रितीय मासिक, ६ चतुर्थ मासिक, ७ पंचम मासिक, ८ षष्ठ मासिक, ९ ऊनषाण्मासिक, १० सप्त मासिक, ११ अष्टम मासिक, १२ नवम, १३ दशम, १४ एकादश, १५ द्वादश, १६ ऊनाब्दिक, अशीं क्रमानें जाणावी.