त्याचा प्रयोगः-- देशकालांचें स्मरण करुन '' श्रीनारायणप्रीत्यर्थमाराधनं करिष्ये '' असा संकल्प करावा व ' गुर्वर्थे क्षणः कर्तव्यः ' याप्रमाणें '' परमगुर्वर्थे क्षणः '' परमेष्ठिगुर्वर्थे० परात्परगुर्वर्थे० असें चार ब्राह्मणांस निमंत्रण करुन शुक्लपक्षांत केशवादी नामांनीं व कृष्णपक्षांत संकर्षणादि नामांनीं बारा ब्राह्मणांस निमंत्रण करावें. याप्रमाणे सोळा ब्राह्मण किंवा संन्यासी सांगावे. सामर्थ्य नसल्यास यथाशक्ति ब्राह्मणांस निमंत्रण करुन यथायोग्य सोळा क्षण द्यावे. सोळा ब्राह्मणाचें पादप्रक्षालन करुन आचमन करावें व पादक्षालनाचें उदक दुसर्या पात्रांत घेऊन गंध, पुष्प इत्यादिकांनीं त्या उदकाची पूजा करावी. ब्राह्मणांस पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसवून षोडशोपचारांनीं किंवा गंधादि पंचोपचारांनीं पूजा करुन सोपस्कर अन्न वाढावें व तें गायत्री मंत्रानें प्रोक्षण करावें, नंतर '' गुरवेइदमन्नं परिविष्टं परिवेक्ष्यमाणं चातृप्तेः स्वाहा हव्यंनमम '' याप्रमाणें परमगुर्वादि पंधरा ब्राह्मणांस अन्नत्याग केल्यावर '' ब्रह्मार्पण० '' इत्यादि कर्म करावें. भोजन करुन आंचवल्यावर त्या ब्राह्मणांची तांबूल, वस्त्र, दक्षिणा इत्यादिकांनी पूजा करावी. येथें कित्येक शिष्ट पूर्वी स्थापिलेल्या पादोदक तीर्थाची पूजा करितात. तांबूलादिकांच्या केलेल्या मंडलावर तीर्थपात्र ठेवून पुरुषसूक्तानें व '' तीर्थराजाय नमः '' या मंत्नानें त्याची षोडशोपचारांनी पूजा करुन तें पात्र मस्तकावर धारण करावें व बंधूंसह ब्राह्मणांस प्रदक्षिणा करुन '' गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु० '' या मंत्रानें नमस्कार करावा व '' अविद्यामूलशमनं सर्व पापप्रणाशनं । पिबामि गुरुपत्तीर्थ पुत्रपौत्र प्रवर्धनम् ॥ '' या मंत्रानें तें तीर्थ पहिल्या ब्राह्मणाचे हातून प्राशन करावें. कर्म ईश्वरास समर्पण करुन आप्तेष्टांसह भोजन करावें. याप्रमाणें वर्षभर प्रतिमासीं मृततिथीचे दिवशीं अशीच आराधना करावी. प्रतिमासिक श्राद्ध करुं नये. प्रतिवर्षी पार्वण श्राद्ध करुन आराधनाही करावी. नंतर दर्श, महालयादि श्राद्धें ही सर्व साधारपणें करावीं. त्यांविषयीं विशेष नाहीं. याप्रमाणें आराधनविधि सांगितला.
याविषयीं नारायणबलि व पार्वण श्राद्ध हीं दोन्ही एकाच दिवशी करण्याचा पक्ष असल्यास अकराव्या किंवा बाराव्या दिवशीं पूर्वी नारायणबलि करावा व नंतर पार्वणश्राद्ध करावें. दोन दिवशीं करण्याचा पक्ष असल्यास अकराव्या दिवशीं पार्वणश्राद्ध व बाराव्या दिवशीं नारायणबलि करावा. बाराव्या किंवा तेराव्या दिवशीं आराधन करावें. ऊनमासिकादिकांच्या कालींही आराधन करावें, असें कांहीं ग्रंथकारांचें म्हणणे आहे. प्रत्येक महिन्यास आराधन करावें, असें दुसर्या कित्येक ग्रंथकारांचें म्हणणे आहे. पार्वणश्राद्ध अकरावा दिवस किंवा प्रतिवार्षिक या कालींच करावें. आणि तें पुत्रादिकांसच आवश्यक आहे. शिष्यादिकांस आवश्यक नाहीं. पण पुत्ररहितयतीचें पार्वणश्राद्ध शिष्यानेंही प्रतिवर्षी करावें. त्यासाठीं व नामगोत्राच्या उल्लेखाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी शिष्यानें अकराव्या दिवशीं पार्वणश्राद्ध करावें.
बारावा इत्यादि दिवशी नारायणबलि इत्यादिकांचा असंभव असल्यास शुक्लपक्षांतील द्वादशी, श्रावणनक्षत्र, पंचमी, पूर्णिमा किंवा अमावास्या हे गौण काल आहेत. यांत पहिला पहिला काल अधिक प्रशस्त होय. भार्या, कन्या, सून इत्यादिक स्त्रिया यतिसंस्कार करणार्या असतील तर विधवा असल्यास तिनें पूर्वी वपन करुन तीन कृच्छ्रें प्रायश्चित्त करावें. सौभाग्यवती असल्यास तिनें एक कृच्छ्रच प्रायश्चित्त करावें.
देशांतरी असणार्या पुत्रानें पिता जो यति त्याची सिद्धीवार्ता ऐकून वपनपूर्वक स्नान करावें व दुग्धतर्पण, पूजा, इत्यादि दशाहांत कर्म करुन अकराव्या दिवशीं पार्वणश्राद्ध, नारायणबलि इत्यादि सर्व कर्म यथाविधि करावें. समीप असलेल्या ज्येष्ठ पुत्रानें हें कर्म केलें असेल तर कनिष्ठानें करुं नये.
शुक्लकृष्णादि भेदानें केशवादि नांवें मृततिथीच्याच अनुरोधानें घ्यावींत; वार्ताश्रवणतिथीच्या अनुरोधानें घेऊं नयेत. मृत तिथीचें अज्ञान असल्यास वार्ताश्रवणाच्या अनुरोधानेंच घ्यावीं. यतीचा संस्कार केल्यास अश्वमेध सहस्त्रादिकांचें फल आहे. ज्या प्रदेशांत संन्याशाचें शरीर संस्काररहित पडून राहील, त्या प्रदेशांत धर्मलोप, दुर्भिक्ष व मरण हीं प्राप्त होईल. गुरु स्वर्गस्थ झाल्यास शिष्यानें उपवास करावा. पुत्रादिकांचें मरण श्रवण केलें असतां यतीनें स्नान करुं नये. मातापितराचें मरण श्रवण केलें असतां सचैल स्नान केल्यानें शुद्ध होतो.