ब्रह्मचारी मरण पावल्यास बारा, सहा किंवा तीन अब्दें सामर्थ्यानुरुप प्रायश्चित्त केल्यावर देशकालांचें स्मरण करावें व
'' अमुकगोत्ननाम्नो ब्रह्मचारिणो मृतस्य व्रतविसर्ग करिष्ये । तदंगं नांदीश्राद्धं करिष्ये ॥ ''
असें म्हणून हिरण्यानें नांदीश्राद्ध करावें व अग्निस्थापनापासून आघारांत कर्म झाल्यावर चार व्याहति मंत्रांनी घृताचा होम करुन
'' अग्नये व्रतपतये स्वाहा, अग्नये व्रतानुष्ठान फल संपादनाय स्वाहा, विश्वेभ्यो देवेभ्यः स्वाहा ॥ ''
याप्रमाणें घृताच्या तीन आहुतींनीं हवन केल्यावर स्विष्टकृदादि कर्म समाप्त करावें.
पुनः देशकालाचें स्मरण करुन '' अमुकस्य और्ध्वदेहिकाधिकारार्थ अर्कविवाहं करिष्ये '' इत्यादि संकल्प करावा व हिरण्यानें नांदीश्राद्धांत कर्म केल्यावर रुईचे झाडाजवळ नेऊन रुईची खांदी घ्यावी व रुई व ब्रह्मचारी यांस हळदी लावून पिंवळ्या सूत्रानें वेष्टन करुन दोन वस्त्रांनीं आच्छादन करावें व अग्निस्थापनापासून आघारांत कर्म झाल्यावर
"१ अग्नयेस्वाहां, २ बृहस्पतये स्वाहा, ३ विवाहविधि योजकाय० यस्मैत्वा कामकामाय वयं सम्राड्यजामहे । तमस्मभ्यं कामं दत्वान्येद त्वं घृतं पिब स्वाहा ॥ कामायेदं० ''
या मंत्रांनी आज्यहोम करावा. यानंतर व्यस्तसमस्त व्याहति मंत्रांनीं होम करावा. याप्रमाणें आठ आहुति दिल्यावर स्विष्टकृदादि कर्म करुन रुईची खांदी व ब्रह्मचार्याचें शव यांचें तुषाग्नीनें यथाविधि दहन करावें. स्त्रातक मरणींही असाच विधि करावा, असें कांहीं ग्रंथकार म्हणतात; तर हें निर्मूल आहे असें दुसरे ग्रंथकार म्हणतात. सूतकाच्या पोंवळ्याच्या माळा, यज्ञोपवीत, इत्यादि यथासंभव द्यावीं.