तीन अग्नि प्रदीप्त केल्यावर संस्कार केलेलें आज्य स्त्रुचिपात्रांत चार वेळ घेऊन आहवनीय अग्नींत '' ॐस्वाहा परमात्मन इदं० '' असें म्हणून पूर्णाहुति करावी. सायं-संध्या व अग्निहोत्रहोम हीं झाल्यावर गार्हपत्य अग्नीच्या उत्तरेस दोन दोन पात्रें मांडून आहवनीय अग्नीच्या दक्षिणेस कौपीन व दंड इत्यादि ठेवावे. रात्रीं जागरण केल्यावर प्रातःकालीं होमादिक करुन पूर्णिमेस ब्रह्मान्वाधान केलें असल्यास पौर्णमासेष्टि करावी व दर्शेष्टीही, पक्षहोत्रापकर्षपूर्वक अपकर्ष करुन त्या कालींच करावी. ब्रह्मान्वाधान दर्शदिनीं असल्यास दर्शेष्टिच करावी.
नंतर पूर्णिमेस किंवा दर्शदिनीं देशकालांचें स्मरण करुन '' संन्यास पूर्वीगभूतया प्रजापत्येष्ट्यावैश्वानर्येष्टयाच समानतंत्रया यक्ष्ये ॥'' असा संकल्प करुन समुच्चयानें दोन इष्टि कराव्या. तेथें वैश्वानरास उद्देशून द्वादशकपाल पुरोडाश करावा; किंवा केवल प्राजापत्येष्टि करावी. याविषयींचा प्रयोग आपआपल्या सूत्रानुसार जाणावा. बौधायन सूत्राच्या अनुसारानें किंचित् सांगतोः-- पवन, पावन, पुण्याहवाचन इत्यादि पूर्वाग झाल्यावर केवल वैश्वानरेष्टीचा किंवा केवल प्राजापत्येष्टीचा संकल्प करावा. व्रीहिमय पुरोडाश द्रव्य, पांच प्रयाज, अग्निवैश्वानर अथवा प्रजापति देवता, पंधरा सामिधेनी, व्रतग्रहणानंतर अध्वर्यूनें आज्यसंस्कार करुन स्त्रुचिपात्रांत चारदां घेतलेलें तूप घ्यावें व '' पृथिवी होता '' इत्यादि चतुर्होमतृहोम, कूष्मांडहोम व सारस्वत होम करुन निर्वापादिक करावें. वैश्वानर द्वादशकपाल पुरोडाश, प्राजापत्य चरु, '' वैश्वानराय प्रति वेदयाम० '' ही पुरोनुवाक्या, '' वैश्वानरः पवमानः पवित्रैः '' ही याज्या, प्राजापत्य इष्टींत प्रधान कर्म उपांशुधर्मक ( हळू उच्चार करुन ) '' सुभूः स्वयंभूः '' इत्यादि अनुवाक्या जाणाव्या. '' प्रजापतेन त्वदेतां० '' ही याज्या. नंतर स्त्रुवापात्रानें आठ उपहोम दोन्ही ठिकाणी करावें. '' वैश्वानरोनऊतयआप्रयातुपरावतः । अग्निरुक्थेन वाहसास्वाहा वैश्वानरायेदं ॥'' असा सर्वत्र त्याग म्हणावा. '' ऋतावानं वैश्वानरमृतस्य ज्योतिषस्पतिं । अजस्त्रं धर्म मीमहे स्वाहा २ वैश्वानरस्यदस० ३ पृष्टोदिवि पृष्टो अग्निः ४ जातोयदग्ने० ५ त्वमग्नेशोचिषा० ६ अस्माकमग्ने० ७ वैश्वानरस्य सुमतौ० ॥'' नंतर '' सहस्त्रशीर्षा० '' या सूक्तानें देवतेची प्रार्थना करुन स्विष्ट कृदादि होमशेष समाप्त करावा. नंतर '' सर्वोवैरुद्रः० विश्वंभूतं० '' या दोन मंत्रांनी अग्नीचा उत्सर्ग करावा. '' आयुर्दा अग्ने० '' या मंत्रानें दर्भाच्या स्तंबावर ठेवलेला जो यजमानाचा भाग त्यांतून किंचित् घ्यावा व '' सहस्त्रशीर्षा० '' या अनुवाकानें प्राशन करुन '' ओमिति ब्रह्म ओमितीदं सर्व '' या अनुवाकानें हुतशेष आहवनीय अग्नींत टाकावें. याप्रमाणें वैश्वानर इत्यादि दोन इष्टींतून एक इष्टि करुन औपासनाग्नींत व सर्वाधानपक्ष असल्यास दक्षिणाग्नींत प्राणादिहोमापासून विरजाहोमापर्यत कर्म करावें. इतर पूर्वीप्रमाणें जाणावें. अरणी, मुसळ व उखळ यांवांचून बाकीचीं काष्ठपात्रें आहवनीय अग्नींत दहन करावींत. नंतर पूर्वीप्रमाणें आहवनीय अग्नीचा समारोप आपल्या ठिकाणीं करावा. दोन अरणी गार्हपत्य अग्नींत टाकून त्या गार्हपत्याचा समारोप करावा व दक्षिणाग्नींत मुसळ व उखळ यांचें हवन करुन दक्षिणाग्नीचाही समारोप करावा. नंतर औपासनाग्नीचा समारोप करावा, असा क्रम आहे. याविषयी विशेष दुसर्या ग्रंथांत पहावा. याप्रमाणें साग्निकाविषयीं प्रयोग सांगितला. स्नातकाविषयी ब्रह्मान्वाधान व विरजाहोमादिकांनींरहित प्रयोग जाणावा; कारण त्यास अग्नि नाहीं.