ज्या तिथीस अग्निसंस्कार झाला त्या तिथीस त्रैपक्षिकापर्यतचीं मासिकें करावीं. त्याच्या पुढची मासिकें व प्रत्याब्दिक मृत तिथीचे ठायीं करावीं, असा विशेष आहे. यावरुन तीन मासांनंतर अग्निसंस्कार असेल तर दहन दिवसापासून ११ व्या दिवशीं आद्यमासिक करावें असें वाटतें. त्रैपक्षिकापर्यंत मासिकें दहनतिथीस करुन त्यांचे पुढची अंतरलेलीं मासिकें मृत तिथीस प्राप्त झालेल्या मासिकासह करावीं.
ऊनमासिक, ऊनषाण्मासिक व ऊनाद्विक या श्राद्धांस वर्ज्यदिवसः-- त्रिपुष्कर, नंदातिथी, अमावस्या, शुक्रवार, चतुर्दशी, कृत्तिका नक्षत्र व द्विपुष्कर हीं असतां ऊनश्राद्धें करुं नयेत. त्रिपुष्कर व द्विपुष्कर यांचें लक्षण पूर्वी सांगितलें आहे. आद्यमासिक व प्रथमाद्विक हीं ११ व्या दिवशीं करावीं. असें एक मत व आद्यमासिकच ११ व्या दिवशीं करावें व प्रथमाद्विक २ र्या वर्षाचे आरंभीं करावें, असें दुसरें मतही पूर्वी सांगितलें.
हीं १६ मासिकश्राद्धें वर्षाती सपिंडीकरणाचा पक्ष असल्यास आपापल्या उक्तकालीं एकोद्दिष्ट विधीनें करावीं. १२ वा दिवस इत्यादि कालीं सपिंडीचा अपकर्ष पक्ष असल्यास एके दिवशींच अपकर्ष करुन एककालीं एकोद्दिष्ट विधीनें करावीं. कारण षोडश श्राद्धें केल्यावांचून सपिंडी करुं नये. या वचनात्तें षोडश श्राद्धें केल्याशिवाय सपिंडीस अधिकार नाहीं, असा बोध होतो. हीं मासिकें पक्कान्नांनी किंवा आमान्नांनी करावीं. पाकानें करण्याच्या पक्षीं एककालीं करणें असल्यास सर्वाचा १ च पाक करुन ब्राह्मण, अर्ध्ये व पिंड हे १६।१६ करावें, १२ वा इत्यादि दिवशीं सपिंडी करण्यापूर्वी हीं श्राद्धें केली असलीं तरी सपिंडीनंतर पुनः स्वस्व कालीं पार्वणविधीनें करावी. ज्याची सपिंडी वर्षापूर्वी केली त्याची षोडश श्राद्धें पुनः यथाविधि करावी. ज्याची सपिंडी वर्षापूर्वी केली त्याच्या षोडशमासिक श्राद्धाची द्विरावृत्ति करावी. असें गौतम सांगतो, इत्यादिक वचन आहे म्हणून षोडश श्राद्धांची द्विरावृत्ति करावी, असें जें सांगितलें तें ११ व्या दिवशीं सपिंडी करण्याच्या पक्षी जाणावें. कारण ११ वा दिवस आद्यमासिकाचा काल आहे. १२ व्या दिवशीं सपिंडी करण्याचा पक्ष असल्यास १५ मासिकांची द्विरावृत्ति करावी. ४५ व्या दिवशीं सपिंडी करण्याचा पक्ष असल्यास आद्यमासिक, ऊनमासिक व द्वितीय मासिक हीं स्वस्वकालीं केली असल्यानें जीं अपकर्षानें केली त्यांचीच पुनरावृत्ति करावी, असा विधि आहे व त्यांच्या स्वकीय कालाचा अभाव आहे म्हणून १३ मासिक श्राद्धांचीच पुनरावृत्ति करावी. याप्रमाणें इतर पक्षांविषयींही जसा संभव असेल त्याप्रमाणें जाणावें.
१२ व्या दिवशीं सपिंडी करुन १३ वा इत्यादिक दिवशीं आद्य मासिकासहित जी सोळा मासिकांची पुनरावृत्ति करितात ते भ्रांत होत. मरणापासून आरंभ करुन १२ महिन्यांत एखादा अधिक मास प्राप्त झाल्यास अधिकमास संबंधी मासिक श्राद्ध अधिक व शुद्ध या २ मासांत २ वेळ करावें. अशीं १७ श्राद्धें होतात. मलमासांत मृत झाल्यास ११ व्या दिवशीम आद्य मासिक करुन दुसर्या मासाचे मृत तिथीस तें पुनः करावें; व किंचिन्न्यून अशा दुसर्या मासांत ऊनमासिक, तृत्तीय मासाचे आरंभी द्वितीय मासिक व २॥ महिन्यांचे अंतीं त्रैपक्षिक या प्रमाणें करावीं. सपिंडीनंतरचीं अवशिष्ट मासिकें स्वस्व कालींच करावीं. सपिंडांचे ठायी ४ पुरुषांत नांदीश्राद्ध प्राप्त झाल्यास तें नांदीश्राद्ध ज्या मासांत प्राप्त झालें असेल त्याच मासांत १ ले दिवशींच अपकर्ष करुन सर्व मासिकें करावींत. कारण, द्विजानें नांदी मुख करण्यासाठी सर्व प्रेतश्राद्धें सपिंडी हीं अपकर्ष करुनही करावीं असें वचन आहे. त्यांत षोडश श्राद्धांचा पक्ष असतां १-५-१६ ब्राह्मण, ४८ पिंड पुरुरवार्द्रव विश्वेदेव यांसाठी १ ब्राह्मण याप्रमाणें सर्वाचें अनुष्ठान करावें. याप्रमाणें अन्य पक्ष असतांही जशी श्राद्धसंख्या असेल त्याप्रमाणें ब्राह्मणादिक जाणावे. कित्येक ग्रंथकारांच्या मतें पाक निराळा करावा असें आहे. उदकुंभश्राद्धींही अनुमासिकाप्रमाणें प्रेतोद्देशक श्राद्धें असल्यानें त्यांचाही अपकर्ष करावा, असें सांगितलें. वृद्धिश्राद्धावांचून अनुमासिकाचा अपकर्ष असेल तर ऊशनाऋषि दोष सांगतो. जो कोणी वृद्धिश्राद्धहीन होऊन अपकर्षानें प्रेतश्राद्धें करील तो श्राद्धकर्ता पिंतरांसह घोर नरकांत बुडतो. चतुःपुरुष सपिंडांत आधानादि प्राप्ति निमित्तकही अपकर्ष करावा. याविषयीं विशेष प्रकार पूर्वार्धात सांगितला. जें जें मासिकश्राद्ध सूतकादिकानें अंतरेल तें तें पुढच्या मासिकासह एकतंत्रानें करावें, असें सांगितलें आहे.