पुत्रानें किंवा शिष्यानें स्नान करुन अधिकारासाठी वपन व तीन कृच्छ्र प्रायश्चित्त करावें. पुत्रव्यतिरिक्तास वपन कृताकृत आहे. देशकालांचे स्मरण करुन '' ब्रह्मीभूतस्य यतेः शौनकोक्तविधिना संस्कारं करिष्ये '' असा संकल्प करुन नूतन कलश तीर्थानें भरुन '' गंगेयमुने०, नारायणः परंब्रह्म० यच्चकिंचिज्जगत्सर्व० '' या मंत्रांनी अभिमंत्रण करुन रुद्रसुक्त विष्णुसूक्त व '' आपोहिष्ठादि '' ऋचा यांनीं यतीस स्नान घालावें व चंदनादि उपचारांनीं कलेवराची पूजा करुन माला इत्यादिकांनी अलंकृत करावें व वाद्यघोषादिकांनी शुद्ध देशीं नेऊन जलीं किंवा स्थलीं ठेवावें. यतीचें कलेवर स्थलीं ठेवल्यास व्याहतिमंत्रानें भूमिप्रोक्षण फरुन दंडप्रमाण खाडा करावा व त्या खाड्याच्या मध्यभागीं लहान दीडहात खड्डा करुन सात व्याहतिमंत्रांनी पंचगव्यानें तीनदां प्रोक्षण करावें. जलपक्ष असल्यास नदींत पंचगव्य टाकून दर्भ पसरावे व सावित्रीमंत्रानें देह प्रोक्षण करुन शंखोदकानें पुरुषसूक्त व अष्टोत्तरशत प्रणव मंत्र यांनीं स्नान घालावें. नंतर अष्टाक्षर मंत्रांनी षोडशोपचारांनीं पूजा करुन तुलसीमाला इत्यादिकांनीं अलंकृत करुन '' विष्णो हव्यं रक्षस्व '' या मंत्रानें तीन ठिकाणी मोडलेला दंड उजव्या हातावर ठेवावा. '' हंसः शुचिषत्० '' व '' परेणनाकं निहितं गुहायां विभ्राजदेतद्यतयो विशन्ति । वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः संन्यास योगाद्यतयः शुद्धसत्वाः ॥ '' हे मंत्र हदयाचे ठायीं जपावे. भ्रुकुटीच्या मध्यें पुरुषसूक्ताचा जप करावा. '' ब्रह्मजज्ञानं० '' या मंत्नाचा जप मस्तकाच्या ठायीं करावा व '' भूर्भुवः स्वाहा '' हा मंत्र म्हणून शंखानें मस्तक फोडावें. अथवा '' भूमिर्भूमिमगान्मातामातरमप्यगात् । भूयास्मपुत्रैः पशुभिर्योनोद्वेष्टिसभिद्यताम् ॥'' या मंत्रानें परशु इत्यादिकानें मस्तक फोडावें. मस्तक फोडण्यास असमर्थ असल्यास मस्तकावर गुळाची ढेप इत्यादिक ठेवून ती फोडावी. पुरुषसूक्त म्हणून मिठानें खाडा भरावा. कोल्हें कुत्रें इत्यादिकांपासून रक्षण व्हावें म्हणून वाळु इत्यादिकानें खड्डा भरावा. नदी इत्यादिकांत देह ठेवणें असल्यास मस्तकाचा भेद केल्यावर दर्भानी आच्छादन करुन व्याहतिमंत्रानीं अभिमंत्रण करावें व पाषाण बांधून '' ॐ स्वाहा '' या मंत्रानें डोहांत स्थापना करावी. नंतर '' अग्निनाग्निःस० त्वंह्यग्ने अग्निना० तंमर्जयंतसुक्रतुं० यज्ञेनयज्ञं० '' या चार ऋचांनी व चित्तिःस्त्रुक्० इत्यादिक दशहोत्रादि संज्ञक यजुर्मत्रांनीं अभिमंत्रण करावें. '' अतोदेवा० '' या मंत्राचा जप करुन '' आम्ही पापमुक्त व अश्वमेधादिफलभागी झालों '' अशा भावनेनें सर्व पाठीमागून जाणार्यांनीं अवभृथ बुद्धीनें स्नान करुन गंधादिक धारण करावें व उत्सवानें घरी जावें. या स्थली परमहंसाची समाधि स्थलीं मुख्य होय. जलांत मध्यम. कारण '' कुटीचकाचें दहन करावें, बहूदकांस पुरावें, हंसास जलसमाधि द्यावी व परमहंसाचें स्थली प्रपूरण करावें '' असें वचन आहे. या वचनांत '' प्रपूरयेत् '' या शब्दाऐवजी '' प्रकीरयेत् '' असाही कोठें पाठ आहे. ब्रह्मीभूत भिक्षूसाठीं वार्षिक श्राद्धाहून इतर एकोद्दिष्ट, उदक, पिंड, अशौच, प्रेतक्रिया करुं नये. कुटीचकाखेरीज दुसर्या कोणाही यतीचें कधींही दहन करुं नये.
नंतर कर्त्यानें स्त्रान करुन आचमन केल्यावर '' सिद्धिंगतस्य ब्रह्मीभूत भिक्षोस्तृप्तयर्थ तर्पणं करिष्ये '' असा संकल्प करावा व सव्यानें देवतीर्थानें '' आत्मानमंतरात्मानें परमात्मानं '' असें वाक्य म्हणून चार चारदां तर्पण करुन शुक्लपक्षी मृत झालेल्याचें केशवादि द्वादशनामांनीं व कृष्णपक्षांत मृत झालेल्याचें संकर्षणादि द्वादश नामांनी '' केशवंत० '' असें द्वितीया विभक्तीनें तर्पण करावें. हें तर्पण दुधानें करावें, असें कांही ग्रंथकार म्हणतात. यानंतर '' सिद्धिंगतस्य भूमीवर किंवा तीरावर मृण्मय लिंग करुन पुरुषसूक्तानें व अष्टाक्षरमंत्रानें षोडशोपचारपूजा करावी; व घृतमिश्र पायसाचा बलि देऊन घृतदीप समर्पण केल्यावर पायसाचा बलि उदकांत टाकावा. नंतर '' ॐ नमो ब्रह्मणे नमः '' या मंत्रानें शंखानें आठ अर्घ्य देऊन घरीं जावें. याप्रमाणें पहिल्या दिवसाचें कृत्य सांगितलें. याचप्रमाणें दहा दिवस प्रत्यहीं तर्पण, लिंगपूजन, पायसबलि व दीपदान हीं करावीं.