पति मृत झाला असतां स्त्रियांस दोन प्रकार सांगितले आहेत. उत्तम प्रकारें वैधव्य पालन करावें किंवा सहगमन करावें. जी स्त्री पति मरण पावला असतां सदोदीत वैधव्य रक्षण करील ती पुनः भर्त्याप्रत प्राप्त होऊन स्वर्गलोकास जाते. विधवा स्त्रीनें सदाचरण पाळावें. सदाचरणाचा भंग झाल्यास ती अधोयोनीस जाते. त्यांत वैगुण्य झालें असतांही स्वर्ग लोकापासून पति सर्वथा पतित होतो; व तिचा पिता, माता व भ्रातृवर्ग हेही पतन पावतात. विधवेचा कबरीबंध म्हणजे केशाचा बुचडा पतीच्या बंधनास कारण होतो, म्हणून विधवेनें सदोदीत केशाचें वपन करावें. विधवेनें सदा एकदां भोजन, उपवास, व्रतें हीं आचरण करावींत. पलंगावर निद्रा करणारी विधवा स्त्री आपल्या पतीस अधोयोनीस पाडिते. विधवेनें अंगास तैलादि लावूं नये किंवा सुगंधीं द्रव्यांचें सेवन करुं नये. कंठगत प्राण झाले तरी वृषभावर बसूं नये. तिने कंचुकी म्हणजे चोळी धारण करुं नये, व चित्रविचित्न रंगांचे वस्त्र परिधान करुं नये. वैशाख, कार्तिक व माघ या मासांत विशेष नियम आचरावेत. तांबूल, काजळ, कांस्यपात्रांत भोजन व चंदनादिक हीं यति व विधवा यांनीं वर्ज्य करावींत. पुत्ररहित विधवा स्त्रीनें भर्ता इत्यादि त्रयीच्या उद्देशानें प्रत्यही तिलकुशोदकानें तर्पण करावें. श्राद्धादिकाविषयी पूर्वी सांगितलेंच आहे.