अन्य नक्षत्रीं मरण पावलेल्याचा दाह पंचकांत प्राप्त झाल्यास पुतळे करावे, शांति करुं नये. पंचकांत मरण पावलेल्याचा दाह अश्विनी नक्षत्रांत प्राप्त झाल्यास शांतीच करावी, पुतळे करुं नयेत. शांति करावयाची ती लक्षहोम किंवा रुद्रजप यांतून कोणतीही शक्त्यनुसार करावी. अथवा कलशावर यमाच्या प्रतिमेची पूजा करुन आपल्या गृह्य सूत्रांत सांगितलेल्या विधीनें अग्निस्थापन, अन्वाधान, चरु शिजविणें येथपर्यत कर्म करुना आज्य भागांत कर्म केल्यावर '' १ यमायस्वाहा, २ धर्मराजाय०, ३ मृत्यवे०, ४ अंतकाय०, ५ वैवस्वताय०, ६ कालाय०, ७ सर्वभूतक्षयाय०, ८ औदुंबराय०, ९ दध्नाय०, १० नीलाय०, ११ परमेष्ठिने०, १२ वृकोदराय०, १३ चित्राय०, १४ चित्रगुप्ताय०, '' या नाममंत्नांनी चरुच्या चवदा आहुतींनी होम करावा. याप्रमाणें होम करुन होमशेष समाप्त केल्यावर '' कृष्णांगां कृष्णवस्त्रांच हेमनिष्कसमन्वितां । दद्याद्विप्राय शांताय यमो मे प्रीयतामिति ॥ '' या मंत्रानें गोदान करावे.
त्रिपादनक्षत्रीं अशीच शांति करावी. भद्रा तिथींचा ( २।७।१२ ) रवि, भौम व शनि हे वार आणि त्रिपाद नक्षत्रें यांच्याशी योग झाल्यास त्रिपुष्कर योग होतो. दोहोंचा योग असतां किंवा द्विपाद नक्षत्रांचा योग असतां द्विपुष्कर योग होतो. पुनर्वसु, उत्तराषाढा, कृत्तिका, उत्तरा, पूर्वाभाद्रपदा व विशाखा हीं त्रिपाद नक्षत्रें होत. मृग, चित्रा व धनिष्ठा हीं द्विपाद नक्षत्रें होत. त्रिपुष्कर योग व द्विपुष्कर योग यांवर मरण प्राप्त झाल्यास तीन कृच्छ्रें प्रायश्चित्त करुन यवाचे पिठाचे तीन पुरुष करुन त्यासह प्रेताचें दहन करावें. तीन पुतळे प्रेतावर ठेवणें, आज्याहुति देणें हें पूर्वीप्रमाणेंच करावें. सुवर्ण, हिरा, नीलमणी, माणिक व मौक्तिक हीं पांच रत्नें मुखांत टाकावीत. रत्नांचा अभाव असल्यास अर्ध तोळा सुवर्ण व सुवर्णाच्या अभावीं घृत घालावें. याप्रमाणें पूर्वीही करावें. त्रिपुष्कर व द्विपुष्कर योगांर मरण आल्यास त्रिगुण व द्विगुण फल होतें व खनन असतांही असेंच फल प्राप्त होतें. या दोषाची शांति होण्यासाठी सुवर्ण दक्षिणा द्यावी किंवा काळें वस्त्र दान करावें. सूतकांतीं पूर्वी सांगितलेली शांति केली असतां मंगल होतें.
मृतास स्मशानांत नेल्यावर तो पुनः जिवंत झाल्यास तो ज्याच्या घरांत प्रवेश करितो त्यास मरण प्राप्त होईल. त्यासाठीं दुग्ध घृतांत भिजविलेल्या उंबराच्या समिधांचा सावित्री मंत्रानें आठ हजार होम करावा. शेवटीं कपिला गाईचें दान व तिलपूर्ण कांस्यपात्राचें दान करावें. एक्यायशी पलें किंवा साडेचाळीस पलें किंवा सव्वासव्वीस पलें अथवा नऊ, सहा किंवा तीन पलें, असें यथाशक्ति कांस्यपात्र ब्राह्मणास द्यावें.