हें रुद्रगणश्राद्ध एकादश रुद्रांचे उद्देशानें किंवा रुद्ररुप प्रेताचे उद्देशानें करावें. रुद्राचे उद्देशानें पक्ष असल्यास सव्यानें व रुद्ररुप प्रेताच्या उद्देशानें करणें असल्यास अपसव्यानें करावें. १ वीरभद्र, २ शंभु, ३ गिरीश, ४ अजैकपात्, ५ अहिर्बुध्न, ६ पिनाकी, ७ अपराजित, ८ भुवनाधीश, ९ कपाली, १० स्थाणु व ११ भग, असे ११ रुद्र जाणावे. या श्राद्धीं सामर्थ्य असणारानें १।१ रुद्राचे नांवानें १ ब्राह्मण असे ११ ब्राह्मण भोजनास सांगावे. असमर्थानें सर्वाचे उद्देशानें १ च ब्राह्मण भोजनास सांगावा. आमान्नें देणें असतां ११ किंवा १ द्यावें. या श्राद्धीं पिंडदान, अर्घ्य, अग्नौकरण व विकिर हीं करुं नयेत. अष्टवसुश्राद्धही असेंच करावें. हें अष्टवसुश्राद्ध कृताकृत आहे. अष्ट वसूंचीं नांवेंही दुसर्या ग्रंथांत पहावी. हें ११ व्या दिवसाचें कृत्य ३ दिवसांचें अशौच असतां ४ थ्या दिवशीं करावें. दुसर्या दिवशीं किंवा पहिल्या दिवशीं अस्थि संचयन करावें. ५ व्या दिवशीं सपिंडी करावी.
या ११ व्या दिवशीं अथवा १२ व्या दिवशीं पददानें करावीं. म्हणजे प्रेताचें मार्गी सुखकारक गमन होतें. आसन, उपानह, छत्री, आंगठी, तांब्या, यज्ञोपवीत, घृत, वस्त्र, अन्न व अन्नपात्र हे १० पदार्थ मिळून पददान होतें. याप्रमाणें १३ पददानें द्यावीं किंवा यथाशक्ति द्यावीं. म्हणजे मृत सुखी होतो. अन्न, उदकुंभ, उपानह, कमंडलू, छत्री, वस्त्र, काठी, लोहदंड, शेगडी, दीप, तिल, तांबूल, चंदन व पुष्पमाला हीं चौदा उपदानें द्यावी. वैतरणी धेनु, उक्रांति धेनु, मोक्षधेनु इत्यादिक दाने व गाय, भूमि इ० दशदानें; आणि तिलपात्रदानादिक हीं मरणकाळीं केली नसल्यास ११ व्या इत्यादि दिवशीं पुत्रादिकांनीं प्रेताचे उद्देशानें करावीं. अश्व, रथ, हत्ती, गाय, महिषी, पालखी इत्यादिक; शालग्राम, पुस्तक, कस्तुरी, केशर इत्यादिक; दासी, रत्नें, भूषणें इत्यादिक; शय्या, छत्री व चवरी हीं दानें जसें द्रव्य असेल त्याप्रमाणे द्यावीं म्हणजे प्रेतास तें तें सुख प्राप्त होते.