ज्याचा पिता मरण पावला असून पितामह जिवंत असेल त्यानें प्रपितामहपूर्वक तीन पिंड द्यावे व त्या तीन पिंडांत पित्याचे पिंडाची योजना पूर्वीप्रमाणें करावी. ज्याची माता मरण पावली असून पितामही जिवंत असेल त्यानें हा विधि प्रपितामहीपूर्वक करावा. म्हणजे प्रपितामहीपूर्वक तीन पिंड देऊन त्यांत मातृपिंडाची योजना करावी. याप्रमाणे प्रपितामह जिवंत असल्यास त्याची योजना पित्रादिकांसह करावी. '' व्युत्क्रमानें मरण पावलेल्यांची सपिंडी करुं नये ' असें जें वचन आहे तें माता, पिता, भर्ता यांहून भिन्न असणारांविषयीचें आहे. प्रपितामहादिकांसह पित्याची सपिंडी केल्यानंतर पितामह मरण पावल्यास पुनः पितामहासह पित्याची सपिंडी करावी. पित्याची सपिंडी करण्यापूर्वी पितामह मरण पावल्यास पितामहाची सपिंडी केल्यावर पितामहादिकांसह पित्याची सपिंडी करावी. जेव्हां पिता मृत झाल्यावर पितामह किंवा प्रपितामह मरण पावेल व त्यांचा दुसरा पुत्र सपिंडी करण्याचा अधिकारी देशांतरी राहत असेल तेव्हां दहनापासून अकरावे दिवसाचे कृत्यापर्यत मात्र कर्म करुन सपिंडीहीन असे पितामह व प्रपितामह असले तरी त्यांसह पित्याची सपिंडी करावी. पितामह व प्रपितामह यांस दुसरा पुत्र नसल्यास पौत्रानें किंवा प्रपौत्रानें त्याची सपिंडी करुन पित्याची सपिंडी करावी. पितामहास दुसरा पुत्र नसेल तर पौत्रानें सपिंडी षोडशानुमासिकांतच कर्म करावे. पितामहाचें वार्षिकादिक आवश्यक नाहीं. इच्छेनें पितामहाचें वार्षिकादिक केल्यास फलातिशय आहे.
पित्याचें दहा दिवसांचें कर्म करीत असतां जर पुत्र मरण पावला तर त्याचे पुत्रानें आपल्या पित्याचें अंत्यकर्म करुन पितामहाचें सर्व अंत्यकर्म पुनः करावें. दहावा दिवस गेला असल्यास पुनः कर्म करुं नये. दुसरा पुत्र नसेल तर पितामहाची सपिंडी केल्यावर पित्याची सपिंडी करावी असें सांगितलें. असामर्थ्यामुळें पित्यानें आज्ञा केलेल्या पौत्रानें पितामहाचें अंत्यकर्म करावें. कारण त्या कर्मास प्रारंभ झालेला आहे. पित्याचें दहा दिवसाचें कर्म इत्यादिकही करावें, कारण तें प्राप्त झालें आहे.