रजस्वला असतां मरण पावल्यास तिची संस्कारादि कर्मे करुं नयेत. तीन रात्रीनंतर तिला स्नान घालून शवधर्मानें तिचें दहन करावें. अथवा रजस्वला व सूतिका ( बाळंतीण ) यांचा मल प्रक्षालन करुन त्यांना स्नान घालावें व काष्ठाप्रमाणें अमंत्रक दहन करुन मंत्राग्नीनें अस्थीचें दहन करावें. दोन्हीही वेळी म्हणजे अमंत्रकदहन व अस्थिदहन या वेळीं तीन चांद्रायणें प्रायश्चित्त करावेंच. मरणकालींच समंत्रक दहन करण्याची इच्छा असल्यास
'' अद्येत्यादि अमुक गोत्राया रजस्वलावस्थामरणनिमित्त प्रत्यवायपरिहारार्थमौर्ध्वदेहिक योग्यत्वार्थच चांद्रायत्रय प्रायश्चित्तपूर्वकं शूर्पेणाष्टोत्तर शतस्नानानि कारयिष्ये ॥ ''
असा संकल्प करुन तीन चांद्रायणें प्रत्याम्नायानें करुन यवांचे पिठानें प्रेत लिप्त करुन आपण स्नान करावें व सुपांतील उदकांनी शवास अष्टोत्तर शतवार ( १०८ वेळां ) स्नान घालावें. नंतर भस्म, गोमय, मृत्तिका, कुशोदक, पंचगव्यें व शुद्धोदक यांनीं स्नान घालवून
'' यदंति यच्चदूरके० ''
इत्यादि पवमानी ऋचा, ' आपोहिष्ठा० ' या तीन ऋचा व '' कयान० '' इत्यादि मंत्रांनी स्नान घालवून पूर्वीचें वस्त्र टाकून दुसर्या वस्त्रानें वेष्टन करुन दहन करावें. सूतिका म्हणजे बाळंतीण मरण पावल्यासही असाच विधि करावा.
बाळंतीण पहिल्या तीन दिवसांत मरण पावल्यास त्र्यब्द प्रायश्चित्त, दुसर्या तीन दिवसांत मरण पावल्यास व्द्यब्द प्रायश्चित्त, तिसर्या तीन दिवसांत मरण पावल्यास एकाब्द प्रायश्चित्त व दहाव्या दिवशीं मरण पावल्यास तीन कृच्छ्रें, याप्रमाणें विशेष कांहीं ग्रंथांत सांगितला आहे. मासपर्यंत मरण पावल्यासही तीन कृच्छ्रें करावीं, असें दुसरे ग्रंथकार म्हणतात. मिताक्षराग्रंथांत तर असें सांगितलें आहे कीं, कुंभांत उदक घेऊन त्यांत पंचगव्य घालावें व '' आपोहिष्ठा० वामदेव्य०, वारुण०, '' इत्यादि पुण्यमंत्रांनीं अभिमंत्रण करुन पूर्वोक्त मंत्रांनी स्नान घालून सूतिकेचें दहन विधियुक्त करावें. याप्रमाणें रजस्वला व सूतिका यांचा विधि सांगितला.