पंचक ह्नणजे धनिष्ठा नक्षत्राचे उत्तरार्धास आरंभ करुन रेवतीच्या अंतापर्यत असणारीं साडेचार नक्षत्रें, हें होय. या पंचकांत दहनाचा निषेध आहे. म्हणून दर्भमय पुतळे करुन ते यवांचे पिठानें लिप्त करावे व पांच ऊर्णासूत्रानें त्यांस वेष्टन करुन त्यासह शवाचें दहन करावें. त्यांविषयी तिथि इत्यादिकांचा उच्चार करुन
'' अमुकस्य धनिष्ठापंचकादिमरणसूचित वंशारिष्टविनाशार्थ पंचकविधि करिष्ये ''
असा संकल्प करावा व उक्त प्रकारच्या प्रतिमा नक्षत्र मंत्रांनी अभिमंत्रण करुन गंधपुष्पांनी पूजा करुन दहनकालीं त्या प्रेतावर ठेवाव्या. पहिली मस्तकावर, दुसरी नेत्रांवर, तिसरी वामकुक्षीवर, चवथी नाभीवर व पांचवी पायांवर, याप्रमाणें ठेवून त्या प्रतिमांवर नाममंत्रांनी घृताहुती हवन कराव्या. त्याविषयी
'' प्रेतावहः, प्रेतसखः, प्रेतपः, प्रेतभूमिपः, प्रेतहर्ता, '
अशीं नांवें क्रमानें जाणावीं. नंतर उदक देऊन
'' यमायसोम० त्र्यंबकं० ''
या दोन मंत्रांनी प्रत्येक प्रतिमेवर घृताहुतींनी हवन करावें. नंतर प्रेताचे मुखांत पंचरत्ने घालून पुतळ्यासह प्रेतांचें दहन करावें. सूतकाच्या अंती तिल, सुवर्ण, घृत यांची दानें करुन कांस्यपात्रांत तेल घालून त्यांत आपलें प्रतिबिंब पाहून तें ब्राह्मणास द्यावें व शांतीही करावी.