'' पितामही इत्यादिकांसह मातेची सपिंडी करावी. '' पिता मृत झाल्यावर माता मृत झाल्यास पित्यासहच मातेची सपिंडी करावी असें कांही ग्रंथकार म्हणतात. कन्येचा पुत्र सपिंडीकर्ता असेल तर मातामहासह सपिंडी करावी, असें दुसरे ग्रंथकार म्हणतात. सहगमन असल्यास भर्त्यासहवर्तमानच सपिंडी करावी, कोणाचीही सपिंडी असली तरी अन्वष्टक्य, प्रतिसांवत्सरिक इत्यादि श्राद्धीं पितामही इत्यादिकांसहच मातेचें पार्वण करावें. येथें स्वपुत्र, सपत्नीपुत्न, पति यांतून कोणीही नसल्यास स्त्रियांस सपिंडी नाहीं असें कांहीं ग्रंथकार म्हणतात. या स्थलीं अन्वारोहण म्हणजे सहगमन असल्यास ' भर्त्यासह पत्नीचें संयोजन ' असा जो पक्ष त्याविषयीं दोन मतें - पितृपिंडाचें पितामहादित्रयींच्या पिंडाशीं संयोजन करुन नंतर मातृपिंडाचें पितामहादि त्रयीच्या पिंडांशी संयोजन करणें हा एक पक्ष; व पहिल्यानें मातेचा पिंड पित्याशींच संयुक्त करुन मातेच्या पिंडानें एकत्र केलेला पित्याचा पिंड पितामहादिकाचे पिंडांशी संयुक्त करावा हा दुसरा पक्ष. या दोहोंत दुसराच पक्ष योग्य आहे.
सहगमन असल्यास किंवा एका दिवशीं दंपती मरण पावल्यास स्त्रियेची सपिंडी करुं नये, असें कांही ग्रंथकार म्हणतात. भर्त्याची सपिंडी केली असतां स्त्रियेची सपिंडी केल्यासारखें होतें असें दुसरें मत आहे. औरस किंवा दत्तक पौत्रप्रपौत्र या सर्वाचा अभाव असल्यास स्त्रियांनीं आपल्या भर्त्याची सपिंडी अमंत्रक करावी. सपिंडीनंतर पार्वणश्राद्धच करावें. ब्रह्मचारी, अपत्यहीन व व्युत्क्रममृत यांची सपिंडी करुं नये, असें दुसरें मत आहे. या स्थलीं सर्वत्र सपिंडी न करण्याचा पक्ष शिष्टाचारांत दिसत नाही. संन्यासी यांचें सपिंडीकरण नाही. पण त्या स्थानीं अकराव्या दिवशी पार्वणश्राद्ध करावें. हें सपिंडीश्राद्ध पार्वण व एकोद्दिष्ट असें दोन प्रकारचें आहे. यावरुन पितामहादि तिघांकरितां तीन ब्राह्मण व अर्ध्ये आणि पिडहीं तीनच असावे. प्रेतासाठी एक ब्राह्मण, एक पिंड व एक अर्घ्य. देवासाठी दोन ब्राह्मण असावे. अथवा पार्वणासाठीं एक, प्रेतासाठी एक व देवासाठीं एक ब्राह्मण असे सांगावे. या सपिंडीश्राद्धांत कामकाल विश्वेदेव घ्यावेत. पित्रादिक प्रेताचें अर्घ्यपात्र पितामहादिकांच्या तीन अर्घ्यपात्रांत मिळवावे. तसेंच प्रेताचा पिंडही पितामहादिकांच्या तीन पिंडांत मिळवावा. या सपिंडीश्राद्धांत पितृस्थानी असलेल्या ब्राह्मणाचे हातावर साग्निकानेंही होम करावा. सपिंडीश्राद्ध अन्नानेंच करावें, आमान्नादिकानें करुं नये. अनुमासिक श्राद्धेंही अन्नानेंच करावींत.
सपिंडी झाल्यावर मरण पावलेला पितृलोकास जातो, म्हणून सपिंडीचे दुसर्या दिवशीं त्याचें पाथेय श्राद्ध करावें, असें वचन आहे. यासाठीं तेराव्या दिवशीं पाथेयश्राद्ध करुन पुण्याहवाचन करावें. नंतर एक वर्षभर उदकुंभश्राद्ध करावें. प्रत्यहीं करण्याचें सामर्थ्य नसल्यास मासिक श्राद्धाचे वेळीं एक उदकुंभ द्यावा. सपिंडी झाल्यावर अनुमासिकें पार्वणविधीनेंच करावींत व वृद्धिश्राद्ध प्राप्त झाल्यास त्याचाही अपकर्ष करावा. हा अपकर्ष चार पुरुषांपर्यत असलेल्या सपिंडांविषयींच होय. वर्षभर असें केल्यावर वर्षाचे शेवटच्या दिवशीं संवत्सरविमोक्ष श्राद्ध पार्वणविधीनेंच करावें, संवत्सर विमोक्ष हेंच अह्निपूर्ति श्राद्ध असेंही म्हणतात. वृद्धिश्राद्ध, सपिंदी, प्रेतश्राद्ध, अनुमासिक व संवत्सरविमोक या श्राद्धीं तिलतर्पण करुं नये. ऊनाद्विकांपर्यतच्या षोडश श्राद्धांहून हें अद्विपूर्ति श्राद्ध भिन्न असल्यामुळें हें प्रेतश्राद्ध नाहीं. म्हणून वृद्धि प्राप्त असतांही या श्राद्धाचा अपकर्ष करुं नये. वर्षाचे शेवटचे दिवशीं शक्तयनुसार बहुत ब्राह्मणभोजन घालावें असें अंत्येष्टि पद्धतीत भट्ट सांगतात व तें योग्यही आहे. कारण '' पिता जिवंत असतां त्याची आज्ञा मानणें, प्रत्यब्दश्राद्धीं बहुत ब्राह्मणभोजन करणें व गयेंत पिंडदान करणें, या तीन कृत्यांनी पुत्रास पुत्रपणा येतो. '' या वाक्यांतील '' भूरिभोजन '' या पदानें प्रत्याब्दिक श्राद्धाव्यतिरिक्तच बहुत ब्राह्मणांस भोजन घालणें उक्त आहे. '' श्राद्धांत विस्तार करुं नये '' असा निषेध आहे. म्हणून श्राद्धास भूरिभोजनपदाभिधेयत्वाचा असंभव आहे.