मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीवामन अवतार

श्रीवामन अवतार

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ श्री ॥
सुरपतिपद घ्याया यज्ञ रेवातटाला ।
करित नृप बली तो घेउनी दानवाला ॥
म्हणुनी बहु उदेली काळजी निर्जरास ।
सकल मिळुनी आले क्षीरसिंधूतटास ॥१॥
प्रह्लादाचा नातू विरोचनाचा पुत्र बली यानेम नव्याण्णव अश्वमेध यज्ञ केलें आणि शंभराव्या यज्ञाची नर्मदेच्या तीरीं सिद्धता झाली तेव्हां आपण स्थानभ्रष्ट होऊं या भीतीनें इंद्र विष्णूस म्हणाला.

॥ दिंडी ॥
पाकशासन हे म्हणत देवराया ।
सिद्ध झाला बलि मदिय स्थान घ्याया ॥
पुरें न मन्वंतर अजुनी मदिय झालें ।
तोंच कां हें स्थानास विघ्न आलें ॥२॥

॥ लावणी ॥ ( भला जन्म )
आणिक जयांच्या वंशावरती तुझी कृपा श्रीवरा ।
झाला तोच शत्रु मज खरा ॥
आतां कशाचे अमरपुरीचें राज्य भोगण्या मला ।
सदा तूं साह्य असशि साधुला ॥
( चाल ) झालास सिंह तूं ज्यास्तव गरुडध्वजा ।
प्रह्लाद असा तो आहे तयाचा आजा ॥
मग त्याचे तूं पारिपत्य वा करशिल कैशारिती ।
काळजी हीच मला वाटती ॥३॥

॥ दिंडी ॥
देव दानव हा भेद जयीं झाला ।
तयीं आश्वासन तुझें निर्जराला ॥
एक होता प्रह्लाद दानवांत ।
काय घातिले कर्णिं तुळशीपत्र ॥४॥

॥ श्लोक ॥
टाकूं नकोस अपुलें ब्रिद देवदेवा ।
सांभाळ या अदितिच्या शिशुला सदैवा ॥
आम्हांमुळें जननी ती करि शोक भारी ।
तत् शोक तो तुजविणें तरि कोण वारी ॥५॥
विष्णूनीं सांगितलें,

॥ आर्या ॥
गमन करा स्वस्थाना येतो तुमच्या मी रक्षणा महिस ।
कश्यप महाऋषीच्या उदरा घेऊनिया बटूवेष ॥६॥
इकडे कश्यपानें आपल्या पत्नीस पुत्रप्राप्तीसाठीं एक व्रत करावयास सांगितलें होतें.

॥ ओवी ॥
कश्यपाच्या आज्ञेनी । केलें पयोव्रत अदितीनीं ॥
ज्यां व्रतप्रभावें चक्रपाणी । पोटीं येतां जाहला ॥७॥
परमेश्वराच्या जन्माचें वेळीं,

॥ पद ॥
क्रमिलें सजल घनानी नभ ते लकलका मधें तळपते - तडीत ती भारी ।
गडगडाट ध्वनी जलदाचा जणूं रणभेरी ॥
वाटते प्रभु कारण ॥ आला द्याया सलामी घन । मोरांनी व्यापिलें वन ।
नृत्य ते करितीं । मनिं म्हणती कश्यपा धन्य तुझी ती अदिती ॥
जो कां दीन जना आसरा । तोची येत तुझ्या उदरा ।
भेटी न होय निर्जरा जयाची कधिं ती ।
राहील तीच तुजपुढें आज बटु मूर्ती ॥
आले यानीं बसूनी सुर । गाती अप्सराही सुस्वर । वर्षाव अदितीच्यावर
फ़ुलांचा करिती । गणुदास प्रभुचे चरित गात या गीतीं ॥८॥

॥ आर्या ॥
वर्षाऋतूंत बुधहो ! भाद्रपदीं शुद्ध पक्षि द्वादशिला ।
अभिजित वेळेवरती कश्यप उटजांत ईश अवतरला ॥९॥
परमेश्वर जन्मास आले पण बालकाच्या संगोपनाची कांहींच सोय त्या आश्रमांत नव्हती. तेव्हां पुत्रजन्मानें आनंदीत झालेली अदितीमाता आपल्या पतीस म्हणाली;

॥ पद ॥
वामना, बघुन या मना, हर्ष माइना, अदिती चित्ता ।
म्हणे मुनिलागीं काय पहाता ! हो ऋषिवरा ॥
ऋषिवरा, आला हा घरा, जगत सोयरा, कुठे हो ठेवूं ।
गूण बाळाचे किती गाऊं । हो प्रियतमा ॥
प्रियतमा, सांगु किती तुम्हा, अशा उत्तमा, बरें हो नाहीं ।
निजाया जमिन दर्भ तेहि । हो पाळणा ॥
पाळणा, आण गुणिजना, पुरे मार्जना, कितीक करिता ।
धरून नाकास डोळे मिटिता । हों यापुढें ॥
यापुढें, कर्म बापुडे, मुळूमुळू रडे, तेच वारिता ।
शका त्यागून घुबड धरिता । हो असें कसें ॥
असें कसें, लागलें पिसे, वेळ होतसे, उठा हो वेगा ।
गणूचें नमन पांडुरंगा ॥ हो सर्वदा ॥१०॥
कश्यप हंसून आपल्या पत्नीस म्हणाले.

॥ श्लोक ॥
या तूं पुरें न गमते मज ओळखीलें ।
हा नाटकी विविधरूप धरीत भोळे ॥
हा पूर्णब्रह्म जल तेज मही नि वायू ।
हाची चिरंजीव अनाहि अणी लवायू ॥११॥
वामनाचें रूप मोठे मनोहर होतें.

॥ दिंडी ॥
वदन ज्याचें लाजवी पंचवाणा ।
आकृति ती धरि र्‍हस्व देवराणा ॥
पाय कर ते नासीक कान मान ।
जणुं कायीं रेखिलें चित्र जाण ॥१२॥
पुढें भगवान् वामन वयानेम मोठे झाले. पांच वर्षें पुरीं झाली तेव्हां,

॥ ओवी ॥
कुमार मुंजीच्या योग्य झाला । हर्ष न मये निर्जराला ॥
अवघे कश्यपाश्रमाला । येते झाले मिळूनी ॥१३॥
मुंजीच्या सिद्धतेसाठीं अनेक मंडळी एकत्र झाली.

॥ कटिबंध ॥
काननी मिळाले मुनी, तपोधन गुणी, पदीं ज्यांच्या ।
खडावा मलय चंदनाच्या ॥ हो त्यापरी ॥
त्यापरी शोभते शिरीं, जटा पांढरी, भस्म अंगा ।
षडरी ना जेथ करिती पिंगा ॥ हो वदु किती ॥
वदु किती, मालिका हातीं, कंठी शोभती, सुमन हार ।
गणूचा तया नमस्कार ॥ हो सर्वदा ॥१४॥

॥ आर्या ॥
त्या उटजातच्या भवतीं घेउनी नाचती आलाप गंधर
सरसावत जो तो कीं, पुढती विलोकन करावया देव ॥१५॥

॥ पद ॥ ( भला जन्म )
ज्यास निजाया शेष बिछाना तोच तृणाच्या वरी ।
पहुडे भक्तास्तव श्रीहरी ॥
काय वानु त्या रूप बटूचें मूर्ति परम गोजिरी ।
उभी राहिली बोहल्यावरी ॥
( चाल ) ध्यानांत जयाला कश्यपमुनि चिंतितो ।
परि तोच बटू त्यापुढती कर जोडितो ।
कस्तुरी त्यजुनिया येथ भस्म लावितो ॥
कंटाळुनिया अमृतास कीं, साळी खावया भला ।
गुण म्हने येथ विठू पातला ॥१६॥
मुंजीच्या वेळीं,  

॥ श्लोक - शार्दूल - विक्रीडित ॥
गायत्री उपदेश येउन करी प्रत्यक्ष त्या भास्कर ।
कंठी घालित जानवें सुरगुरू देवास ज्याच्या दर ॥
मोळाची बनवून मुंज मुनिनें कमरेस गुंडाळिली ।
घेऊनी पिवळी करीं अदितीनें कौपीन त्या घातिली ॥१७॥
अनेकांनीं मुंजीमध्यें भेटी दिल्या.

॥ श्लोक - वसंत - तिलक ॥
देई कमंडलु विधी मग त्या अभेदा ।
वंदूनिया प्रथम तात पदारविंदा ॥
येई वनस्पतिपती शशि तो मृगांक ।
द्याया हरीस करि घेउन दंड एक ॥१८॥

॥ श्लोक - वसंत - तिलक ॥
तैसेंच छत्र दिधलें दिवदेवतेनें ।
रुद्राक्षमाळ बुध त्यापरि शारदेनें ॥
झालें आतुर मुनि ते कुश द्यावयाला ।
त्यावीण काय दुसरें मिलतें द्विजाला ॥१९॥

॥ दिंडी ॥
करी अर्पण त्या भूमि खडावासी ।
आली जगदंबा भीक घालण्यासी ॥
दिलें भिक्षेचें पात्र कुबेरानें ।
इतर करिताती गौरवा स्तुतीनेम ॥२०॥
परमेश्वर ब्रह्मचारी रूपांत मधुकरीस निघाले त्यावेळीं,

॥ ओवी ॥
ॐ भवति भिक्षां देहि । ऐसें बोलला शेषशायी ॥
वनवासी मुनींच्या पत्न्याही । आल्या बटूस पूजावया ॥२१॥
ऋषिपत्न्यांनीं भिक्षा घातली ती अशी:

॥ साकी ॥
कुणी करवंदे कुणि त्या चिंचा कुणी तीं फ़ळें बदरीचीं ॥
कुणी आवळे कुणी तीं कवठें कुणी भिक्षा उंबराची ॥
घालिती प्रेमानें । परि धाला प्रभु तत्कृतिनें ॥२२॥
आणि त्या परमेश्वरास उद्देशून म्हणाल्या,

॥ दिंडी ॥
कां रे हससी दुबळ्यास पांडुरंगा ।
वनीं कोठून पदार्थ तुझ्या जोगा ॥
विसर आतां ते मोहन भोग खीर ।
भटाचे तूं झालास कां कि पोर ॥२३॥
विष्णू ब्राह्मणाच्या कुलामध्यें आश्रमांत जन्मास आले तेव्हां पार्वतीला लक्ष्मीचा उपहास करण्यास फ़ावले व ती लक्ष्मीस म्हणाली,

॥ पद ॥
पार्वती म्हणे इंदिरे थाट हा पुरे ।
नेसून राही सालीला, टाकून पैठणी त्वरें ॥
मोगरा हिना कस्तुरी कशाला तरी ।
लावून रुईचा चीक, वळि जटा मस्तकावरी ॥
पायांत नको तोरड्या गळ्यामधें सरी ।
दे रजा काप बुगड्याला, खोविणें सुमन मंजिरी ॥
केलास मदिय अपमान कितीदा बरें ।
त्या म्याच वाढिली भीक, नवर्‍यास तुझ्या या करे ॥
झालीस भटीण कर्मानें आतां नको रुसू ।
गणुदास म्हणे यासाठीं, कुणी नये कुणाला हसूं ॥२४॥

॥ श्लोक ॥
अशापरि उमा जयीं वदली मर्म तें लक्षुनी ।
तयीं न कमला बघे बटुकडे मुळीं हुंकुनी ॥
दिवीं मजसि निंद्य तूं ठरविलेस पुरुषोत्तमा ।
अस अशुभ हीनसा धरून वेष बोले रमा ॥२५॥

॥ दिंडी ॥
निघुन गेले दिविं देव बसुन यानीं ।
“ अग्निमीळें ” हे वदत चक्रपाणी ॥
एक प्रहरी संहिता पूर्ण झाली ।
वामनाची योग्यता कळुन आली ॥२६॥

॥ आर्या ॥
ऋक् यजू साम अथर्वण शिक्षा ब्राह्मण निरुक्त उपनिषदें ।
हां हां म्हणतां केली कश्यप उटजांत पाठ गोविंदे ॥२७॥
विद्याध्ययन पूर्ण झाल्यावर,

॥ ओवी ॥
ब्राह्मण म्हणती हे वामना । जाई बलीचिया सदना ।
मागावया दक्षणा । हल्लीं होतसे यज्ञ तेथ ॥२८॥
ब्राह्मणांच्या आदेशाप्रमाणें वामन बलीच्या यज्ञमंडपाकडे निघाले त्यावेळीं त्यांचा वेश मोठा मनोहर होता.

॥ पद ॥ ( चंद्रकांत )
असे तांबड्या सखलादीची टोपी चिमुकली शिरीं ।
गुंडाळूनी तें कृष्णाजिन हो धरि बगले भीतरीं ॥
गंध चंदनी आडवे भाला शोभा दे बहुपरी ।
भुर भुर मागें उडे लंगोटी दर्भ दंड तो करीं ॥
पायीं खडावा चटचटा वाजती छत्र विराजे शिरीं ।
आनंदानें कापूं लागली महि मग वरच्यावरी ॥२९॥

॥ श्लोक ॥
आला कुमार बळिच्या मखमंडपास ।
तत्तेज तेथ दिपवी इतरा जनास ॥
नक्षत्र संघ रविच्या उदयप्रसंगीं ।
निस्तेज होय बघतां दवणा सुरंगीं ॥३०॥

॥ ओवी ॥
मोठमोठे तपोधन । वामनासी करिती नमन ।
वलीसही समाधान । त्याचें पाहतां वाटलें ॥३१॥
वामनास पाहून बलिराजा आपल्या पत्नीस म्हणाला.

॥ पद ॥ (नृपममता )
बलि बोले विध्यावलिसी । अवलोकी सखे या बटुसी । बघ कसा ॥
दैदीप्यमान किती दिसतो । बालार्क दुजा हा गमतो ॥
( चाल ) आकृती, ठेंगणी अती, मनोहर मूर्ती ।
पुजूं चल त्याला । द्विज श्रेष्ठ वंद्य देवाला । पहा कसा ॥३२॥
त्याप्रमाणें पूजासाहित्य सिद्ध केलें आणि उभयतांनीं बटूचें पूजन केलें.

॥ ओवी ॥
पूजा साहित्य घेऊन । करिती बटूचें पूजन ॥
यजमान आणि यजमानिण । भाव चित्तीं ठेवूनी ॥३३॥
पूजा झाल्यावर बली म्हणाला,

॥ श्लोक ॥
इच्छा जयाची तुजला कुमारा ।
तें माग मातें न करी उशीरा ॥
समर्थ मी दानव श्रेष्ठ जाण ।
नाहीं कशाची मुळिं येथ वाण ॥३४॥
बलीच्या इच्छेप्रमाणें वामनानें मागणी केली.

॥ लावणी ॥ ( भला जन्म )
तीन पाऊलें भूमी द्यावी मजलागी नरवरा ।
याविण हेतू नच दुसरा ॥
अधिक मागता नशर अवघें काय करावें तया ।
भुसाचें कांडण तें कासया ॥
( चाल ) आपुल्याच मुखें आपणा थोर म्हणविसी
यामुळें कुलाला कलंक तूं लाविसी ।
तव आजा असें प्रह्लाद आठव त्याजसी ।
सर्वा भूतीं नम्र किती तो अवघ्यांचा सोयरा ।
गुण म्हणे दैत्यकुलींचा हिरा ॥३५॥
त्यावर बली म्हणाला,

॥ श्लोक ॥
ज्ञानानें गमतोस थोर परि तूं अज्ञान ये प्रत्यया ।
माझिया जवळून एक तरि तो घे देश मागूनिया ॥
किंवा कांचन रत्न माग बहुसें वा धेनू कोट्यवधी ।
या लोकीं तुजला बटो मजपरी दाता न भेटे कधीं ॥३६॥
वामनानें उत्तर दिलें.

॥ पद ॥ ( नको नको लव धरून भीति )
दाता तुजसम कोणी न जगतीं ।
म्हणुनिच आलों इथवर नृपती ॥
हेम नको मज देश नको ही ।
रत्न नको वा धेनू त्याही ॥
त्रिपाद भूमी दे झणिं राया ।
ना तरि जातो परतुनगेहा ॥३७॥
बलीचा व वामनाचा हा संवाद दैत्य गुरु शुक्राचार्य यांनीं ऐकिला. त्यांना शंका आली.

॥ आर्या ॥
शंकित कवि या वचनें होउन बसला समाधि लावून ।
शोधूं म्हणे कुठे तो सांप्रत श्री संतवरद भगवान ॥३८॥

॥ ओवी ॥
इकडे बलि संकल्प । करण्या सिद्ध झाला देख ।
झारीमध्यें उदक । नर्मदेचे घालूनिया ॥३९॥
तोच शुक्राचार्य पुढें आले. देवांचें कपटनाटक शुक्राचार्यांच्या लक्षांत आलें होतें. आणि बलीच्या यज्ञामध्यें विघ्न करण्यासाठींच विष्णू वामनरूपानें येथें आलें आहेत म्हणून ते बलीस म्हणाले,

॥ पद ॥
हां हां भूषा उदक बटूच्या करीं न लव सोडी ।
ब्रह्मांडाचा उत्पादक हा पक्का गारुडी ॥
( चाल ) हा कपटी जगजेठी अदितीच्या ये पोटीं ।
तव नाशस्तव मूढा बळीं या येथुनि झणि काढी ॥४०॥
वामन प्रत्यक्ष परमेश्वर आहे असें ऐकतांच बळीस मोठा आनंद झाला आणि तो वामनास प्रार्थना करीत म्हणाला,

॥ श्लोक ॥
अदितिजा विमला मुनि पुंगवा । अभिनवा मुरमुर्दन माधवा ।
सुकृत मत्फ़ळलें गमते मना । म्हणुन हें तव दर्शन वामना ॥४१॥
बळी शुक्राचार्यास म्हणाला,

॥ साकी ॥
ज्याच्या तेजें त्रिभुवन भरलें तो याचक होउनिया ।
आला गुरुजी मज बलि पुढती भूभागा मागाया ॥
तेणें हा यज्ञ । सफ़ल जाहला मी धन्य ॥४२॥
शुक्राचार्य रागावून म्हणाले.

॥ दिंडी ॥
अरे मूढा मद्यप्यापरी काय ।
जल्पतोसी हा शत्रु तुझा पाह्य ॥
करिल निर्मूलन तुझें या क्षणांत ।
असुर - कुल तें या नयनिं सलत सत्य ॥४३॥

॥ श्लोक ॥
हा पक्षपाती द्विज - निर्जरांचा ।
झाला बळें त्या शिशु कश्यपाचा ॥
एक्याच पादी अटवील सारी ।
भूमी तुला हें नुमजे सुरारी ॥४४॥
बलीनेम उत्तर दिलें,

॥ लावणी ॥
देंतो मी म्हणून बोललों यास एकदां ।
तें काय घेउं हो मागें भोगण्या पुढती आपदा ॥
रौरवा पितर जातात वचन भंगिता ।
ऐशी हो गुरुजी आम्हा तुम्ही नित्य नीति सांगता ।
वाटतें मखाचें फ़ळ लाधलें मला ।
पहा येथ भीक मागाया वैकुंठपती पातला ॥
मम भाग्य म्हणुन पाहिलें रूप गोमटें ।
गणु म्हणे भिमेच्या कांठीं जें उभें राहिलें विटें ॥४५॥
बली वामनास म्हणाला.

॥ आर्या ॥
घेई उदक करी हें दिधली तुजला त्रिपाद म्यां भूमी ॥
निज पदें मोजी देवा ! लाविन वानावया सुरा व्योमी ॥४६॥
दानाच्या संकल्पाचें पाणी वामनाच्या हातांवर पडूं नये म्हणून

॥ श्लोक ॥
झारींत केला कविनें प्रवेश ।
येऊं न दे तीमधुनी जलास ॥
तोटींत घाली मग दर्भ भोळा ।
फ़ोडावयासी कविराज डोळा ॥४७॥

॥ झंपा ॥
करीं घालिता उदक तो थोर झाला ।
कोण बटु मानितो मग तयाला ॥
एक पद योजुनी अखिल महि व्यापिली ।
सहज भेदी दुजें अंवराला ॥
तृतिय ठेवुं कुठें पद बली मी आतां ।
स्थान तें दाव तूं त्वरित मजला ॥४८॥
तिसरा पाय कोठें ठेवूं असें बलीस विचारतांच राणी विंध्यावली म्हणाली,

॥ श्लोक ॥
विंध्यावली लावुन नेत्रपाती । जोडी कराला करण्या विनंती ॥
बोले हरीसी प्रभुराज राया । माझ्या शिरीं ठेव पदा तृतीया ॥४९॥

॥ आर्या ॥
हें वच नातसुनेचें प्रह्लादासी बहूत मानवले ।
बाळे धन्य खरी तूं निज शिर देसी प्रभूस कान्हवले ॥५० ॥
वामनानेम विंध्यावलीस सांगितलें.

॥ पद ॥ ( नृपममता )
पति असतां स्त्रीजातिला । अधिकार मुळीं न दानाला । हे मुली ॥
( चाल ) तव तनू वेगळी नसे तिचा बलि असे धनी मग कसें ।
करावें सांग । नको मानूस माझा राग ॥ हे मुली ॥५१॥
मग बलीनें प्रार्थना केली कीं,

॥ श्लोक ॥ ( अश्वधाटी )
हरी ठेव माझ्या शिरीं आदरीं पाय गोदावरी जेथ वासा करी ।
बरी ही आली पर्वणी बा खरी सांग कोणा शिरी छत्र ऐशापरी ॥
अरी मी सुरांचा परी वैरियाच्यावरी ती कृपा कोण ऐशी करी ।
जरी ही तनू मृत्तिकेची खरी बा खडावा असो त्वत्पदाला तरी ॥५२॥

॥ आर्या ॥
अमुचें अम्हा मिळालें यांत कशाचें उदारपण साचे ।
पद तुमचें न विधीचें कमलेचें नच आहेत संताचे ॥५३॥
त्या विनंतीप्रमाणें विश्वरूप धारण केलेल्या वामनानेम बलीच्या मस्तकावर पाय ठेविला.

॥ दिंडी ॥
ठेवि पद मग बलीशिरीं देवराणा ।
हर्ष माये नच स्वर्गि निर्जरांना ॥
अंकीं त्याच्या बसवून पट्टराणी ।
बलिस बोले यापरी दंडपाणी ॥५४॥
वामनानेम बलीस आश्वासन दिलें कीं -

॥ पद ॥ ( मित्रा मम )
होशिल तूं इंद्र पुढती धनि दिवौकसा ।
दानशुर कुळिं न दुजा तुजपरी असा ॥
चाल बसू पाताळी नृपति तोंवरी ।
राहुन मी द्वारि तुझ्या करिन चाकरी ॥
जन्मुनि निजवंश तुवां जगतीं भूषविला ।
प्रह्लादा तूंच नातू शोभसी भला ॥
राहिलो मी तव ऋणांत फ़ेडुं त्या कसा ।
दासगणु म्हणत प्रभु हें निजमना पुसा ॥५५॥

॥ समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP