॥ आर्या ॥
श्रीहरिचा प्राणसखा होता द्विज एक ब्रह्मवेता हो ।
नाम सुदामा ज्याचें पदरीं दारिद्र्य बांधिलें ज्या हो ॥१॥
॥ कामदा ॥
संतती बहू जाहली तया । ना मिळे कधीं अन्न खावया ॥
नेसण्याप्रती शुद्ध वल्कलें । बसुनि भोंवतीं आरडतीं मुलें ॥३॥
॥ साकी ॥
कोणी ओढी दाढि करानें, कोणी कौपिन सोडी ।
कोणी त्यांच्या पडुन पाठिवर यज्ञोपविता तोडी ॥
जयहरि सुखकंदा । मेघश्याम मुकुंदा ॥३॥
सुदामदेवांनीं त्या मुलांच्या त्रासाला न कंटाळतां म्हणावें कीं,
॥ श्लोक ॥ ( भुजंग प्र. )
मुलांनो ! नसे सार अन्नांत कांहीं ।
जपारे जपा राम तो शेषशायी ॥
दयाळू महा तात तो या जगाचा ।
तया चिंतनीं शीणवावी स्ववाचा ॥४॥
हें ऐकून सुदामदेवाच्या कुटुंबानें मुलांस सांगावें कीं, “ अरे ! तुम्ही यांचें कांहीं ऐकूं नका. त्या कृष्णाच्या नांवानें कांहीं होणार नाहीं. हे जन्मभर त्यांचे भजन करीत आले पण चिंधीला महाग झाले आहेत.
॥ पद ॥ ( चंद्रकांता )
निराकार निर्गुण ब्रह्म परि सगुण केलें जनीं ।
या मायेनें, श्रेष्ठ म्हणुनि त्या पुरुषाहुनि कामिनी ॥
मेघ मेला ओंगळ काळा, झळकत सौदामिनी ।
डोळा पाही सर्व जगा परि, रक्षण करि पापणी ॥
पुरुषपणाला पुरुष पावला एक मिशीनें जनीं ।
कागदास ये किंमत जेव्हां वरति फ़िरे लेखणी ॥
ऐटबाज संजाप न शोभे शेंडीच्यावांचुनी ।
समशेररहित त्या म्यानाला हो ! करिं नच धरिती कुणी ॥
गोठ पाटल्या देति न शोभा एक नथेवांचुनी ।
लाल पांच मौक्तिक मण्यांमध्यें झळकतसे हिरकणी ॥
म्हणुन सांगतें नका भजूं तो द्वारावतिचा धनी ।
दासगणूचा तात विठोबा, माय रमा रुक्मिणी ॥५॥
“ तो कृष्ण जर तुमचा खरा मित्र असेल तर त्याला एकदां जाऊन भेटा. म्हणजे तो पुढची कांहींतरी सोय लावील. तुम्हांला जसा त्याचा अभिमान आहे तसा त्याला तुमचा आहे किंवा नाहीं हें समजेल. मित्राची योग्यता तर आपल्या शास्त्रांत फ़ार मोठी सांगितली आहे. ”
सुदामजी म्हणाले,
॥ पद ॥ ( श्रीमंत पतीची )
मी द्वारकेस जरि जावे । भेटीस काय तरि न्यावें ? ॥
( चाल ) हरि मागे काय त्या देऊं ? । का फ़जित तिथें मी होऊं ? ॥
दिनमुखें काय बोलावें ॥ भेटीस० ॥६॥
॥ ओवी ॥
पोहे घेऊन मुठभरी । निघाला सुदामा सत्वरी
द्वारावती पाहून नगरी । आनंद झाला अतिशय ॥७॥
॥ पद ॥ ( मित्रा मम )
पहातिल हे मदिय नयन आज श्रीवरा ।
पूर्णब्रह्म चिद्विलास शामसुंदरा ॥
धन्य धन्य धन्य जगतिं होय ही धरा ।
चरणाचा नित्य घडे हिजसि आसरा ॥८॥
॥ लावणी ॥ ( भला जन्म हा )
नगरी सारी रम्य, उपवनें वेष्टियली ही अती ।
हिजपुढें लोपेल अमरावती ॥
उंच, सुबक हे सौध गृहाचे गगनातें चुंबिती ।
चपलेसम गगनीं तळपती ॥
( चाल ) उडुगणीं निशापति गगनिं जसा शोभतो ॥
त्यापरी भव्य हा हर्म्य मधें दीसतो ॥
वा पुष्पवाटिके जसा सुरू साजतो ॥
हेमतुल्य हे शिवालयाचे कळस मधुनि झळकती ।
वाद्यें नानाविध वाजती ॥९॥
॥ श्लोक ॥ ( शार्दूलविक्रीडित )
झाला जो प्रभु मच्छ कच्छ भगवान् जो जानकीचा पती ।
योगी योगबळे जया हुडकिती, ज्या वेद वाखाणिती ॥
कालिंदी - तटिं क्रीडला शिशुपणीं गोपांस जो घेउनी ।
तो नंदात्मज कृष्ण येथ म्हणुनी तुभ्यं नमो मेदिनी ॥१०॥
॥ श्लोक ॥ ( वसंततिलक )
लाजेल तो मजसि मित्र म्हणावयास ।
या पाहतां अशुभशा धनहीनतेस ॥
वा यादवा ! मजसि ओळखिल्यास तूं रे ।
भो निंदितील जगतीं तुज लोक सारे ॥१२॥
सुदामदेव असा विचार करीत, काठी टेकीत व झोके खात चालले. तें पाडून द्वारकावासी लोक म्हणूं लागले:
॥ पद ॥ ( तमे गावो गावो )
तमे डोहा डोहा रे आवे क्यां जाव छो ।
तमे न माणस दारावतिमां भूत जणाव छो ॥
( चाल ) तारी वपू ये धनू बनी छे करमां लीधी काठी ।
जय नारायण मुंडा कीजो घरघर मांगो बाटि ॥१३॥
सुदामदेव म्हणूं लागले की, तुम्ही म्हणतां तसा आहे खरा !
॥ पद ॥ ( तम गावो गावो )
आर्जि सांभळो सांभळो रे आवे म्हारे बापजी ।
शामळियानें वळवा सारू डोहा आयवाजी ॥
( चाल ) परमात्मानें कीजो तारा बालमित्र सुदामजी ।
द्वारावतिमां आयवा राखो दासगणूनी बाजी ॥१४॥
तें ऐकून लोक हंसले व म्हणाले,
॥ श्लोक ॥ ( शार्दूल विक्रीडित )
वेड्या ! तूं धनहीनसा द्विज कुठें, कोठें रमेचा पती ।
सिंहाला जगतीं न जंबुक कदा स्नेही पहा शोभती ॥
ऐसा तो उपहास सर्व शहरीं झाला तयाचा खरा ।
काठी टेकित आक्रमी हळुहळूं तो बापुडा ती धरा ॥१५॥
॥ साकी ॥
राजगृहाच्या येउन द्वारीं भृत्यजनाला विनवी ।
मम मित्राला जाउन नाइक ! वदीं माझी द्यावी ॥
जय हरे सुखकंदा । मेघश्याम मुकुंदा ॥१६॥
राजदूत म्हणूं लागले, “ अरे ! तुझा मित्र या राजवाड्यांत कोण आहे ? तें सांग. ” त्यावर सुदामदेव म्हणतात:
॥ श्लोक ( पृथ्वी )
असे मदिय मित्र तो कमलनाभ भामापती ।
जयें वसविली जळीं परमरम्य द्वारावती ॥
जया जनक नंद तो, जननि ज्या यशोदा सती ।
तया हलधरानुजा मजसि भेटवा निश्चिती ॥१७॥
तें ऐकून राजदूत म्हणाले,
॥ छकड ॥
नको भकुंस भटा गांजा प्याल्यावाणी ।
नाहीं भिकारडा रे ! आमचा धनी । तुझ्यासारखा ॥
( चाल ) हिवर - गुलाबाची शोभे न जोडी ।
कोठें खोपट कोठें तिनमजली माडी ॥
सजण तुझा ना रे ! चक्रपाणी ॥ नाहीं भिकारडा ॥१८॥
॥ ओवी ॥
अर्धचंद्र देऊन । लोटिला सुदाम खालतीं जाण ।
धनहीनता न पावे मान । राजदरबारीं साच हो ॥
गचांडी खावूनहि सुदामदेव मनाशीं म्हणाले,
॥ श्लोक ॥ ( शा. वि. )
खाया ना मिळतें म्हणून तनुला पांडूरता ही आली ।
भस्माची नच त्यामुळें गरज कीं मातें प्रभो ! राहिली ॥
ल्यालों कौपिन, मस्तकावरि जटा, होता कमी चंद्रमा ।
तो येथें मज लाधला तव सख्या ! द्वारांत पुरुषोत्तमा ! ॥२०॥