॥ ओवी ॥
मग ते द्वादश आदित्य । वंदूनियां रुक्मिणीप्रत ॥
सर्वही स्वस्थानाप्रत । जाते झाले तेधवां ॥३६॥
इकडे अरणाहून आलेले वारकरी त्यावेळीं पंढरीत पोंचलेंच होते. ‘ त्यावेळीं,
॥ आर्या ( गीति ) ॥
होतां करीत कीर्तन श्रीहरिचें नामया महाद्वारीं ।
श्रवण कराया बसले ज्ञानेश्वर, तेविं अन्य वारकरी ॥३७॥
त्यांच्यामागें देव टाळ वाजवीत होते. ते श्रीनामदेवाला म्हणाले कीं
॥ दिंडी ॥
“ नामदेवा ! या वारकर्यां पूस । कां न अणिलें देवाचे वानगीस ?
अरे, यांनीं वाहिल्या व्यर्थ माळा । ढोंग दावुनि निज पोट भरायाला ” ॥३८॥
वारकरी म्हणाले,
॥ अभंग ॥
एक चार्वाक अभक्त । आम्हां भेटला रस्त्यांत ॥
त्याची पोर वेडी होती । भाजी घेऊनियां हातीं ॥
आली आम्हांसी द्यावया । म्हणे, ‘ न्या ही पंढरिराया ’ ॥
तीहि भाजी हलकी फ़ार । चुका, मेथी, कोथिंबिर ॥
आम्ही तीही ना आणिली । अवघी रस्त्यांत फ़ेंकिली ॥
कांकीं अभक्ताच्या वरी । देव कधीं ना कृपा करी ॥३९॥
॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
तो नष्ट पुष्ट पशु हो ! नरदेहधारी ॥
जो एकदांहि न अला करण्यास वारी ॥
कांसेंत गोचिड वसे परि त्या खलाला ॥
ना प्राप्त होय पय, शोषित शोणिताला ” ॥४०॥
नामदेव म्हणाले,
॥ आर्या ( गीति ) ॥
फ़ार बरें तुम्हि केलें, विठ्ठलचरणीं न प्रेम ज्या पशुचें ॥
त्याचें दर्शन होतां अपणांसी पाप ब्रह्महत्येचें ॥४१॥
अशाप्रकारेम श्रीनामदेवानें वारकर्यांना शाबासकी दिलेली पाहून, देवाला फ़ारच वाईट वाटले व तो श्रीनामदेवाला म्हणाला,
॥ पद ( भजो रे भैय्या राम गोविंद० ) ॥
नाम्या ! तुझी बुद्धिहि चळली खरी ॥ध्रु०॥
या नटव्यांच्या नादीं न लागे । समज तूं कांहीं धरी ॥
नुसत्या माळा घालुन कंठी । होइ ना वारकरी ॥
तुजसाठीं जिव तिळतिळ तुटतो । ज्ञानाची चढ पायरी ॥
फ़ळ भजनाचें तुजशि मिळालें । आतां वाचि ज्ञानेश्वरीं ॥४२॥
॥ श्लोक ( मालिनी ) ॥
परिसुनि वच ऐसें नामया रुष्ट झाला ।
थर थर सुटलासे कंप त्याच्या तनूला ॥
स्फ़ुरति अधर तेव्हां नेत्र वन्हीसमान ॥
हरिवरि मग त्यानें प्रेरिला शब्द - बाण ॥४३॥
॥ पद ( लावणीची ) ॥
पुरे तुझी संगती मला अरे ! निष्ठुरा ! ॥
ना खोड आपली देवा ! । टाकिली अजूनि तूं जरा ॥ध्रु० ॥
प्रल्हाद भक्त त्याचा तूं बाप मारिला ॥
वैधव्यरूप डोहांत । बुडविलें तसें जननिला ॥
होऊन भटाचें पोर बळी दडपिला ॥
आलास जियेच्या पोटीं । कांपिला तिचा तूं गळा ॥
एकवचनिं ढोंग दावून वालि फ़सविला ॥
राज्याची धरुनिया आस । जननिचा बंधु मारिला ॥
असे कितिक तुझे दुर्गुण सांगूं श्रीपति ! ॥
गणु म्हणे बोलला नामा । यापरी विठुस निश्चितीं ॥४४॥
हें ऐकून देव म्हणाले, “ नाम्या !
॥ श्लोक ( इंद्रवज्रा ) ॥
क्रोधोत्पलांची इतिहास - माला ॥ गुंफ़ावयासी तुज शीण झाला ॥
हीं तों फ़ुलें भारत - वाटिकेची ॥ जाऊन नाम्या ! अणिलींस साची ॥४५॥
श्रीनामदेव म्हणाले, “ देवा ! आम्हांला तुझ्या सत्स्वरूपाशीं कांहीं कारण नाहीं.
॥ पद ( लावणीची ) ॥
तव नाम असें तें सार उंसाचा रस ॥
ना अर्थ तुझामधि काळ्या । ! तूं साल निरस बाकुस ॥ध्रु०॥
नामेंच तरलि पिंगळा, अजामिळ हरि ! ॥
तरल्यात शिळा नामानें । सागरीं जलाच्यावरी ॥
अधिकारि नसुनि तारिल्या गोप - सुंदरी ॥
विठ्ठला ! तुझ्या नामानें । किति देउं दाखले तरी ! ॥
तव नामरूप द्रव्याचे आम्हि वारस ॥
गणु म्हणे खरें का खोटें । हें जाउनि व्यासा पुस ” ॥४६॥
देव म्हणाले,
॥ अभंग ॥
भक्त भक्तीचें चाहतें । मूल माझें तें रांगतें ॥
ज्ञानी माझें कर्ते पोर । माझा भार त्याचेवर ॥
रांगणें हें पुरें झालें । आतां पाहिजे चाललें ॥
कधीं होशील नाम्या ! थोर । हीच चिंता वारंवार ॥
दाढी मिशाचा ठेंगडा । रांगूं जातां म्हणतील वेडा ॥
गणु म्हणे, ऐशा रीतीं । देव भक्तां समजाविती ॥४७॥
इतकें ऐकून श्रीनामदेव म्हणाले,
॥ पद ( तूं टाक चिरून० ) ॥
जगिं आहे कुणाला ज्ञान । असे भगवान् ! ॥
हे त्वरित दाव आम्हांस । विठ्ठला ! नको करूं अनमान ॥ध्रु०॥
उपनिषदांनीं जें कथिलें । तें कळुनि कुणाला वळलें ? ॥
हरिरूप कुणा जग झालें ? । वाईट बर्या मग स्थान । नुरे मनि आण ॥४८॥
देव म्हणाले,
॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
अत्री, गौतम, गार्ग्य, कश्यप, कपी, मंडुक, मांडव्य ते ।
भारद्वाज, वशिष्ठ, काणद, भृगु, ब्रह्माप्रती जाणते ॥
झालासे नृप प्राणवाह, दुसरा, तो जानकीचा पिता ।
या सार्यांसम एक भक्त अरणीं आहे सखा सांवता ॥४९॥
॥ ओवी ॥
“ अमृतानुभव, ज्ञानेश्वरी । ज्ञानेशा ! तूं लिहिली जरी ॥
एक सांवत्यानें परी । अनुभव घेतला तयांचा ॥५०॥
॥ दिंडी ॥
सगुण निर्गुण हा भेद जया नाहीं । ज्ञान - भक्ती मिसळली एक ठायीं ॥
दिसत जें जें तें मीच दिसें त्याला । असा त्याचा मशिं ऐक्यभाव झाला ॥५१
असें देवाचें भाषण ऐकून उभयतांस त्या भक्तश्रेष्ठस पाहाण्याची इच्छा झाली. त्याप्रमाणें,
॥ ओवी ॥
नामा, ज्ञानेश, पांडुरंग । आले अरणासी सवेग ॥
पाहून सांवत्याचा मळा चांग । कौतुक करी परमात्मा ॥५२॥
दोघांना वाटेंत मुलीजवळ सोडून देव सांवतेबुवाकडे आले आणि म्हणाले,
॥ दिंडी ॥
चोर माझ्या लागले पाठिं दोन । लपवि माळ्या ? नातरी जाय प्राण ॥
ऊठ भाजी खुरपणे सोड आतां । मला निर्भय दे स्थान पुण्यंवता ! ॥५३
सांवतेबुवांनीं प्रभूच्या मुखाकडे पाहिले आणि ते म्हणाले कीं,
॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
बघून हरिच्या मुखा चरण वंदूनी बोलला ।
तुला लपविण्या नसे स्थळ मुळींच कीं विठ्ठला ! ॥
न ये लपवितां जसे मृगमदा सुगंधामुळें ।
तसेंच लपवूं कसें तुजप्रती मला ना कळे ॥५४॥
॥ आर्या ( गीति ) ॥
झाला देव निरुत्तर मुद्यासह पकडितां जसा चोर ।
भिजविति आनंदाश्रू हरिच्या हृदयावरील नव चीर ॥५५॥
॥ अभंग ॥
एक हृदयाची संदुक । तुज लपवायासी देख ।
ती ही आतां मी उघडितों । तेथें तुजला लपवितों ”॥
असें म्हणूनच सांवतेमहाराज थांबले नाहींत, तर त्यांनीं तत्काळ
विळा घेउनीया करीं । पोट चरचरां तो चिरी ।
गणु म्हणे पंढरिनाथा । ठेवी पोटांत सांवता ॥५६॥
इकडे श्रीनामदेव व श्रीज्ञानेश्वर बराच वेळ त्या मुलीच्या भजनाचें व जवळ असलेल्या मळ्याचें कौतुक पहात राहिले !
श्रीनामदेव श्रीज्ञानेश्वरास म्हणाले,
॥ कटाव ॥
हे ज्ञानेशा, पहा मळ्याशीं । नंदनवन हा भूप्रदेशीं । आलि वनश्री मुक्कामासी । एकवटोनी या ठायासी । मही नेसली शालू हिरवा । नयनमनोहर अवघ्या दुर्वा । जाइ चमेली दवणा मर्वा । उंच वाढले धरून गर्वा । ताडमाड शिंदाड पोफ़ळी । गर्वें फ़ुगली म्हणुनी झाली । बांधावरती वस्ती वहिली । निवडुंगाची संगत केली । फ़ुलझाडांच्या नाना जाती । एक हारिनें दृष्टिस पडती ।
मदनबाण निशिगंध मालती । बकुल मोगरा कुंद शेवती । पीत हारित पांढरा मनोहर । चांफ़ा तैसा गुलाब सुंदर । तगर कर्दळी गुलबाशीचीं । कण्हेर पुष्पें दों जातींची । मधुन मधुन योजना सुरूची । सतेज रोपें किति तुळशीचीं । धनी मळ्याचा वैष्णव दिसतो । पहा, तुळशिला कितितरि जपतो ! । परि बेलाला कधिं न विसरतो ! । सुमनस्वरूपें हरिला भजतो । फ़ळझाडांची गर्दी झाली । पानमळ्यांतुनि दिसति केळीं । पेरू, अननस, आम्र जांभळी । मोसंबीं फ़लभारें लवलीं । डाळिंबानें मातच केली ! ।
लिंबू, पपनस, चिक्कू, अंजिर । द्राक्षें खिरण्या संत्रिं मनोहर । फ़णस, पपय्या वानूं कुठवर । एक्या बाजुस भाजीपाला । मुळा दोडका वांगिं भोपळा । धेंडस पडवळ चवळी कोहळा । सुकाळ येथें दिसे रताळा । लसूण कांदा गाजर मिरची । चुका चाकवत खांच अळूची । थारोळ्याच्या सन्निध साची । आहे उंसाचा फ़ड जोरावर । चौबाजूला वेली सुंदर । फ़ुलें पीवळीं आलीं तयांवर । त्याच्यासन्निध मका लाविली । मध्यभागिं ती कणसें आलीं ।पाचोळ्यांनें झांकुन गेली । आहेत कणसा दाणे आले । हें तुर्यांनीं बोधित केलें । ऐसें वैभा पाहुन रुसला । भुईमूग तो महींत घुसला ! । तोंड दाविना पहा कुणाला । त्याची समजूत घालायासी । योग्य ठरविला एकादशीसी ! । आणिक ठेविलें नाक तयासी । या मानानें अतिशय फ़ुगला । फ़ुगला म्हणुनी चरकीं गेला ! । तैलरुपानें रडूं लागला । रडूं नको तूं किमपि बापा ! । तूंच उजळशी जगांत दीपा । अवघ्यांमाजि धूर्त बाजरी । मठ मूगाला कधिं न अव्हेरी । ही धान्याची माय साजिरी । म्हणुनि हिचें तें नांव सज्गुरा । विपुल आला गहूं हरबरा । शाळू शोभे भूप साजिरा । अमुक वस्तु येथें नाहीं । हें म्हणण्या नच जागा पाही । दासगणु तें कवनीं गायी । अवघें वदनी माय विठाई ॥५७॥
श्रीज्ञानेश्वर नामदेवास म्हणाले, “ श्रीनामदेवा,
॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
अले सकळ ते ऋतू मिळुनि या मळ्याभीतरीं ॥
फ़ळेम तशिंच ती फ़ुलें विलस्ती तरूंच्या वरी ॥
सभाग्य धनि कोण या कळत ना मळ्याचा असा ? ॥
म्हणूनि मज वाटतें मुलिस नामदेवा ! पुसा ॥५८॥
॥ ओवी ॥
इकडे नामदेव ज्ञानेश्वर । उभे राहून बांधावर ॥
कन्येप्रती समाचार । पुसूं लागले मळ्याचा ॥५९॥
मुलगी म्हणाली,
॥ ओवी ॥
या मळ्याचा मालक । विथु अमुचा पंधलपुलीं ॥ हो वितेवली ॥
मोथा उदाल देतो आम्हां । लोज पोताला भाकली ॥ तो श्लीहली ॥
त्याची वात मी पाहतें । इथं बसून बांधावली ॥ हो आज खली ॥
होता निलोप म्यां धालिला । त्यास सकालच्याअवसलीं ॥ कीं ‘ ये हली ! ॥
हें मुलीचे भाषण ऐकून श्रीनामदेवास अतिशय कौतुक वाटलें ! ते म्हणाले,
॥ दिंडी ॥
“ किती कन्या ही श्रेष्ठ ज्ञानदेवा ! । ‘ धनी माझा ’ म्हणतसे वासुदेवा ॥
व्यर्थ धरिला अभिमान अम्हीं रामा ! ” असें बोलुन कन्येस नमी नामा ॥६१
तें पाहून मुलगी म्हणाली,
॥ पद ( आतां महा मना. ) ॥
“ अहो काय हाय हे कलितां । पाय मुलीचे कसे धलितां ॥ध्रु०॥
बालकली तुम्ही आहां धन्याचे । न ये तूमची मज समता ॥
भणंग दुबळे आम्ही भिकाली । कला आम्हावल खली ममता ॥६२॥
नामदेव म्हणाले,
॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
“ ओंवाळुनी त्यजिन प्राण तुझ्यावरूनी ” ।
ऐसें वदून उचली तिज दोकरांनीं ॥
घेई कुके मटमटा तयिं नामदेव ।
“ बाई ! कुठें तव पिता ? मज शीघ्र दाव ” ॥६३॥
॥ ओवी ॥
नामदेव ज्ञानेश्वर । आले मुलीच्या बरोबर ॥
जोडून सांवत्यासी कर । स्तवूं लागले उभयतां ॥६४॥
॥ पद ( सवसे राम भजन ) ॥
सांवत्या अम्हां झणिं दाव । लपविला कोठें पंढरिराव ? ॥ध्रु०॥
हरि - विरहाच्या बुडवि न सागरिं । हो आमुची तूं नाच
बडे बडे ज्या शोधित फ़िरती । दाव तयाचा ठाव
दासगणु म्हणे असा असावा । श्रीहरिच्या पदिं भाव ॥६५॥
श्रीसांवतामाळी म्हणाले, “ थांबा. आमच्या गांवांत काल सूर्याची चोरी झाली ! तेव्हां तो सांपडला म्हणजे तुमच्या प्रश्नाचें उत्तर मी देईन. ” हें सांवत्याचें भाषण ऐकून, श्रीज्ञानेश्वर म्हणाले,
॥ दिंडी ॥
“ असे वदतां भलतेंच कसें आतां । सूर्य येइल चोरुन काय नेतां ? ”
तसें विश्वा लपविण्या कुठें ठाव ! । विश्वरूपीं का कीम तो वासुदेव ॥६६॥
श्रीसांवतामाळी म्हणाले,
॥ ओवी ॥
जो का असे लिहिणारा । तोच अहए खुरपणारा ॥
जग हा त्याचाच पसारा । कार्य, कारण कर्ता एक ॥६७॥
हें ऐकून श्रीज्ञानेश्वर स्मित - हास्य करीत श्रीसांवतेबुवाकडे पहात तटस्थ उभे राहिले ! श्रीनामदेव म्हणाले,
“ उगें न मज चाळवी त्यजि न सज्जनाची रिती ।
निजोंदरिं तुवां असे लपविला रमेचा पती ॥
म्हणूनि वरि वेष्टिला अससि तूं उरा कांबळा ।
कृतार्थ मज तो करो गणु म्हणे घन:सांवळा ॥६८॥
॥ अभंग ॥
सांवत्याच्या पोटांतून । आले बाहेर नारायण ॥
नामा धांबूनियां पायीं । आवडीनें ठेवी डोई ॥
आम्हां ठरविलें त्वां चोर । देवा आणुनि इथवर ॥
त्याचा शीण गेला आतां । संत सांवता भेटतां ॥६९॥
॥ ओवी ॥
मग ते देव भक्त । बैसले आनंदें मळ्यांत ॥
सांवत्याच्या कन्येप्रत । हर्ष न माघे अंतरीं ॥७०॥
या तिघांना पाहून, मुलेनें बापाला विचारिलें, “ बाबा ! हे कोण आहेत ? ” सांवत्यानेम सांगितलें, ‘ हा मध्यें बसलेला आपला मालक व हे दोघे तुझे काका आहेत. ’
इतकें ऐकून मुलीनें तिघांना नमस्कार केला व एक मक्याचें कणिस भाजून आणिलें व देवापुढें धरून ती म्हणाली,
॥ ओव्या ॥
“ ही भलीव कवली मका । म्यां भाजुन अनिली खली ॥ खा हली ” ॥ध्रु०॥
श्रीहरिच्या तोंडापुढें । असे म्हणून कणसा धरी ॥ निज करीं ॥७१॥
॥ आर्या ॥ ( गीति )
आला विठूस गहिंवर उचलुनि मांडीवरी तिला घेई ।
खाई कणिस मक्याचें कन्येसह माय ती विठाबाई ॥७२॥
मुलगी देवास म्हणाली,
॥ ओव्या ॥
आला ऊंस गालायला । आतां गुल्हाल लागेल हली ! ॥ ले लौकली ॥ध्रु०॥
तई अमुच्या मालकिनिला । गुल खायाला बलोबली । ले अन हली ! ” ॥७३॥
॥ दिंडी ॥
माय माझी सजगुला सवंगिताहे । तिला येते घेऊनि झणीं पाहे ॥
आइस दल्शन दीधल्यावीण देवा ! । नको जाऊं विथ्थला ! वासुदेवा ! ” ॥७४॥
तिची आई बाजरी वेटाळीत होती व तोंडानेम तिचें खालीलप्रमाणें भजन चाललें होतें;
॥ पद ॥ ( भलेरी )
“ नमन आधीं पंढरिराजा ! । जीवजंतुला आधार तुझा ॥
सजगुरा सवंगु ही तुझी पूजा । नामांत तुझ्या लइच मजा ॥न०॥
सुखी ठेवी तो सांवता भक्त । लेइन कुकु, पोतगळ्यांत ॥
याविण तुला मागणें नाहीं । आयुष्य माझ्या चुड्याला देई ” ॥७५॥
मुलगी म्हणाली, “ आई ! लवकल लवकल चल. नाहींतल आपल्या मल्याचा मालक निघून जाईल ! ”
सर्वांनीं प्रभूस हात जोडले आणि प्रार्थना केली कीं,
॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
भक्तींत अंतर तुझ्या कधिंही नसावें ।
मागें पुढें अमुचिया विठु तूं असावें ॥
त्वां ‘ भक्तवत्सल ’ अशा धरिलेंस नांवा ।
या दीन दासगणुला पदि दे विसांवा ॥७६॥
॥ आरति ( आरति भुवन सुंदराची ) ॥
आरति पंधरीश प्रभुची । कमलजापती विठ्ठलाची ॥ध्रु०॥
ठेविले चरण विटेवरती । सांवळी घन:श्याम मूर्ति ॥
गळ्यामधिं पुष्पहार रुळती । खुले त्यावरी वैजयंति ॥
( चाल ) लाजला पंच बाण ज्यासी । असें तें वदन, कमलसम नयन ॥
हरपलें भान पाहतांची । उभी ही माय अनाथाची ॥१॥
कटीला पीतांबर कसिला । अतुरी तिलक भव्य भाला ॥
मितीना अबिर गुलालाला । दर्शना संत - संघ आला ॥
( चाल ) झल्लरी टाळ वाजतांना । नाचती भक्त, प्रेम अत्यंत ॥
गुंतलेम चित्त हरिपायीं । गणुला पाव विठाबाई ॥२॥