॥ ओवी ॥
बडवे परिचारक पुजारी । डिंगरे दिवटे वेणारी ।
डांगे आणि कथेकरी । जमले भोंवतीं साहूच्या ॥३६॥
॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
बडवे -
आम्ही वंशज पुंडलीक मुनिचे बडवे अम्हां बोलती ॥
आहों मालक येथिंचे इतर ते आम्हांहुनी खालतीं ॥
यासाठीं उतरावयास अमुच्या गेहा चला लौकरी ।
ठेवूं तर्तुद इभ्रतीस तुमच्या साजेल ऐशी खरी ॥३७॥
॥ आर्या ॥
बेणारी -
बेणारी मि उपाध्या आहे प्रत्यक्ष पांडुरंगाचा ॥
कां कीं अर्चनसमयीं अमुचा अधिकार मंत्र म्हणण्याचा ॥३८॥
॥ श्लोक ॥
पुजारी : -
आम्ही पुजारी अमुच्या चलावे । गेहा, कुणाचे तुम्हि नायकावे ॥
पूजा अम्हांवांचुन होत नाहीं । श्रेष्ठत्व ऐसें अमुच्याच ठायीं ॥३९॥
॥ आर्या ॥
परिचारक : -
या अवघ्या माझारी परिचारक पाणिदार आम्हीच ॥
केवीं करील सांगे थोर हिर्याची बरोबरी कांच ॥४०॥
॥ दिंडी ॥
हरिदास : -
नामसंकीर्तन धर्म कलियुगांत । तोच अमुच्या करिं दिला असे सत्य ॥
श्रेष्ठ आम्ही हरिदास विठ्ठलाचे । नका ऐकूं तुम्हि बोल या कुणाचे ॥४१॥
शेवटीं साहू एका बडव्याच्याच घरीं गेला व त्यानें करगोटा करण्याकरितां उत्तम सोनार आणावयास सांगितलें, पण
॥ ओवी ॥
साहू पक्का वैष्णव । तया दृष्टी नावडे शिव
एकाद्यास असल्या नांव । शिवाचे त्या पटेना ॥४२॥
॥ पद ॥
शंकर सोनारास अणा जा, तो आम्हा नलगे
निळकंठ सदुशिवास आणा । तोहि पण नलगे
विश्वनाथ, गंगाधर, त्र्यंबक । हे कोणी नलगे
केशव नरहरि असल्या कोणी । जा आणा वेगें ॥४३॥
शेवटीं बडव्यांनीं आपसांत युक्ति काढली.
॥ अभंग ॥
एक लक्षाचें हें धन । आलें जाउं न द्या परतुन
शर्थ याच्या या हट्टाची । नांवें बदला सोनाराची
ऐशा करूनी विचारा । गेहीं आणविलें सोनारा
पण साहू बडव्याकडे उतरला म्हणून ज्या इतरांना मत्सर वाटत होता त्यांनीं हें बिंग उघडकीस आणलें.
गणु म्हणे जेथें दुही । तेथ कांहीं टिकणें नाहीं ॥४४
॥ आर्या ॥
साहू :-
वंशज तुम्हि थोराचे त्यांतुनि क्षेत्रस्थ भक्त श्रीहरिचे
यक्तिंचित् गोष्टीस्तव कां करितां ग्रहण व्यर्थ खोट्याचें ॥४५॥
॥ पद ( झंपा ) ॥
निघा रे निघा आपुल्याल्या घरीं जा
कुटिल योजूं नये कधिंच काजा
आहांत सेवेकरी फ़ूट तुम्हांतरी
राहणें ना बरी, गोष्ट समजा
द्वेष जेथें असें, दैन्य तेथें वसे
सौख्य कोणा नसे त्वरित उमजा ॥४६॥
॥ आर्या ॥
शास्त्री, शस्त्री, मंत्री, तंत्री, कुत्रीं मुळीं अनावार
यांचें कधीं न पटतें लवण दुधाला करील का रुचिर ॥४७॥
शेवटीं एकजण साहूला नरहरी सोनाराकडे घेऊन गेला व त्यास म्हणाला.
॥ पद ॥
हा रत्नखचित करगोटा । घे करावया नरहरी
तुजविना कुशल कुणिं नाहीं, सोनार पंढरपुरीं
( चाल ) डागाची घडणावळ, मिळेल पुष्कळ नांव होइल
बहुत दुरवरी । करि सोनें वजन लौकरी ॥४८॥
॥ पद ॥
साहू :-
नग ये विठ्ठलनाथना नग ये पंढरिनाथ ना
सारी रिते घडिने करले । सार्थक शेटी अपना ॥नग०॥
हूं गुजराथी मने द्क्कन की । कारागिरी देखाडना ॥नग०॥४९॥
तें ऐकतांच नरहरी म्हणाला : -
॥ श्लोक ॥
मी डाग हा मुळिंच रे घडणार नाहीं । थांबूं नकोस पळ एक घरास जाई ॥
तूं नित्य द्वेष करिसी प्रभु शंकराचा ॥ दावी न लोभ मजला घडणावळीचा ॥५०॥
नरहरीचें कुटुंब म्हणाले -
॥ पद ॥
निर्गुण, अमंगळ, भंगड स्मशानवासी
जोगडा, दिगंबर रागिट, दुर्गुणराशी ॥
केलात आपुला धनी कसें हें रुचतें
तो पीत भांग आणि तार तुम्हांला येतें
( चाल ) स्मरतुल्य वदन अपुलें हो पाहतां
त्या प्रती भस्म राखुंडा फ़ासिता
सुरुपाचें कुरूप होउनी बैसतां
आग लागो अशा या शैवपणाला बाई
जनरितीकडे द्या लक्ष तुम्ही लवलाही ॥५१॥
॥ ओव्या ( बायकी चालीच्या ) ॥
तुम्ही सोनार कारागिर, जन करती वाखाणणी ।
त्याचा उपयोग कांहीं, करा हा करगोटा घडवुनी ॥
शिव म्हसणवटिचें भुत, कोण घडवी त्या दागिना ।
त्याचा नाद सोडा झणीं, मी विनवीते साजणा ॥५२॥
॥ दिंडी ॥
आज वर्षें बारा तिं होउन गेलीं । बागेसरि ना तुम्हि कधिंच पेटवीली ।
हतोडा तो ठाइच्या ठाइं आहे । कुशलतेचें कांहिंच चीज नोहे ॥५३॥
॥ पद ॥
तांबोळी विकितो पानें । द्विज यवन तया सारिखा ॥
नदिमधिल नाव मज सांगा । कधिंतरी भेदू करित कां ॥
( चाल ) धंदा हा मेदिनीपरी, समज अंतरीं, धरा लौकरी ॥
ढंग हे टाका; पोटिं, बिब्बे घालूं नका ॥५४॥
॥ ओवी ॥
धंदा म्हणून अखेरी । केला सुंदर सर्वतोपरी ।
करगोटा पाहता अंतरीं । साहू संतोष पावला ॥५५॥
नंतर साहू पूजा करण्याकरतां श्रीविठ्ठलमंदिरात आला.
॥ पद ॥
राउळीं गर्दि ती फ़ार, झालि अनिवार, अला सावकार पूजनासाठीं ।
व्योमिं ती पातली यानें सुरांची दाटी ॥
वैदीक शास्त्रि पंडित, सोळखांबींत दक्षणा घ्याया
येऊन बैसले चित्तिं अतुर होउनियां ॥
मोठे मोठे, होते जे महंत मठाधिप सत्य तयांनीं केला
येतांच साहू मंदिरीं आरंभ भजनाला ॥
( चाल ) मंडपीं उभ्यां राहील्या माळणी
निजकरीं फ़ुलांच्या माळा घेउनी
हलवाइ बर्फ़िपेढ्यांला बहु अणी
हटो हटो शिपाई म्हणति गरीबा देति गचांड्या मार
गणु म्हणे धनाचा चहुंकडे जैजैकार ॥५६॥
॥ ओवी ॥
पूजा अवघी सांग झाली । करगोट्याची वेळ आली
तैं गोष्ट अघटित घडली । ती ऐका विबुध हो ॥५७॥
॥ दिंडी ॥
करगुटा तो बहु लांब अखूड होई । विठ्ठलाच्या कमरेस मुळिं न येई ॥
लोक सारे म्हणताति नरहरीला । काय जादू केलीस या नगाला ॥५८॥
नवस पुरा होण्यास करगोटा व्यवस्थित बसणें अवश्य होतें.
साहू नरहरीस :-
॥ पद ॥
आपू तमने हजार रुपिया जाते चालो जी ।
सारी रीते नग भगवतने पेरवा देवोजी ॥
चलु बापजी मने राजी कर आजी खुब मर्जी ।
हूं लागे है पगे तमारे ख्याल करनाजी ॥५९॥
॥ श्लोक ॥
नरहरी :-
न ये मि बघ मंदिरीं मदिय प्राण गेला जरी ॥
शिवाविण न पाहणें मजसि वस्तु ती दूसरी ॥
खरा भ्रमर जो असे रमत तो पगारावरी ॥
मरेल उपवासि हो परि तृणा न घे केसरी ॥६०॥
॥ पद ॥
साहू :-
जरि न येशि बसवाया डाग मंदिरीं ।
तरि देई नुकसानिस भरुन लवकरी ॥
तव नादें सोन्याचा नाश जाहला ।
गुजराथी मी न सोडि जाण कवडिला ॥
भक्तीचें ढोंग वृथा दावि ना मला ।
वदुनि असे फ़रफ़र तो ओढिला करी ॥६१॥
॥ ओवी ॥
झाला निरुपाय अखेरीं । डोळे बांधून नरहरी
श्रीविठ्ठलाच्या मंदिरीं । डाग बसविण्या निघाला ॥६२॥
तें पाहून लोकांना हंसूं आवरेना
॥ पद ॥
पहा पहा सूर्य पाह्याला । जसेम घुबड नयन झांकितें
बा बघुन शर्करेलागीं । डुक्कर मान मुरडतें
( चाल ) त्यापरीच हा नरहरी, कृतीही करी, चला लौकरी
मौज पाह्यला आहे पुरा मूर्ख समजला ॥६३॥
नरहरी करगोटा बसवूं जो जातों तों :-
॥ पद ॥
करगोटा बसवूं जातां । विठु लिंगाकारचि झाला
दशभूज पंचवदनाचा विटेबरी होउनी ठेला ॥
( चाल ) वामांकि असे पार्वती । तसा गणपति । मस्तकावरतिं ।
वाहते गंगा, गणु बोले जय शिव - लिंगा ॥६४॥
॥ आर्या ॥
करें चाचपुन पहातां वाटे ती साच दक्षिणामूर्ति ।
डोळें उघडुनि बघतां तोचि विठ्ठल उभा विटेवरती ॥६५॥
नरहरी देवावर रागावून म्हणाला :-
॥ झंपा ॥
पुरे रे पुरे खेळ हा नाटक्या रे
हराचे नको सोंग घेऊं वृथा रे ॥पुरे॥ध्रु०॥
धूर्जटी तो कुठें, चोरटा तूं कुठें ।
ऐकतां मन विटे चरित तव रे ॥
कृष्ण पहातां वरी तेविं हृदयांतरीं ।
कपट भरिलें हरि तूझिया रे ॥
थिल्लरानें स्वयें सोंग घेऊं नये ।
उदधि होऊं नये कधिंच बघ रे ॥
भूप - वेषा जरी बहुरूपी घे वरी ।
भीक मागे परी वदत गणु रे ॥६६॥
॥ श्लोक ( वसंततिलक ) ॥
संतापुनीं नरहरी सदना निघाला
द्वारांत नंदि परी तो अडवी तयाला
जाऊं नको गुह वदे परतोनि पाही
आराधदैवत तुझें तुजलागि बाही ॥६७॥
॥ श्लोक ॥
नरहरी बघतां परतोनिया । नरहरी शिवसा दिसला तया
हरिहरात्मक तें रुप गोजिरें । नरहरी करि वंदन आदरें ॥६८॥
॥ श्लोक ( चामर ) ॥
देव नरहरीस :-
ब्रह्म मीच मीच तेज वारि मीच मेदिनी ।
मीच व्योम वायु मीच मद्विणें नसे कुणी ॥
रुद्र मीच मीच विष्णु ब्रह्मदेव तोहि मी ।
स्वर्ग मृत्यु सर्व ठायिं पूर्ण एक मीच मी ॥६९॥
॥ अभंग ॥
धन्य धन्य हे लोचन । झालेम आद्याचें दर्शन
वंद्य सेव्य सकलां मतां । तूंच एक पंढरिनाथा
शिव विष्णु एकरूप । तो हा विठू माय - बाप
गणू म्हणे द्वैत गेलें । तत्त्व हातांसीं लागलें ॥७०॥
॥ पद ॥
जय जय परेशा, प्रभो पूर्ण ब्रह्मा ।
मला ने तुझ्या सत्वरीं सौख्यधामा ॥ध्रु०॥
उमेशा रमेशा प्रभो पंढरीशा
बरें तोडिलें द्वैतपाशास रामा ॥ज०॥
अतां मागणें हेंचि नारायणे
वरदकर ठेवणें दे विरामा ॥ज०॥
गणूदास बोले तुझें तान्हुलें मी
विठू माउले तारि दीनांस आम्हां ॥७१॥