भाग पहिला
॥ आर्या ॥
ऐकुन गोणाईचें वच किंचित हास्य माधवें केलें ।
दोष जनां नच देई तूंच खुळा म्हणुनि त्यास ठरवीलें ॥४१॥
हे ऐकून गोणाबाईला राग आला आणि ती म्हणाली : -
॥ पद ( प्रगटला कीं तेथें तेव्हां० ) ॥
जननी यशोदेनें तुजला, नंद गोकुलांत ।
खुळा म्हणुनि ठरवियेलें गोपसमूहांत ।
तोच खुळा सांगे गीता भक्त अर्जुनाशीं ।
तोच अतुल शहाणा करी त्या जगतिं उद्धवाशीं ।
तोचि धरिं अंगुलीवरती भव्य पर्वताशीं ॥
खुळा असुनि पळवी डोहीं कालिया क्षणांत ॥४२॥
म्हणून जसा यशोदेचा मुलगा जगांत शहाणा ठरला, तसाच माझा नाम्या ठरावा, अशी माझी इच्छा आहे. पण येथें उलटें झालें आहे.
॥ पद ॥
नंदपत्नीचा खुळा प्रतापी ठरला जगतांत ।
गोणाईचा खुळा चिवडतो चिंध्या सदनांत ।
नंदपत्निच्या खुळ्यास सारे जन वंदन करिती ! ॥
गोणाईच्या खुळ्यास बघुनि नाकेम मुरडीती !।
नाम्या माझा तूंच बनविला वेडा श्रीकांता ! ॥
लपंडाव हे वृथा नको करूं, गणु म्हणे भगवंता ! ॥४३॥
आतां जर माझा नाम्या लग्नाशिवाय राहिला, तर हें खाप्र तुझ्या डोक्यावर फ़ुटणार आहे ! ह्याचा तूं विचार कर. ”
॥ दिंडी ॥
बरें गोणे, जा लग्न पुढिल मासीं । नामयाचें होईल निश्चयेशीं ॥
मीच येतो पाहून सोयरीक । मनीच्या या चिंतेस झणीं टाक ॥४४॥
हें ऐकून गोणाबाई देवाला नमस्कार करून घरी गेली आणि देव रुक्मिणीला घेऊन नामदेवाला सोयरिक पाहण्यासाठीं निघाले.
॥ श्लोक ( स्रग्धरा ) ॥
कल्याणीं एक होता, परम धनिकसा, नाम गोविंदशेटी
राजाई नाम जीचें, सुबक वरतनु, कन्याका एक पोटी ॥
होती त्या भाग्यशाली, तिजप्रति हरि हा, मागणें घालण्याला
आला घेऊनि संगे, सुमुनिम बनुनि, भीमजा भीमकाली ॥४५॥
देव मुनीमाच्या वेषानें कल्याण - कलबुर्ग्याला आले. कल्याणाला जाऊन देवानें गोविंदशेटीचा भेट घेतली आणि म्हणाले,
॥ आर्या ॥
दामाशेटी नामें, पंढरीचे सावकार श्रीमंत ।
त्यांचा मुनिम असे मी, मज म्हणती लोक पंढरीनाथ ॥४६॥
॥ दिंडी ॥
आहे लग्नाचा एक पुत्र त्यासी । सुबक सुंदर शाहणा गूणराशी ॥
वर्ष आठवें नुक्तेंच लागलें हो । तुम्हि आपुला जामात त्या करा हो ॥४७॥
॥ श्लोक ( शार्दूल विक्रीडित ) ॥
दामूशेट धनीक त्यास कधिंही शोंभे न मी सोयरा ।
कोठें गार नदीमधील विबुधा कोठें वदे तो हिरा ! ॥
कोठें ओहळ गांविचा वद कुठें, ती माय गोदावरी ! ।
शालीचा सहवास कोठुनि जगीं पोत्यास व्हावा तरी ? ॥४८॥
हें ऐकून देव म्हणाले,
॥ झंपा ॥
मुळिं न ऐशा करी भाषणाला ॥ध्रु०॥
हीन असुनी खरा । तोच बघ सोयरा । सासरा नगपति शंकराला ॥
सागरानेम दिली । कन्यका ती भली । इंदिरा आपुली केशवाला ॥
म्हणुनि अत्यादरें । देइ कन्या त्वरें । दामशेटीचिया नामयाला ॥४९॥
॥ आर्या ॥
रमेंउमेसम आहे, तव कन्या भाग्यवान राजाई ।
घर चालत स्थळ आलें, मोठ्याचें तें न दवडणें पाहीं ॥५०॥
हें ऐकून गोविंदशेटी म्हणाले,
॥ पद ( आलीस तूं फ़ार बरें झालें० ) ॥
भीति वाटत मज हेची । सरबराई होईल कैशी । मम करें थोराची ॥
प्राप्ती झाल्या गजपतीची । चार्यासाठी लागेल करणें विक्री सदनाची ॥
( चाल ) आणा आधिं हें ध्यानाम्त ।
मी नच तितुका श्रीमंत ।
आहे धन पोटापुरतं ।
आणिक मज कच्चीबच्ची । आहेत पोटीं काय करूं हो ।
वाट वदा त्यांची ? ॥५१॥
हें ऐकून देव म्हणाले, तुम्ही त्याची भीति मुळींच बाळगूं नका. तुमच्या स्थितीला शोभेल अशाच तर्हेनें आमचे शेटजी येतील.
॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
येतील शेट अमुचे गरिबासमान ।
होऊनिया क्षणभरी, करण्यास सून ॥
राजइला, धरूं नको विबुधा कशाची ।
भीति मनीं, तशि दुजी वरदक्षिणेची ॥५२॥
॥ पद ( अरसिक किती हा शेला० ) ॥
करण्या लाग तयारी । या लग्नाची, मानुनी थोरी ॥
मंडप मोठा घाला । बोलावुन घे सुहृद् जनांला ॥
न्याया नवरमुलासी । पालखी पाहिजे सुंदर खाशी ॥
वाद्ये सर्वप्रकारीं । लग्नीं असावी चामरचौरी ॥ध्रु०॥
हें ऐकून गोविंदशेटी म्हणाले, “ हें सुद्धां माझ्या हातून होणें शक्य नाहीं.
देव म्हणाले, “ बरें बाबा, राहूं दे. तुला वाटेल तसें कर. आतां तुझ्यासाठीं.
॥ ओवी ॥
शेट शेटाणी नवरदेव । चौथा मुनीम मी पंढरीराव ॥
येऊं तयारी सर्व ठेव । न्यून न पडो दे कशाचें ॥५४॥
गोविंदशेटी म्हणाले,
॥ पद ( चाल - भाग्यवंत मम नणंद० ) ॥
शें दोनशें तरी आणा हो । वर्हाड संगातीं ॥ध्रु०॥
अतिशय भारी नको मुनीमजी । वा अतिशय कमती ॥
माझ्यानें, झेपेलसें । नांवाला साजेलसें ।
घेऊन यावें लग्न । तुम्हांला ही आमची विनती ॥५५॥
देव म्हणाले, “ आतां मात्र अडचण आली !
॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
आहे नोकरवर्ग थोर अमुचा, कोणा वदे त्यांतुनी ॥
सोडावें, सगळ्यां समान गणितो, लोकांस माझा धनी ॥
होणारें इतुकेंच एक अवघें, हें कार्य त्याच्या घरीं ॥
त्याला इच्छित बैसलेत सगळे, आश्रीत अत्यादरीं ॥५६॥
॥ दिंडी ॥
म्हणुनि म्हणतो चौघेच अम्हि येऊं ।
जें तुं कांहीं करशील त्यांत राहूं ॥
अम्ही राजी, घे वचन तुला देतो ।
नको दवडूं हा योग अलेला तो ॥५७॥
मागणें घालण्याचा विधी संपला आणि देव पंढरपुराला परत आले व दामाशेटीला म्हणाले,
॥ ओवी ॥
दामाशेटी कारण । देव करिती भाषण ।
आलों आहे ठरवून । लग्न नामदेवाचें ॥५८॥
॥ कटिबंध ॥
गोविंदशेटिची पोर । आहे सुंदर । नाम साचार । जिचें राजाई ॥
योजिली असे नाम्यास, वधू ती पाही ॥ध्रु०॥
चल करण्या साखरपुडा । व्याही फ़ांकडा । असे कानडा । धनिक अत्यंत ॥
पालख्या म्याने गजवाजी द्वारीं झुलतात ॥
( चाल ) शोभेल तयाच्या नांवा, यापरि ॥
लग्नाची करी तयारी लौकरी ॥
महावस्त्र सुनेला घ्याएं भरजरी ॥
दागिने हिर्यामोत्याचे । करी सोन्याचे । थोर किंमतीचे । सढळ करी हात ॥
बसूं नको आतां गाफ़ील जवळ आली तीथ ॥५९॥
हें देवाचें भाषण ऐकून दामाशेटी हंसले आणि म्हणाले,
॥ लावणी ॥ ( तेंच म्हणावें भजन हरीचें० )
मोती हिरे हे शब्दचि पडले, नुस्ते कानावरी ॥
पाहिलें सोनें सराफ़ा घरीं ॥ध्रु०॥
महावस्त्राचे ठायीं आम्हांला । बांड नगरचा हरी ॥
आणावे कुठुन जरीचें तरी ॥
( चाल ) खायास मिळेना भाजीभाकर, पुरी ॥
मी हीन जफ़ल्लक शिंपी पंढपुरीं ॥
लग्नास कसा मी जाऊं इतक्या दुरी ? ॥
गाडीघोडे कांहीं नसे कीं, वाहन आमुच्या घरीं ॥
दासाचें हांसूं उगे ना करी ॥ध्रु०॥६०॥