॥ श्लोक ( मालिनी ) ॥
फ़िरत फ़िरत आले योगि अंबापुरीला ।
चकित सकल झाले लोक पाहून त्याला ॥
उचित स्थाल नसे हें तूजबा राहण्यासी ।
म्हणति जन असें त्या योगयोगेश्वरासी ॥४१॥
तळ्यावर काम करीत असलेल्या साधूंनीं त्यांना पाहिलें. आपल्या हालअपेष्टांवरून त्यांना मुकुंदराजाच्या भावी दु:खाची कल्पना व कींव येउन ते त्याला म्हणाले.
॥ पद ॥ ( ताल - त्रिवट )
तनु किति ही कोमला ॥
लाजवितिल हे, मउ कर तव त्या, कासारीं नलिनिला ॥धृ०॥
( चाल ) येथें राहतां टिकाव येइल । याच करीं मग सुकून जाइल ॥
तनू बिकट हें काम न होइल । राजदूत देतील मार ॥
म्हणुनिया जा मुला ! तनु० ॥
साधुसंत व त्यांचे राजाकडून असे हाल, ही गोष्ट मुकुंदराजांना खरीच वाटेना, ‘ समर्थाचिया सेवका वक पाहे । असा सर्व भूमंडळीं कोण आहे ॥ ’ या बाण्याचे मुकुंदराज साधूंना म्हणतात,
॥ पद ॥ ( हाणामारा ठोका० )
तुम्ही विसरला असाल रामा, म्हणून कामा नृप लावी ।
नामस्मरणा करा हरीच्या, सकल संकटें तो नुरवी ॥
( चाल ) - सति कयाधुनें, वीष दीधलें । निजसुतास तें अमृत जाहलें ।
त्या गोष्टीला आणुन ध्यानीं, टिकाव खोरीं फ़ेंकुन द्या ।
राजदूत हे कसे मारिती, हें तरि मजला पाहूं द्या ॥४३॥
साधु ( मुकुंदराजास ) -
॥ श्लोक ॥ ( भूजंग प्रयात )
दिलें मोजुनी काम आम्हां नृपानें ।
पुरें तें न झाल्या पुजा चाबुकानें ॥
इथें येउनी अस्तमानीं करील ।
नृपाचीच ‘ री ’ दूत हे ओढतील ॥४४॥
मुकुंदराज ( साधूंस ) -
॥ पद ॥ ( जाके मथुरा )
हरिच्या विषयी साशंकित मन, तुमचें मज कळलें ।
म्हणून पडला येथें येऊन, हाल भोगित सगळे ॥
प्रल्हादास्तव असुरसभेसी, लांकुड गुरगुरलें ।
दासगणु म्हणे रामकृपेनें, धोंडे जलिं तरले ॥४५॥
॥ श्लोक ( शार्दूल विक्रीडित ) ॥
आपोआप टिकाव हो ! महिप्रती, लागेल खांदावया ।
केल्यासी हरिनें कृपा भरिल कीं खोरेंच मातीस या ॥
निष्ठा ठेवुन शुद्ध यास्तव भजा, श्रीपादपद्मांप्रती ।
ना दे दु:ख पुन्हां तुम्हाम खचित तो बोले गणू श्रीपती ॥४६॥
परमेश्वराला सर्वस्व वाहिल्यावर मग दु:ख मुळिंच होणें शक्य नाहीं. याची प्रतीति दाखविण्याचें उद्देशानें मुकुंदराज म्हणाले,
॥ पद ॥ ( तूं टाक चिरुनि० )
जगदीश जगत् झाला, आहे मग कां रे ! संशयाला ।
घेतसा तयाचे विषयीं मुखानें रामराम बोला ॥
या बैसा येउनि येथ । आठवुन तो पंढरिनाथ ।
जो जगत्रयाचा तात । भगवंत सौख्यकारी ॥
तारि तो । कधिं न तुम्हां मारी ॥४७॥
असें म्हणतांच सर्वांनीं खोरी, कुदळीं, फ़ावडीं टाकून एकत्र बसून भजनाला आरंभ केला. तोंच चमत्कार असा झाल की, खोरीं, कुदळीं फ़ावडीं आपोआप आपापलीं कामें करूं लागलीं, हें आश्चर्य पाहून, -
॥ आर्या ॥ ( गीति )
राजदूत सांगाया, गेले राजास राजवाड्यासी +
म्हणती; ‘ एक तळ्यावर, आला योगी प्रभातसमयासी ’ ॥४८॥
॥ पद ॥ ( गुन्हेगारी ध. )
राजदूत ( राजास ) -
अधिकारी महायोगि आहे सरकार ।
कोणिं न धरितां टिकाव खोरीं, खोदुं लागती जी ॥
ढीग मातिचे भरून करिती, क्षणांत पाट्या पार । अ.
बालार्कापरि गोरि गोमटी, सुंदर मूर्ती फ़ार ॥
लागेल घ्यावी पाहुन त्याला मदनासी माघार ॥ अ. ॥४९॥
॥ श्लोक ( मालिनी ) ॥
अतुर नृप वचें या होउनी फ़ार गेला ।
सजवुन मग वारू त्यावरी स्वार झाला ॥
पवनगतिस वाटे अश्वही जिंकण्याला ।
करुन मनिं विचारा, फ़ार भर्धांव गेला ॥५०॥
तळ्यावर येतांच राजाला इतरांनीं सांगितल्याप्रमाणें प्रत्यक्षच तो चमत्कार पाहण्यांत आला, व दुसरीकडे त्यानें पुढीलप्रमाणें हरिभजनाचा प्रेमळ प्रसंग पाहिला -
॥ पद ॥ ( तूं सगुण० )
मध्यें मुकुंदराज भोंवतालिं लोक बैसले ।
वदनानें पांडुरंगाचें सप्रेम भजन चाललें ॥
माती ना नेत्रिं प्रेमाश्रु - पूर चालले ।
प्रत्येक जणाच्या त्यांनीं हृदयिंच्या पटा भिजविलें ॥
( चाल ) टिकाव खोरिं भरभरा, खोदिती धरा खंड ना जरा, ।
दासगणु बोले, भूपास नवल वाटलें ॥५१॥
॥ अश्वघाटी ॥
राजा दिवाणा पुसें हें असें गौडबंगाल गा, तें न कांहीं कळे, ।
ऐसी कृती योगि हा जो करी ती असावी पहा साबरीच्या बळें ॥
ना सार याच्यामध्यें अल्पही, ब्रह्म जो दाखवी तोच साधू खरा ।
भागे तृषा कां वदा या जगीं सेविलीया वरी रोहिणीच्या निरा ॥५२॥
राजाला राहवेना, तो साबरी विद्येला किंवा सिद्धीच्या चमत्कारालाहि भाळणारा नव्हता. लागलीच त्या ठिकाणीं येऊन मुकुंदराजाला त्यानें नमस्कार केला व हात जोडून विनंती केली कीं -
॥ पद ॥ ( नृपममता० )
तपतेज मइना अंगा, मग कां हो करितसा ढंगा, व्यथेचि ॥
( चाल ) दाखवा ब्रह्म - अनुभव, कृती त्या वाव, यावरी भाव ॥
वसेना माझा । हे योगी मुकुंदराजा ॥ गणु म्हणे ॥५३॥
‘ तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ’ या गीतोक्तीप्रमाणें राजानें ब्रह्मजिज्ञासा व्यक्त केली खरी. परंतु नामधारकांचा त्यानें सत्तेच्या बळावर छळ केला होता, त्यामुळें मुकुंदराजांना फ़ार फ़ार वाईट वाटलें होतें, म्हणून ते राजाला म्हणाले -
॥ पद ॥ ( आलीस तूं फ़ार० )
तर्हा ही नच बा पुसण्याची ।
ब्रह्मानुभवही काय असे रे, वस्तू बाजारची ॥
केली शिकस्त यत्नाची ।
बड्यावड्यांना परि ना झाली ओळख तत्त्वाची ॥
( चाल ) जेव्हां नृप मद हा चढतो ।
जेव्हां विचार मावळतो ।
अपुल्या गुर्मित तो राहतो ।
पर्वा नच त्या कवणाची ।
दासगणु म्हणे, ऐसें नृपपण, खनि अन्यायाची ॥५४॥
मुकुंदराज ( राजास ) -
॥ श्लोक ( शार्दूल विक्रीडित ) ॥
सद्वस्तू अति सोवळी खलजना ती भेटते ना कधीं ।
बैसाया कधिं इच्छि का कुलवधू वारांगनांच्या मधीं ॥
राहे लांबचि राजहंस विपिनीं कागावली पाहतां ।
देतां ये पयपात्र तें नच कधीं बा दारुड्याच्या हतां ॥५५॥
मुकुंदराजास ( राजास ) -
॥ दिंडी ॥
तुम्ही राजे रयतेस छळायाचे ।
अहा कीं रे ! प्रत्यक्ष चरक साचे ॥
बर्या वाइट गोष्टींस ना पहतां ।
स्वार्थ अपुला साधून मात्र घेतां ॥५६॥
मुकुंदराजास ( राजास ) -
॥ श्लोक ॥
नृत्यागरें बांधिति नाचण्याला । जे वारुणीच्या नित संगतीला ॥
वारांगनेच्यावरि प्रेम फ़ार । ते ना नितीचे नृप कर्णधार ॥५७॥
राजा ( मुकुंदराजास ) -
॥ पद ( चाल - लावणी ) ॥
अस्तास जयीं दिनराज नभीं जातसे ।
तेव्हांच निशीच्या सार्या वैभवा जोर येतसे ॥धृ०॥
( चाल ) म्हणूनियां नृपाकारणें, दोष नच देणें, मनीं ।
शोधणें, आटल्या नीर । बसे तडागांत सूकर ॥५८॥
मुकुंदराजास ( राजास ) -
॥ श्लोक ( मालिनी ) ॥
दिवस रजनि ऐसे भेद कीं व्हावयाला ।
कुणि नच दुसरा तो सूर्यची मूळ झाला ॥
भयद तममयी ही यामिनी दीन होते ।
दिनपति रवि जेव्हां येत प्राची दिशेते ॥५९॥
॥ ओवी ॥ स्वानुभवी साक्षात्कारी । साधुसंत सूर्यापरी ॥
परिस जो का तोच करी । सुवर्ण लोहाकारणें ॥६०॥