मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीरोहिदास चरित्र ३

श्रीरोहिदास चरित्र ३

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ ओवी ॥
पृथ्वी मोलाचें कंकण । घेऊन तो ब्राह्मण ॥
रोहिदास चुकवून । पाही जाया गेहातें ॥४१॥

॥ दिंडी ॥
राजरस्ता सोडून पुण्यावंता । आडमार्गें या कां हो व्यर्थ जातां ॥
मोट शिवण्या शेतांत या निघालों । परी पाहुनि आपणास स्थीत झालों ॥

॥ लावणी ॥
जान्हवी जन्हुजा गंगा । महापातकसंहारिणी ॥
आणण्यानें जियेच्या केलें । भगिरथें जया निजऋणी ॥
( चाल ) भागिरथी माझी आई, तिनें शिवराई, घेउनि मज कांहीं ॥
प्रसाद दिधला कां । तें सांगा चोरूं नका ॥४३॥

॥ आर्या ॥
परत निघालों त्या दिनीं पैसा तव मी जलांत सोडियला ॥
परि त्याबद्दल द्याया तुज गंगेनें प्रसाद नाहिं दिला ॥४४॥

॥ श्लोक ॥
जलमयी अवघी सरिता असे । जल जलाविण अन्य न देतसे ॥
म्हणुनि ना भलती करि वल्गना । समजलें, मज तूं दिड शाहणा ॥४५॥

॥ साकी ॥
कोट्यावधि त्या मोहरा पुतळ्या खर्चुनी जन काशीला ।
गेले परि ना प्रसाद मिळला जान्हविचा कवणाला ॥
मात्र तूं पैशासी । देउनि प्रसादा इच्छिसी ॥४६॥
असें ऐकल्यावर रोहिदास म्हणाले -

॥ पद ॥
असें भलतें होइल कसें, माय जी असें, आपुल्या पोरा ।
ती कधिं न विसंबे जरा ॥
पक्षिण फ़िरे गगनांत, पिलूं घरट्यांत, तयाला चारा ।
घालि; फ़िरे भंवति गरगरा ॥
मी तान्हें भागीरथिचें, बहुत मोठ्याचें, आणा विचारा ।
गणु म्हणे अहो द्विजवरा ॥४७॥

॥ पद ( हा काय तुमचा ) ॥
जो कां ब्राह्मण तो कां वेड्या खोटें कधिं वदतो ।
अगरुसार चंदनोदरांतुनि दुर्गंध न निघतो ॥
( चाल ) उंस अपुला गोडपना, टाकिल ना, जगिं जाणा ॥
सत्य बोलणें याच गोष्टिला धर्म गणू म्हणतो ॥४८॥

॥ ओवी ॥
ऐसें बोलतां ब्राह्मण । रोहिदास घाली साष्टांग नमन ।
तयास उजवें घेउन । गेला मोट शिवावया ॥४९॥
रोहिदास आपल्याशींच म्हणूं लागले कीं,

॥ पद ॥
अय मन मेरे ख्याल करो कुछ, सब दुनियामे गिरिधारी ।
भरा हुवा है साची झुटी बात किसनसे नहिं न्यारी ॥
जो करना तो तूं कर साचा कहे न किसी कूं बुरे भले ।
दवरे कुत्ते भागे गद्धे, हाती अपनी चाल चले ॥
जिसके मुवाफ़िक उसकूं देकर अपना आपही नटता है ॥
पदकूं जूता सिरकूं पगडी लफ़्जभेद दिखलाता है ॥
भेदभुद्धिकू छोडो मन तुम जाकर भगवतसे मिलना ।
दासगणू कहे तेरा मेरा ये मूंसे ना कभि कहना ॥५०॥

॥ अभंग ॥
कृष्ण माझी रापी, वासुदेव आरा ।
केशव तो दोरा शिवणें तोची ॥
पांडुरंग कुंडा, नरसिंह हें पाणी ।
मेण चक्रपाणी झाला अंगें ॥
कातडें, ठोकळा त्याचेंचि स्वरूप ।
भरला मायबाप विश्वीं माझा ॥
ऐसा शुद्ध भाव श्रीरोहिदासाचा ।
थकली गणुची वाचा वर्णितां त्या ॥५१॥

॥ आर्या ॥
मग तो ब्राह्मण गेला कंकण घेउन पुढें नृपापाशीं ।
म्हणतहि अमोल वस्तु संग्रह करण्यास योग्य आपणासी ॥५२॥

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
रायें कंकण घेतलें द्विजवरा देऊनिया मोल तें ।
ज्या मोलें द्विज पावला निज मनीं भारी समाधान तें ॥
राज्ञीनें मग घातिलें अतुरतें त्या कंकणाला करीं ।
आलिंगूनि म्हणे नृपाप्रति, ‘ दुजें द्याहो ! गडे लौकरी ’ ॥५३॥

॥ पद ॥ (  हा काय )
नाहीं दुसरें म्हणतां ही तों कपटकृति आपुली ।
कंकण वस्तु जोडीवांचुन कशि जाइल घडली ॥
( चाल ) सवतीतें, देण्यातें, कंकण तें, जरि नृपते ! ।
ठेविलें असलें तरि हें घ्या हो ! तिच घालो मेली ॥५४॥

॥ पद ॥ ( भैरवी )
शपथ तुझ्या कंठाची । सखये ॥ध्रु०॥
कंकण देण्यामाजिं न केली ।
कपटकृती म्या साची ॥
एकचि आलें तें तुज दिधलें ।
गृहिणी तूं प्रेमाची ॥५५॥

॥ आर्या ॥
झिडकारुनि भूपतिचा कर, कोपें दूर राज्ञि ती झाली ।
वर्षांकालिं घनाच्या करपाशांतुनि वीज जणुं सुटली ॥५६॥

॥ ओवी ॥
अशक्य मिळण्या जें सुंदरी । तें तूं मागशी कैशापरी ।
योग्यायोग्याचा अंतरीं । विचार कांहीं करावा ॥५७॥

॥ लावणी ॥
अशक्य जें हो मिळवाया । त्यालाच भूप मिळविती ॥
ना शक्ति जयाच्या ठाईं । ते माधुकर्‍या मागती ॥
( चाल ) धरिलेंत कशाला तरी, खङ्ग तें करी, त्यजा लौकरी ॥
वृथा अडचण । लावा भालिं गोपिचंदन ॥
कृष्णानें सांदिपनीचा । मृत पुत्र परत आणिला ॥
आणियलें स्वर्ग - गंगेला । भगिरथें पहा महितला ॥
( चाल ) भीमानें ऐरावर, आणिला साक्षात, कंकणाप्रत ॥
तसें तुम्ही आणा । गणु म्हणे तरिच नृपपणा ॥५८॥
॥ आर्या ॥
हा राज्ञी वावशर त्या समरशराहूनि दु:ख दे मोठें ।
कोपें तत्प जहाला भूपति प्रलयाग्नितुल्य तैं वाटे ॥५९॥
हें राणीचें बोलणें ऐकून राजाला फ़ार राग आला व त्यानें शास्त्रीबुवाला शिपायाकडून पकडून आणलें व म्हणाला कीं,

॥ ओवी ॥
जोडी या कंकणाची । आणूनि दे शीघ्र साची ॥
ना तरी तुझ्या प्राणाची । समज होळी जाहली ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 18, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP