मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
हरण २

वत्सला - हरण २

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ कटिबंध ॥
वृक्षासि वृक्ष लागले, फ़िरती वनिं भले, असुर विक्राळ ।
पातले रथापासिं ते भक्षण्या बाळ ॥
( चाल ) बोलती एकमेकांला पाहुनी ।
‘ आपणा मेजवानी ही या वनीं । ’
खावया धांवले तोंडा वासुनी ।
त्यामुळें बाळ कोपला, बाण प्रेरिला, महा अनिवार ।
गणु म्हणे जाहले सकल असूर ते ठार ॥२१॥
आपणांस भक्षण्यासाठीं राक्षस येत आहेत असें पाहून अभिमन्यूनें बाणामार्गे बाण सोडून त्या राक्षसांचा निकाल केला.

॥ आर्या ॥
धर्मानुज भीमाचा तनय घटोत्कच शिशू हिडिंबेचा ।
होता नायक त्यांचा नृप तेथींचा बलाढ्य धीराचा ॥२२॥

॥ दिंडी ॥
तयालागीं वृत्तांत हा कळाला ।
रथारुढ तो होऊन शीघ्र आला ॥
झुंजण्यासी त्या पार्थ - कुमारासी ।
बाण योजुनियां तीव्र धनुष्यासी ॥२३॥

॥ श्लोक ॥
घटोत्कच म्हणे मुला ! मदिय भक्ष्य तूं साजिरा ।
नसे उचित हें तुला मजसि दावणें या दरा ॥
दिमाख कपिचा टिके लव न मारुतीच्या पुढें ।
विहंगपतिच्या पुढें कुठुनि कोंबडें तें उडें ॥२४॥

॥ ओवी ॥
शक्ति सोडून प्रखर । पाडिला पार्थाचा कुमार ।
धडापासून वेगळें शिर । जाहलें अभिमन्यूचें ॥२५॥
युद्धांत अभिमन्यु मृत होऊन पडलेला पाहतांच सुभद्रेनें मोठ्यानें टाहो फ़ोडला !

॥ पद ॥ ( अजि अक्रुर हा )
हा हतदैवा ! संकट हे ओढवलें । मम बाळ रणीं या पडलें ॥
( चाल ) कथु काय आतां धर्माला ।
तैसेंच तुझ्या जनकाला ।
भाउजी प्रबल भीमाला ।
मी माय न, वैरिण झालें ॥ हा हत दैव० ॥२६॥
त्या कठीण प्रसंगीं तिनें आदिमाया जी श्रीजगदंबा तिची करुणा भाकली.

॥ पद ॥ ( पोरे नच )
अयि अंबे ! जगज्जननी । अष्टभुजे ! नारायणी ।
शुंभनिशुंक्षास वधुनि । ध्वज उभारिला ॥धृ०॥
ऐकुनि ही कीर्ति विमल । धरित्यें मी चरणकमल ।
उठिव उठिव मदिय बाळ । प्रार्थना तुला ।
तूंच जनक जननि आतां । दुबळ्याप्रति दे हाता ।
उठिव उठिव पार्थ - सुता । अशिवहारिके ॥
रुसला तो नंदतनय । मजवरती आज पाह्य ।
मागाया तव आश्रय । म्हणुनि पातल्यें ॥२७॥
असा करुणायुक्त धांवा श्रीकृष्णानें ऐकून,

॥ ओवी ॥
नारायणाची नारायणी । होऊन प्रगटला त्या वनीं ।
भक्तास आपल्या चक्रपाणी । अहोरात्र रक्षीतसे ॥२८॥
नारायणाची नारायणी होऊन सुभद्रेच्या पुढें प्रगट झाला व म्हणूं लागल कीं,

॥ श्लोक ॥ ( इंद्र वज्रा )
बाई सुभद्रे ! तव अंगुलींत । दिव्यामृताचे द्वय थेंब सत्य ।
त्यांतूनि एक्या खरचोनि आतां । त्वां ऊठवावें निज पार्थ - सूता ॥२९॥
त्याप्रमाणें सुभद्रेनें आपली करंगळी कापून अमृताचा एक थेंब अभिमन्यूचे शीर धडावर ठेवून त्याच्या मुखांत घातला. तत्क्ष्णीं,

॥ आर्या ॥
स्पर्श सुधेचा होतां कचसा तो  पार्थ - तनय वनिं उठला ।
छेदित कसुमतरूसम पहिल्यपेक्षां गमे बलें फ़ुटला ॥३०॥

॥ अंजनी गीत ॥
अभिमन्यू तो परम कोपला । घटोत्कचावरी बाण सोडिला ।
त्यायोगानें निघुनी गेला । प्राण तयाचा कीं ॥३१॥
ही हकीकत हिडिंबेला कळतांक्षणीं ती तेथें धांवत आली व घटोत्कचाचें प्रेत मांडीवर घेऊन शोक करूं लागली.
॥ लावणी ॥ ( भ्यावेंस काय )
विपरीत काळ हा कैसा । तान्हुल्या तुला पातला ? ।
आश्चर्य हेंच मज वाटे । कोल्ह्यानें वाघ जिंकिला ।
( चाल ) मांजरा मारि उंदीर, वधी दर्दुर वासुकी थोर ।
तसें हें झालें । मानवें तुला मारिलें !
पितृव्य तुझा रणगाजी । अर्जुन सुभद्रापति ।
जरि असतां अजि या ठायां । तरि वधिता या निश्चितीं ।
( चाल ) ज्याचिया धनुष्यापुढें । भीति बडे बडे । शंभुही दडे ।
वरुनि धाकाला । तो आज इथें ना मुला ! ॥
तव पिता वृकोदर भीम । महाबलवंतांमधिं बली ।
त्याच्याच काय पुत्राची । ही अशी दशा जाहली ।
( चाल ) यापरी हिडिंबा करी, शोक अंतरीं , धरुनियां उरीं ।
तया प्रेताला । असुवांचा पूर लोटला ॥३२॥
सुभद्रेनें ओळखलें कीं, हा पडालेला मुलगा भीमाचा असून, हिडिंबा त्याचें कुटुंब आहे. तेव्हां आपण त्यांना नमस्कारच केला पाहिजे.

॥ ओवी ॥
हिडिंबेच्या पायीं शिर । ठेवी सुभद्रा सत्वर ।
म्हणे जाउबाई, आम्हांवर । कृपाच केली पाहिजे ॥३३॥

॥ आर्या ॥
घ्या आवरुनी शोका वत्स घटोत्कच अतांच उठवीतें ।
याच सुयोगें कळलें तुमचें आमुच्याशिं जें असें नातें ॥३४॥
दुसरा थेंब घटोत्कचाच्या प्रेतावर सिंचन करतांक्षणींच

॥ पद ॥ ( नृपममता )
सिंचितां सुधा - बिंदूला । काननीं घटोत्कच उठला ॥ तेधवां ॥
उठतांच आरोळ्या मारी । सांवरी गदा तलवारी ॥ तेधवां ॥
( चाल ) परि वारि हिडिंबा तया, म्हणे हा वांया,
बंधु ना मारी । तूं न हो तयाचा वैरी ॥ रे मुला ॥३५॥

॥ आर्या ॥
पार्थतनय अभिमन्यू, बंधु तुझा हा तशीच ही चुलती ।
सख्य करुनि बंधूसी, काकीचीं पाउलें नमीं चल तीं ॥३६॥
“ काकी ! जाऊं द्या. दुर्योधनाचें वर्‍हाड किती जरी असलें, तरी त्याच्या दुप्पट माझ्याजवळ मायावी सैन्य आहे, तें मी बरोबर घेऊन लग्नाला येतो. त्यांच्या कारभारी शकुनीमामा आहे तर माझाहि जांगीळमामा आहे. तुम्ही कांहीं काळजी करूं नका. वत्सलेचें अभिमन्यूशींच लग्न लावतों. ”

॥ आर्या ॥
कामरूप मायावी घेउनि राक्षस असंख्य संगातें ।
जांगिलमामासह तो धर्मानुज - तनय जाय लग्नातें ॥३७॥
इकडे द्वारकेंत बलरामानें श्रीकृष्णाला मुद्दाम एकांतांत जवळ बोलावून सांगितलें कीं,

॥ पद ॥ ( नृपममता )
बलराम म्हणे कृष्णासी । करुं नको कपटनीतीसी ॥ लग्निं या ॥
तूं अससि मनाचा काळा ! अपमान मदिय किती वेळां । अजवरी - ।
( चाल ) केलास, सांग सत्वरीं, परि न अंतरीं, राग म्यां हरी ।
तुजविशीं धरिला । साहिलें तुझ्या खोड्याला । मींच कीं ॥३८॥
हें ऐकून श्रीकृष्ण म्हणाले,

॥ ओवी ॥
पणतू भीष्माचार्याचा । जांवई होणार यादवांचा ।
मग ऐशा या सुयोगाचा । त्याग कोण करील ? ॥३९॥

॥ आर्या ॥
वहातों शपथ पदाची या लग्नीं योग्य तेंच आचरीन ।
अपवादातें वारुन, ज्या दिधली त्यास साच देईन ॥४०॥
बलरामास आनंद होऊन तो म्हणाला, “ कृष्णा ! शाबास ! आतां तुला कोण नांवें ठेवील बरें ? जा आतां. ”

॥ लावणी ॥ ( भला जन्म )
शृंगारावें पट्टण अवघें गुढ्या, तोरणें पथीं ।
सजवीं जणुं कां अमरावती ॥
व्याह्यासाठीं हाटहि भरावा जानोशाभोंवतीं ।
जेणें होय हर्ष त्या अती ॥
( चाल ) कृष्णा ! ती नको उरवूंस मुळीं न्यूनता ।
घें समाचार व्याह्यांचा तूंच सर्वथा ।
जन्मभरी स्मृति त्यास रहावी या लग्नाची खरी ।
अशी तूं ठेव तयारी हरी ! ॥४१॥

॥ आर्या ॥
इकडे घटोत्कचासी गांठुनिया कृष्ण बोलता झाला ।
माझी भीति न धरितां घ्यावें साधून कार्यभागाला ॥४२॥
थोडा थांब. मी आमच्या घरच्या मंडळींचा विचार घेऊन तुला काय तें सांगतो. असें म्हणून देव रुक्मिणीच्या महालांत आले आणि म्हणाले,

॥ पद ॥ ( दांभिक सकल हे )
रुक्मिणी ! तुझा अभिमान । व्यर्थ मनिं आण ॥
जा भानुमतिच्या पुढतिं आपुली करी ठेंगणी मान ॥
( चाल ) ती नवरमुलाची माता ।
पुरें होईल आर्जव करितां ।
वधु - पक्षाचें सुख आतां ।
येईल कळुनि तुज छान । साहि अपमान ॥४३॥
तें ऐकून रुक्मिणी आश्चर्यचकित मुद्रेनें म्हणाली, “ अहो ! असे काय म्हणतां ?

॥ पद ॥ ( वसंतीं बघुनि )
ऐसें अशुभ कसें वदतां ।
अभिमन्यूला दिली होति ना आपण ही दुहिता ? ॥
मग त्या निजवचना नाथा ! ।
कसे विसरलां मजसि कळेना या समयीं आतां ॥
लक्ष्मण काकचि यदुवीरा !
त्यापुढतिं न हा नेउन घाला हंसाचा चारा ॥
( चाल ) झाला अर्जुन नावडता ।
तुम्हांसी काय तरी आतां ? ।
म्हणुनी दुर्योधन करितां - ।
व्याही, गणु म्हणे भगवंता ! । अभिमन्यूला दिली० ॥४४॥
देव म्हणाले, “ वेडे ! -

॥ पद ॥ ( सून अरजी रण० )
बल कोठें आपणांत ॥ गे ॥धृ०॥
दादांच्या जें येईल मनाला । तेंच घडेल निभ्रांत ॥ बल० ॥
धाकुटपण तें भाळिं आपुल्या विसरलीस हें काय ? ।
सांगतील तें काम करावें पंक्तिस जेवुनि भात ॥ गे बल० ॥४५॥

N/A

References : N/A
Last Updated : August 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP