मध्यम खंड
अशा वेळेला, श्रीनामदेवाचें घोडें त्या माळावर आलें. नामदेवानें जेव्हां त्या वेताळाचा एकंदर देखावा पाहिला, तेव्हां त्यांना देवाच्या बोलण्याची आठवण झाली, कीं उघडेबागडे झांकण्यासाठीं शिंप्यांचा जन्म आहे ! लगेच नामदेवानें आपलें घोडें तेथें उभें केलें आणि वेताळापेक्षां जो लहान धोंडा होता, त्याच्याकडे ते गेले व त्याला म्हणाले,
॥ दिंडी ॥
भूप धोंडोबा सकल प्रस्तारांचा ॥ आहे भंवती परिवार भव्य साचा ॥
तुम्हि दिसतां येथील सावकार ॥ गणोबा घ्या हा माल सोईवार ॥३१॥
॥ पद ॥ ( धन्य उमा शंभुची. )
माल विकेल किं तुमचा । या भूपाच्या जवळी साचा ॥ माल० ॥
मीचि जाऊन करीन विनंती । तुमच्यातर्फ़ें धोंडोबाप्रती ॥
नृपति गिर्हाइक ज्याचें जगतीं । तो साहु भाग्याचा ॥ या भूपा०॥३२॥
॥ पद ॥ ( आकले न अघडित घटना. )
वसन - विहित ऐसें कां या वसतसा वनां ? ॥
प्रखर फ़ार थंडी पडली । नष्ट सकल कमलें झालीं ॥
म्हणुनि सोय पाहिजे केली । देहरक्षणा ॥ कां या० ॥
तनुसमान कोठें नाहीं । अमोल असें जगतिं पाही ! ॥
दैन्य तिचें बरवें नाहीं । ध्यानिं हें अणा ॥ कां या० ॥३३॥
॥ श्लोक ( उपजाति ) ॥
नामें गणोबा तुमच्या हटीचा ।
चाटी नृपाळा तव ओळखीचा ॥
त्यानें खरेदी तुमच्याचसाठीं ॥
आहेत केल्या मम सर्व गांठी ॥३४॥
॥ आर्या ॥
धोतर बंडी टोपी एकेका दिधलि नामदेवांनीं ॥
विश्वीं विश्वंभर हे कळल्या उरणार भेद कोठोनी ? ॥३५॥
याप्रमाणें सर्व कपडे वांटून, नामदेव पंढरपूराला आले व बापाला म्हणाले,
॥ पद ( भ्यावें मुळीं न भ्यावें० ) ॥
गेला खपून गेला । भोशांत माल अपुला ॥ध्रु०॥
प्रख्यात नामें भोशाचा । श्रीमंत सादु भाग्याचा ॥
रकमेस असे केला ॥ध्रु०॥३६॥
॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
द्या आजी अमुची तुम्ही रकम ती चाळीस नी चारशें ॥
ना आणी वचनांत बाध कधिंही तो योग्य साहू असे ॥
केला ना तुम्हि तो करार अमुच्या संगे इथें मागुती ॥
तो आजी भरला असे रक्कम द्या सारी पुरी निश्चिती ॥३७॥
दुसर्या बाजाराला नामदेव पुन: भोशाला गेले व गणोबा नांवाच्या धोंड्याला म्हणाले,
॥ दिंडी ॥
आठ दिवसांची मुदत पुन्हां देतो ॥
अलों तैसा मी आज परत जातो ॥
पुढिल बाजारीं मुळिं न ऐकणार ॥
सबब तुमची ऐकतो एक वार ! ॥३८॥
असें म्हणून नामदेव पंढरपुराला गेले व त्यांनीं बापाला सांगितलें “ बाबा, आजहि कांहीं त्यांनीं पैसे दिले नाहींत. पुढच्या बाजारीं देतो, असें ते म्हणाले. ”
पुन: नामदेव भोशाला गेले व म्हणाले,
॥ पद ॥ ( कंचन कोंदण, लावणी - आनंदकंदा )
धनिक तुम्हि या माळावरचे । जगतीं असा गवगवा ॥
ऐकून दिधला माल तुम्हां मी ॥ हिशोब त्याचा पहावा हो ॥
मागील बाकी चुकवा ॥ध्रु०॥
अडचण आम्हां आहे रकमेची । रिता परत नच फ़िरवा ॥
दासगणू म्हणे हें न घडे तरी । लायक जामीन द्यावा हो ॥
मागील बाकी चुकवा ॥ध्रु०॥३९॥
असें म्हणून नामदेव धोंडोबा नांवाच्या मोठ्या धोंड्याकडे गेले आणि त्याला म्हणाले,
॥ अभंग ॥
तुम्ही गिर्हाईक गणोबासी होता ॥ म्हणोनि मी देतां माल झालों ॥
उणापुरा मास आज एक झाला ॥ दाम नाहीं दिला गणोबांनीं ॥
देशीच्या साहुचे हमी राजे घेती ॥ तया सोडवीती कर्जांतून ॥
गणुदास म्हणे तुम्ही माळावर ॥ राजराजेश्वर पाषाणांचे ॥४०॥
॥ श्लोक ( इंद्रवज्रा ) ॥
जामीन व्हावें तुम्हि या नृपाला ।
साहू गणोबा बहु दीन झाला ॥
धंद्यांत पैसा जणु जीव साच ।
राजे जगीं या परिसापरीच ॥४१॥
॥ ओवी ॥
धोंडोबा जामीन घेऊन । आला नामा पंढरीकारण ।
निजपित्यासी वर्तमान । साकल्येंसी कथन केलें ॥४२॥
॥ पद ॥ ( तेंच म्हणावें भजन हरीचें. )
अति निकडीचा करुन तगादा परतुन आलों घरा । भ्यालों मुळिं न प्रस्तरेश्वरा ॥
( चाल ) पाहून मला सन्मूख भूप लाजला ।
ना दाम हाताशीं किमपिहि द्याया मला ॥
तो भूपें परी शेवटीं पदर पसरिला ! ।
आठ दिसांची मुदत मागण्या करुन दीनशीं गिरा ॥
बाकीची चिंता मुळिं ना करा ॥ ! ॥४३॥
पुढच्या सोमवारीं जेव्हां तगाद्यासाठीं नामदेव भोशाला जाऊं लागए, तेव्हां दामाशेटी म्हणाले,
॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
न ये रकम घेतल्याविण तसा रिकामा घरीं ।
असे कितिक वायदे उलटले विचारा करी ॥
अजी न मिळल्या जरी रकम त्याचिया जामिना ।
आणि मजकडे नको भुलुस मिष्टशा भाषणा ॥४४॥
नामदेव बापानें सांगितल्याप्रमाणें तगादा करण्यास भोशांत आले, धोंडोबाला म्हणाले,
॥ पद ॥ ( सगुण गुण माया. )
नृपाळा आजी, ऐकणें विनंती माझी ॥ध्रु०॥
द्या रकम सारी लवकर । वाय्दे बहुत आजवर ।
जाहले किती धरूं धीर । वचन राखा जीं ॥ ऐकणें ॥
अमोल बोल भूपाचा । इतिहास हरिश्चंद्राचा ।
आणुनिया मनामधिं साचा । तसें वागाजी ॥ऐक०॥४५॥
॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
वा ! खासें धरिलेंत मौन अपुला तो स्वार्थ साधावया ॥
केव्हांपासुन ही शिकून बसला भस्मासुराचि क्रिया ? ॥
आतां ना धरणार भीड तुमची बांधून घोड्यावरी ॥
जातो घेऊन पंढरीस उमजा चित्तांत कांहीं तरी ॥४६॥
॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
बिडाल नच अभीत त्या कधिंच कीटकाच्या नृपा ॥
पळे न कधिं केसरी बघुन वंचकाच्या तपा ॥
दिमाख अपुला तुम्ही बसून प्रस्तरा दाखवा ॥
प्रमूखपण एक या त्रिभुवनीं अम्हां मानवा ॥४७॥
॥ ओवी ॥
ऐसे म्हणून उपटिला । धोंडोबा घोड्यावर घातिला ॥
चर्हाटें बळकट बांधिला । पाहून हांसले गांवकरी ॥४८॥
तेव्हां गांवाचे लोक जमा झाले व म्हणाले,
॥ पद ॥ ( शिवदर्शन )
तुम्हि शिंपी कशास्तव नेतां ॥ध्रु०॥
थोर दगड हा घोड्यावरती ॥ घालुन हे जन तुम्हांस हंसती ॥
ही तो वडारि यांची रीती ॥ विपरीत असें कां करितां ॥ तुम्हि०४९॥
हें ऐकून नामदेव म्हणाले,
॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
दिसे दगड हा वरी परि न गोष्ट ही बा खरी ॥
तुम्हा परिच एक हा घटक साच या भूवरी ॥
असे भरुन राहिला जगतिं आंत नी बाहिर ॥
रमारमन श्रीहरी कमलनाभ सर्वेश्वर ॥५०॥
तो मोठी थोरला धोंडा घोड्याच्या पाठीवर लादून नामदेव पंढरीला घेऊन आले. तें पाहून गोणाबाई दारांत होती, ती नामदेवाला म्हणाली,
॥ ओवी ( जात्यावरची ) ॥
नाम्या ! अवजड धोंडा असा । कसा घालून पाठीवर ॥
आणिलासि तूं वारूच्या । त्याला पडेल ना फ़ांपर ॥५१॥
नामदेव म्हणाला,
॥ पद ॥ ( प्रगटला की० )
दगड हा न जामीन माते, चाटि गणोबाचा ॥
बाकीसाठीं बांधुन आणिला येथवरी साचा ॥ध्रु०॥
बहुत वेळ यांनीं मजला व्यर्थ चाळवीलें ॥
धन न किमपि देता खालीं वायदेच केलें ॥
तेंच कृत्य त्याचें त्याला आज फ़ळा आलें ॥
मज न किमपि आवडे ऐसा ढंग लबाडीचा ॥दगड०॥५२॥
॥ आर्या ॥
ऐकुन वचन पतीचें, राजाई खिन्न झालि अत्यंत ॥
चित्तीं म्हणे बुडालें घर बाई सर्व कांहिं विपरींत ! ॥५३॥
॥ दिंडी ॥
धोंडोबातें कोंडून लादनीसी ॥ केलि तकिद यापरी कुटुंबासी ॥
द्रव्य अपुलें दिधल्यास यास सोडा ॥ तोंवरी या बाहेर मुळिं न काढा ॥५४॥
॥ ओवी ॥
पुढें दामाशेटीकारण । हें साकल्य कळलें वर्तमान ।
स्नुषा राजाईकडून । तेणें तो संतापला ॥५५॥
धोंड्याला पाहून दामाशेटीला आपल्या मुलाच्या कृत्याचा अतिशय संताप आला व ते म्हणाले,
॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
जा नार्या ! तुझिया पित्यास झणिं ये घेऊन माझ्याकडे ॥
आतां ना करणें मुळींच बरवें दुर्लक्ष त्याच्याकडे ॥
नाहीं रक्कम थोडकी म्हणुनिया गुपचूप बैसूं कसा ॥
देवाच्या भजनेंकरून बनला हा पोर माझा पिसा ! ॥५६॥
त्याप्रमाणें नारायणाबरोबर नामदेव आले. नामदेवाला पाहतांच दामशेटी मोठ्या संतापानें त्याच्या अंगावर ओरडला व म्हणाला,
॥ झंपा ॥
अरे कारट्या ! काय हा घेतला रे । तुंवा सांग जामीन माळावरी रे ॥
आणिलासे कसा ! थोर धोंडा असा ! मी न झालों पिसा तव परी रे ॥
बसुन करिसी घरीं गोष्टि ज्ञात्यापरी । तोंच कां हे वरी मूर्खपण रे ॥
कुठुन झाली मला पाठवाया तुला । बुद्धि बाजारला तेधवां रे ॥५७॥
असा बापाचा संताप पाहून नामदेव म्हणाले,
॥ आर्या ॥
कोपुं नका बाबा ! मीं नच केलें यांत वांकडें कांहीं ॥
जामिन हा घ्या यापुन रक्कम व्याजासहित लवलाही ॥५८॥
॥ श्लोक ( भुजंगप्रयात ) ॥
नसे नामया काय डोकें ठिकाणीं ॥
कशीं बोलसी ही असंबद्ध वाणी ॥
तुझ्या मूर्खतेला जगीं पार नाहीं ॥
शिळा ही मुळीं दाम दे ना कधींही ! ॥५९॥
नामदेव म्हणाले, “ बाबा ! मी ह्यांत मूर्खपणा यकिंचित्हि केला नाही फ़ारच विचारानें काम केलें आहे. ”
॥ दिंडी ॥
अला दामाशेटीस राग फ़ार । गजकातर हातांत होती थोर ॥
तीच त्यानें फ़ेकून मारियेली । प्रस्तरा त्या, परि गोष्ट अशी झाली ॥६०॥
॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
सुवर्णमय जाहला गज तशीच ती कातरी ॥
असें बघुन हर्षला जनक फ़ार चित्तांतरीं ॥
कृपा करुन दीधला मजप्रती हरीनें असा ॥
सुपूत गुनधी; म्हणूं मग तयास वेडा कसा ? ॥६१॥
॥ पद ( दगडाचा देव कसा. ) ॥
ऐसाची जामीन हा राहुं दे घरीं ।
व्याजासह रक्कम यांनीं दीधली पुरी ॥ध्रु०॥
हा न दगड साच तुला भाग्य लाधलें ॥
परिस हाच नि:संशय आज उमजलें ।
कांहीं कमि न आपणांस इथुन राहिले ॥
अरि याचा स्फ़ोट मुला जगतिं ना करी ॥ऐसा०॥६२॥
नामदेव म्हणाले,
॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
छे ! छे । नको मुळींच हा अपुल्या गृहांत ।
ना राहुं देइल पहा कधिं शांत चित्त ! ॥
याचा सदैव असरा मदमोहकामा ।
ना ध्याउं देईल तुम्हा रघुराजरामा ॥६३॥
॥ ओवी ॥
धोंडोबा हा साक्षात् परीस । हें कळतां भोशास ।
जन आले त्या न्यावयास । भव्य गाडा घेउनी ॥६४॥
भोशाचे मराठे वीर । शिपाई शूर । शंभरावर । मिळोनिया आले ।
तलवार तमंचा कटीं करामध्यें भाले ॥
भिमथडी तट्टें गमतिचीं । अखुड बांध्याचीं । चपल बहुसाची ।
जिंकिती हरणा ॥ काननामधीं, प्रत्यहीं सहज पळतांना ॥
( चाल ) भट उमरें, मौजे, कौठाळी रोपळें ।
येथून मौज पाह्याला जन आले ॥
प्रथमत: लोक भोशाचे तंडले ॥
वा बरें, दिसतसा भोळे । तुम्ही माळवाले । मुला धाडिलें ।
आमुच्या गांवा ॥
गुणदास म्हणे केलात गनीमि कावा ॥६५॥
॥ दिंडी ॥
ग्रामदैवत आमुच्या धोंडोबासी । तुम्ही कां हे कोंडिलें लादनीसी ?
पुत्र तुमचा चोरटा धोंडोबाला । चोरूनिया घेऊन येथ आला ॥६६॥
॥ अभंग ॥
महाद्वारीं होते सराफ़ दुकानीं । ते आले धांवोनी कळतां हें ।
करिं आपुलिया लोखंड घेवोन । पाहती लावून धोंडोबासी ॥
सोनें होतें ऐसें पाहुनी हर्षले । शेटीशीं बोलले येणें रीतीं ।
भोशाच्या लोकांसी तुम्ही मुळिं ना भ्यावें । येथें असूं द्यावें धोंडोबासी ॥६७॥
तालमीचे लोक आले. भोशेकरांनींहि आपलीं टिकोरीं सरसावलीं. उभयपक्षांची बाचाबाची सुरू झाली. तें पाहून नामदेवानें तो लादनींतीतला धोंडा बाहेर काढून अंगणांत टाकला.
॥ गेलें परीसपण तें बळदांतुन काढितां वरी त्याला ॥
सुटतां पुष्पापासून राहवा कोठुन सुवास सूत्राला ॥६८॥
पांडुरंगाची मूर्ति नामदेवाच्या घरांत प्रगट झाली आणि दामाशेटीला व तेथें जमलेल्या लोकांना असें निक्षून सांगितलें कीं,
॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
खरा परिस कोण हें किमपि ना तुवां जाणिलें ॥
बघून दगडास या त्वदिय चित्त घोंटाळलें ! ॥
खरा परिस नामया तव कुमार जो जाहला ॥
तयास भज भक्तिनें मग कमी न कांहीं तुला ! ॥६९॥