मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्री माणकोजी बोधले चरित्र ४

श्री माणकोजी बोधले चरित्र ४

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ ओव्या ॥
भलभलते न बोला असे । पतिराया ! मामाजिसी ॥
तीर्थरूप माना तया । तुम्हि आलांत त्यांचे कुशीं ॥३३॥
या गोष्टीनें यमाजीच्या रागाचा पारा उतरण्याऐवजीं उलट वाढला; तो संतापानें म्हणाला :

॥ झंपा ॥
नको त्या विशीं ज्ञान सांगूंस मजला ।
थेरडा जन्मतां कां न मेला ॥
पाप पदरीं असे, म्हणुनि झालों पहा ।
पुत्र; मी भोगण्या या हालांला ॥
मान कोठें नसे, दैन्य गेहीं वसे ।
विठ्ठलाचें पिसें; नित्य त्याला ॥३४॥
इतकें बोलून त्या संतापाच्या भरांत,

॥ आर्या ॥
कर धरुनी गुजराथ्या उंबर्‍याच्या वरुन ओढिला खालीं ।
आणी करी वरी त्या शाप शिव्यांची यमाजि लाखोली ॥३५॥
खोतीदार गुजराथी या धटिंगण यमाजी पुढें काय करणार ? तो बिचारा रागारागानें फ़णफ़णत तडक शेतांत गेला. शेतांत बोधलेबुवा ‘ रामकृष्णहरी ’ चा गजर करीत नाचत होते. त्यांचा हात धरून त्यानें त्यांना सावध केलें व म्हटलें :

॥ पद ॥ ( हा काय० )
वाहवा पाटिल हीच कां हो ! श्रीहरिची भक्ती ।
मला फ़सविण्या निव्वळ केलीं ताटें उभिं शेतीं ॥
( चाल ) द्या द्या द्या, तुम्ही द्या, झडकर द्या, आतां द्या, -
पैसा माझा परत मला तो; नको तुमची खोती ॥३६॥
पाटीलबुवा त्या गुजराथ्याला पाहून हळहळले व म्हणाले :

॥ श्लोक ॥
नको तळतळूं असा किमपि सज्जना मानसीं ! ।
तुला बुडविण्या कृती खचित केली नाहीं अशीं ॥
मिळेल धनधान्य तें बहुत याच शेतीं तुला ।
बर्‍यास्तव तुझ्या तुझा हरिस शाळु मी अर्पिला ॥३७॥

॥ अभंग ॥
पाटील ( साहूस ) -
चांदीरूप कणसें, लोकांला वांटिलीं । सुवर्णाची केली, जपणूक
तांटे हीं पिवळीं, कांवी सुवर्णाचीं । द्योतक भाग्याची, तुझ्या जाण ॥
बोधला बोलतां ऐसें वाणी हासे । लागलें या पिसें, म्हणे साच ॥
चिपाडाला मानी सुवर्ण हा वेडा । गाढवाचा घोडा, करूं पाहे ॥३८॥

॥ आर्या ॥
साहू ( बोधल्यास ) -
चिपाडरूपी सोनें ठेवी हें बा ! तुझें तुझ्यापाशीं ।
अपुल्यापरी नको रे ! दूधखुळा बनवुं या जगीं मजसी ॥३९॥
हा संवाद होतो तो यमाजी पाटलाची स्वारी बापाचा समाचार घेण्याला आली.
॥ दिंडी ॥
यमाजीनें शेतास येउनीया । बोधल्यासी पाडिलें महीठायां ॥
वरुन माळ्याच्या धरुन सव्य हातीं । राग आल्यावर टिके कुठुन शांती ॥४०॥
यमाजी ( बापास ) --

॥ पद ॥ ( फ़टकाची० )
कुठून झाली बुद्धि मला ती तुजला राखण बसवाया ।
कसा थेरड्या । जन्मलास तों अम्हां सप्शेल बुडवाया ॥
साहू शिमगा करीत बसला; पट्टी बापा आली पुढें ।
हवालदार तो वसुला येतां मारिल घन चक्कर जोडे ॥४१॥
यमाजीच्या मागें ममताई हजरच होत्या. त्या प्रसंगीं त्यांना कुठून गप्प बसवणार ? त्यांनींहि नवर्‍यावर ताशेरा झाडला.

॥ ओवी ॥ ( जात्यावरील )
कशी पाटिल अक्कल तुम्हा । नाहीं उरली हो ! तिळभर ।
वाण खाया - नेसायची । नाहीं केलेंत आमचें बरं ॥४२॥

॥ ओवी ॥
बोधला महीस पडतांक्षणीं । प्रगट झाला चक्रपाणी ।
ब्राह्मणाच्या वेषानीं । बाप रुक्मिणी पांडुरंग ॥४३॥
यमाजी प्रत्यक्ष बोधल्याला - आपल्या लाडक्या भक्ताला -- जोड्यांनीं मारीत असलेला पाहून यमाजीला प्रभूनें म्हटलें -

॥ लावणी ॥ ( हे नव्हे० )
खेटरें काय मारिसी, अशा साधुसी, सांग मजसी ।
विबुधश्रेष्ठ या बोधल्यासी, । रे ! हा तुझा ॥
हा तुझा असुनिया तात, हाणिसी लाथ, पिकासाठीं ।
आणिक देतोस शिव्या ओठीं । रे ! दुर्जना ॥
दुर्जना ! बरें करिसी ना ! नरकयातना ! तुला अंतीं ।
भोगणें भाग, आण चित्तीं । रे यत्कृपें ॥
यत्कृपें धना ना आण, होइल कल्याण, याच शेतीं ।
लक्ष्मी बटिक साधु पुढती । रे ! गणु म्हणे ॥
गणु म्हणे बोधला संत, म्हणुन भगवंत, आला तेथ ।
कृपादृष्टीनें शेत पहात हो ! तेधवा ॥४४॥
प्रत्यक्ष बापाची जो अशी दुर्दशा करितो तो ब्राह्मणाची भीड कुठून धरणार ! यमाजी त्या ब्राह्मणाच्या अंगावर चवताळून गेला व म्हणाला :--

॥ पद ॥
करुं नको भटुरग्या तोंड, जराशी जिभ अवरुन धर ।
बत्तिशी पाडिन बाहेर ॥
तुम्हीच नादिं लाविला म्हतारा सांगुनिया गप्पा ।
अम्हापुढें चलति न त्या थापा ।
चौखंड्याचें पीक लुटविलें उभें हातोहातीं ।
अतां अम्हि काय खावी माती ॥
गणुदास म्हणे यापरी, यमाजी बोलत श्रीरंगा ।
नयाचा जेथ मुळिं न धागा ॥४५॥

॥ ओवी ॥
शेताकडे पाहून । निघून गेला नारायण ।
पुढें काय घडलें  वर्तमान तें ऐका विबुधहो ॥४६॥

॥ श्लोक ॥
ताटास थोट्या कणसें अलीं कीं ।
आश्चर्य झालें; जन त्या विलोकीं ॥
वाखाणिताती कुणि बोधल्याला ।
तैसेंच कोणी जगदात्मयाला ॥४७॥

॥ दिंडी ॥
आठ खंड्या शेतांत माल झाला । गांव अवघा तैं करित अचंब्याला ॥
म्हणति, “ पाटिल आमुचा धन्य साचा । साह्य यासी तो देव पंढरीचा ” ॥
हें वर्तमान भागीरथीच्या कानांवर गेलें. तिचा आनंद गगणांत मावेना ती मामाजीला धन्यवाद देऊं लागली.

॥ ओवी ( जात्यावरील ) ॥
भाग्य अमुच्या जग्तापाचें । कुळिं मामाजी परीस ! ॥
या रत्नाची पारख व्हावी । कोठुन कुक्कुटास ? ॥४९॥
एक दिवस असें झालें कीं,

॥ ओवी ॥
महार डफ़डे घेऊन । देई दौंडी रस्त्यांतून ॥
कीं उद्यां शेतसारा घेऊन । यावें कुळांनीं चावडीसी ॥५०॥
सारा - वसुलीकरितां हवालदार बादशहाकडून आला. तो चावडीवर कुळाला तगादा करूं लागला. दिवस दुष्काळाचे होते. पीकपाण्याचें वाटोळें झालें होतें. लोक चार्‍यालाहि मोताद होते. त्यांची दुर्दशा होणार हें पाहून माणकोजी कळवळले व मोठ्या मिनतवारीनें हवालदाराला म्हणाले : -

॥ पद ( सत्त्व हरायासी ) ॥
देशांत कहत पडला खरा । देशांत कहत पडला ॥
असें असुन मागतां कसें मग शेतसार्‍याला ॥
( चाल ) एकही मोड ना शिवारांत उगवला ।
जल अन्नाविण कीं, त्रस्त मुलुख जाहला ।
हें काय शहाच्या आणिलें न तुम्हि नजरेला ।
हवालदार ! सांगा । आधीं हें । हवालदार ! सांगा ।
सक्ति कराया कुठें न उरली यत्किंचित् जागा ॥५१॥
हवालदारानें पाटीलबुवांचें म्हणणें ऐकून घेऊन सांगितलें कीं, -

॥ पद ( स्वामी जंगम० ) ॥
बादशहाके मुकाबलेमें मगरुरी क्या कामकी है ।
हुकूम सुनना, रुपये लाना, फ़ंद ये बेकामके है ॥
निकलो भागो फ़ुजुल बतें खाली ये क्यौं कर रहे हो ।
शाह आली है मुताली तुम रिया सब जानते हो ॥५२॥
बापाची दीनवाणी आणि हवालदाराची दटावणी ऐकून यमाजीला राहवेना. तो पुढें सरसावून कुळांना दटावून सांगू लागला.

॥ श्लोक ॥
बाजारास विकायला त्वरित जा घेऊन ढोरें गुरें ।
वा ठेवा गुजराघरीं गहाण तीं भांडीं कुंडीं, लेंकरें ॥
पट्टी द्या तरि ना अतांच तुमच्या येतील धोंडे शिरीं ।
बोलावा कधिं जाब ना उलट हो या चावडीच्यावरी ॥५३॥

॥ ओवी ॥
चावडी भूपतीचा दरबार । येथें न करावी चरचर ।
काय करूं हवालदार ! । पाटील पडला नेभळा ॥५४॥

॥ साकी ॥
वचक तयाचा मुळीं न उरला म्हणून हा शिरजोर ।
गांव जाहला; द्यावा यांना पलाखतीचा मार ॥
उडवा वेगेंसी । चाबुक यांच्या पाठीसी ॥५५॥
यमाजीच्या या पाठिंब्यानें हवालदाराला जास्त माज चढला. मग त्याला उशीर काय ? उठलाच तो आणि त्यानें --

॥ दिंडी ॥
कुना नेउन खांबास बांधियेलें । उन्हामाजीं कोणास उभे केलें ॥
कुणालागीं घातिले कोलदांडे । दिले कोणाच्या शिरीं थोर धोंडे ॥५६॥
हवालदारानें याप्रमाणें लोकांना ताप देण्याला सुरुवात करतांच पाटीलबुवांना तें पहावेना. आपल्या जनतेला दृष्टीसमोर पीडा झालेली पहाणारा मग तो पाटील कसला ? ते पुढें सरसावले व हवालदाराला उद्देशून म्हणाले : -

॥ पोवाडा ॥
हवालदार हें काय करितासां, हा दुबळ्याचा गांव नसे ।
पाटिल येथिल खंदा मोठा रिया शिशूसम पाळितसे ।
त्यातें कळतां चेष्टा तुमच्या धडगत तुमची खचित नसे ।
विठोजि पाटील सन्मुख पहातां काळहि थरथर कांपतसे ॥५७॥

॥ झंपा ॥
दरारा जगा येथल्या पाटलाचा ।
ज्यापुढें पाड नाहीं शहाचा ॥ध्रु०॥
असुर निर्दाळिले, सुजन संरक्षिले ।
भूपही बनविलें फ़ाटक्याला ॥
म्हणून त्याची रिया, धजे न दुखवावया ।
वेद यश गावया भात ज्याचा ॥५८॥
पाटीलबुवांच्या भाषणाकडे सर्वजण टकमकां पाहूं लागले. हवालदाराला हसूं येऊन तो विचारतो, “ या गांवचा पाटील विठोजी म्हणतां आणि मग तुम्ही कोण ? ” अहा ! यावर भक्तश्रेष्ठ बोधल पाटलांनीं उत्तर दिलें --

॥ पद ॥ ( भाव धरारे )
मी तो गुमास्ता । मम करिं ना कांहिंच सत्ता ॥ध्रु०॥
पाटलाकडे मी जातों ! । ही खवर त्यास कलवीतों ।
जें देइल धन तें आणितों । नमुनि श्रीमंता ॥
पंढरी इथुन ना दूर । जाऊन येतों लौकर ।
छळुं नको कुणा तोंवर । मनीं धर ममता ॥
घोडीस करून खोगीर । जाहले तिच्यावर स्वार ।
पाहिलें भिवरेचें तीर । किं हां ह आं म्हणतां ॥
घेतला बुका आणि माळ । पाहिला विटें घननीळ ।
समचारणिं ठेवुनी भाळ । सांगे वृत्तांता ॥
वा बरिच मजा तुम्हिं केली । बसलांत पांघरुनी शाली ।
ना खबर तुम्हा वनमाळी ! । अनरसे खातां ॥
पाहिल्या वतन तें तुमचें । होतात हाल परि अमुचे ।
बक्षीस वरति जोड्याचें । मिळे तुज करितां ॥
होतां पाटिल वाटे गोड । चालले अतां कां जड ।
क्षण एक वीट तरि सोड । पंढरीनाथा ! ॥
ऐकून बोल हे खासे । गालांत विठोबा हांसे ।
समयास साजे त्या ऐसें । होय गणु गातां ॥५९॥
देव राउळांत एकटाच होता. बोधल्याला जवळ बोलावून देवानें म्हटलें :

॥ श्लोक ॥
पाटील मी खचित रे ! तंव पांढरीचा ।
ना सोडणार कधिंही अभिमान त्याचा ॥
माझी रिया गरिब त्या नच दु:ख देई ।
घेऊन हें नग करी वसुला अदाई ॥६०॥
असें म्हणून पांडुरंगानेम अंगावरील दागिने बोधल्याच्या स्वाधीन केलें. पाटीलबुवा ते घेईनात. उलट म्हणाले :

॥ पद ॥ ( मित्रा मम )
जाऊं इथुनि घेऊन तव दागिने जरी ।
चोर चोर म्हणेल मला सर्व पंढरी ॥ध्रु०॥
उगिच हंसू करि न असें मदिय श्रीवरा ।
अतुल - शक्ति तव असे मि जाणतों पुरा ॥६१॥
रुपये मागे मोजलेस तूंच बेदरा ।
याहि वेळीं त्याचपरी कृति करी हरी ॥६१॥
यावर देवानें म्हटलें : -

॥ आर्या ॥
पट्टि भरायासाठीं नच हे मी दागिने तुला देतों ।
तूं मम अससि गुमास्ता म्हणुन तुला मीं अहेर हा करितों ॥६२॥
असें म्हणून देवानें त्याच वेळीं नव्हे तर नेहमींकरितां पाटीलबुवास अहेर अर्पण करण्याच्या उद्देशानें आशीर्वादपूर्वक प्रेमानें सांगितलें -

॥ पद ॥ ( चाल - सवाई माधवराव अ)
दिवस आजिला तुला दिला मी प्रतिवर्षीं जाण ।
अंगावर जें असेल कांहीं तें तूं न्यावें काढून ॥ध्रु०॥
( चाल ) मी अशापरीचा मान कुना नच दिला ।
जे हरकत करितिल या कृत्यासी तुला ।
निर्वंश तयाचा होऊन भोगिल हाला ॥
पट्टीसाठीं रुपये देतों नाहीं धनाची मज वाण ।
दासगणू म्हणे, करा विचारा, किती दयाळू भगवान ॥६३॥
याप्रमाणें अहेर करून देवानें पाटीलबुवांना निरोप दिला. गरुड पारावर येतांच गरुडानें पाटीलबुवास रामराम करून म्हटलें -

॥ पद ॥ ( छक्कड )
थोरांचे गुमास्ते तुम्ही राव पाटील महशूर सर्वाला ।
धड ना चिरगुट अंगाला ॥
शिंदेशाई पगडि पिळ्याची ऐटित शिरिं घाला ।
असावा अंगावर शेला ॥
पाहिजे अंगिं अंगरखा चुण्याचा धाटि पैलदार ।
दिसावा जसा कांहीं सरदार ॥६४॥
पाटीलबुवा ( गरुडास )

॥ श्लोक ॥
हें कांहीं गरुडा नको मजप्रती, आहे तसा मी बरा ।
कल्याणार्थ जगाचिया तनु झिजो ना त्रास व्हावा परा ॥
केव्हांही हरिरूप हें जग दिसो ! दुर्वासना ती नसो ।
संतांचा सहवास तो सुखदसा या बोधल्याला असो ! ॥६५॥
नंतर पाटीलबुवांनीं धामणगांवास येऊन गांवचा सारा शेतसारा देऊन प्रजेला संकटांतून मुक्त केलें.

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP