मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्री संत जनाबाईचें चरित्र २

श्री संत जनाबाईचें चरित्र २

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ ओवी ॥
जनीचें पाहून वदन । आलाबला घे नारायण ।
म्हणे ‘ भाग्य माझें धन्य । करीं आले पाय तुझे ! ’ ॥२८॥

॥ आर्या ( गीति ) ॥
जागें करूनि जनीला प्रभु बोले ‘ मी बहूत उपवाशी ।
कांहीं तरि त्वां द्यावें मज ये वेळा अणून खायासी ॥२९॥
जनाबाई म्हणाली,

॥ लावणी ॥
“ तुज काय देउं सांवळ्या ! मी खाया तरी ।
मी दुबळी बटिक नाम्याचि जाण श्रीहरी ॥ध्रु०॥
उच्छिष्ट तुला देणें ही गोष्ट ना बरी ।
तूं जगन्नाथ, तुज घालुं कशी भाकरी ? ॥
( चाल ) नको अंत मदिय पाहूस सख्या भगवंता ॥ श्रीकांता ! ॥
मध्यान्ह रात्र उलटून गेलि ही आतां ॥ आण चित्ता ॥
जा ! होईल तुझा काकडा राउळांतरी ।
आणितील भक्त नैवेद्य नानापरी ॥तुज०॥ ” ३०॥
देव म्हणाले,

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
‘ नको मुळिच शर्करा मजसि दे तुझी भाकरी । ’
असें म्हणुनि टोपलें उघडि तेथ तो श्रीहरी ॥
बळें धरुनियां जनी तिजसवें प्रभू जेवला ।
शिळें परि न त्यांतला कणहि एक तो ठेविला ! ॥३१॥

॥ आर्या ( गीति ) ॥
दळण दळिन तव संगे, परि न तुझा विरह मजसि साहेल ।
वेळ असे थंडीची, घे पांघरण्या मदीय ही शाल ॥३२॥

॥ ओवी ॥ ( जात्यावरील )
माझ्या भक्ति मळ्यामाजीं । भाव तुळशीच्या मंजिरा ।
प्रेमदोरा घेऊनि करीं । हार गुंफ़िन शारङ्गधरा ।
बाई शयनी एकादशी । शोभे वैष्णवांत हिरा ॥
माझ्या निवृत्ति दादाला । भाऊ, बहिनी अलौकिक ।
प्रेमपाशांत बांधिला । ज्यांनीं वैंकुंठ - नायक ॥
चांगा, चोखोबा, सांवता । संतमाळेचे जे मणी ।
करि वंदन त्यांच्या पदा । नामयाची वेडी जनी ॥३३॥

॥ दिंडी ॥
फ़ोड आले हस्तास तुझ्या देवा । तुझी कोमल तनु खचित वासुदेवा ॥
आज दळिलें त्वा दळण येथ बा रे । जगीं कळतां होईल हसूं सारें ॥
देव म्हणाले, “ कां बरें ? माझ्या घरचें काम मीच केलें पाहिजे. पाहूं आतां लोक तुला हंसतात कां मला हंसतात तें ? ” असें म्हणून देव तेथेंच जनाबाईची वाकळ घेऊन निजला ! इतक्यांत -

॥ ओवी ॥
प्रभातींचा चौघडा । वाजूं लागला धडधडा ।
तें ऐकून कानकोंडा । झाला विठ्ठल मानसीं ॥३५॥
तें ऐकून देव जागा झाला.

॥ साकी ॥
लगबगिनें ती वाकळ घेऊनि जनिची अंगावरती ।
राउलास तो विठ्ठल गेला; धन्य जनीची भक्ती ! ॥३६॥

॥ ओवी ॥
पाहून विठूची वाकळ । बडवे खवळले तत्काळ ।
म्हणती ‘ ऐसा कोण खळ । दर्शना आला ? कळेना ’ ॥३७॥

॥ पद ॥ ( तूं टाक चिरुनि० )
चोरिली विठूची शाल । खचित कुणि काल ॥
ना दिसत गळ्यांतिल गोफ़ । तसा तो नूतन कलगिचा लाल ॥ध्रु०॥
कंठा न दिसत मोत्यांचा ।
मोडला ठाव पौंचीचा ।
पत्ता न कडीं अंगठीचा ।
हा हाय जाहला घात । आमुचा ऐन चोरिला माल ॥३८॥

॥ पद ॥ ( कधि करिती लग्न० )
उमगाया चोर आतां साधन ही गोधडी ॥ध्रु०॥
घेउनी चला ही करीं, चवाठ्यावरी, करणि ना बरी, वेळ ही थोडा ॥सा०॥
कुणीकुणी छाति ठोकिती, मृत्तिका हातीं, मुखीं घालिती वळली बोबडी ॥३९॥

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
“ ही गोधडी दिसतसे बहुधा जनीची
बुद्धे कशी हि फ़िरली न कळे तियेची ।
ती आपणा म्हणवित्ये जगतांत ‘ संत ’
आतां कळूनि चुकलें नच त्यांत अर्थ ” ॥४०॥

॥ श्लोक ॥ ( भुजंग प्रयात अथवा झंपा )
“ जने ! नष्ट तूं दुष्ट चांडाळ साची
कशी चोरिली शाल ही विठ्ठलाची ? ।
कुठें गोफ़, कंठा, कडीं सांग आतां
तुला मारणें वाटतें योग्य लाथा ॥ ” ४१॥

॥ पद ॥ ( अंकित पदांबुजाची )
“ आळ नका घालूं मजवरी । म्या ना केलि विठूची चोरी ॥ध्रु०॥
तोच होऊनी येथें आला । शाम कन्हैया हरी ॥
शाल दागिने बळेंच त्यानें । दिले मजसि निर्धारीं ॥
वाकळ घेऊनी पळूम गेला ॥ ” गणू म्हणे गिरिधारी ॥४२॥

॥ ओवी ॥
जरी जनीचें सत्य बोल । परि ते अवघ्यां वाटले फ़ोल ।
बडवे खवळले तात्काळ । अद्वातद्वा बोलती ॥४३॥

॥ पद ॥ ( हा मदंगा लावुं० )
तो दगड अचेतन निर्गुण निव्वळ सगुण कसा गे ! होय तरी ? ।
गिरिवर येऊनि सभेंत वदला, ’ गोष्ट गणावी काय खरी ? ॥ध्रु०॥
( चाल ) ‘ बळेंच ’ म्हणसी ‘ सदनीं आला ’ ।
झांकूं नको गे ! निज कृत्याला । संतपणा तो तुझा समजला ॥
कवटाळिण तूं अससि पुरी, आला न घरीं, तव साच हरी ।
तूंच चोरटी भीमातिरीं जने सगुण कसा गे होय तरी ? ॥४४॥
“ जने ! असें खोटें बोलूं नकोस. दगडाची मूर्ति कधींहि दलावयास येत नसते ! ज्या परमेश्वराला आकार विकार नाहींत तो सगुण कसा होईल ?

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
“ मानूं नका दगड त्या मम विठ्ठलाला
तो भक्तवत्सल हरी प्रभु दूध प्याला ! ।
शेले विणी निजकरें कबिराश्रमासी
येई हटीं विठु तयांस विकावयासी ? ” ॥४५॥

॥ आर्या ॥ ( गीति )
रक्तपुष्प माळांनीं राजाज्ञेनें जनीस सजवीलें ।
सिंदुर भालीं चर्चुनि सुळिं द्यायासी भिमातटा नेलें ॥४६॥

॥ पद ॥ ( पांडु नृपति जनक० )
जोडुनियां द्वयकरास जाय शरण नामयास
चरणाची धरुनि आस म्हणत त्याप्रती ॥
कीं ‘ मदीय जन्म धन्य ! फ़ळलें मम पूर्व पुण्य !
प्रभुसाठीं येत मरण ! आज निश्चिती
नरतनु ही नाशवंत । होत तिचा आज अंत
भेटेल श्री अनंत तो रमापती ! ॥४६अ॥

॥ अभंग ॥
“ सुखेम द्यावें मजला सुळीं । त्याचें दु:ख नाहीं मुळीं ॥
परि माझ्या शार्ङ्गधरा । मानूं नका धोंडा, चिरा ! ॥
महा दयाळू भगवान । बाप माझा नारायण ॥ ”
गणु म्हणे ऐशा रितीं । जनी बडव्यांना विनविती ॥४७॥

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
‘ हे भीमातटवासिया मुररिपो नारायणा राघवा !
विश्वेशा विबुधप्रिया सुखकरा दामोदरा माधवा ।
श्रीकांता गरुडध्वजा नरहरे कृष्णा मुकुंदा झणीं
पावावें मज विठ्ठला ’ विनवित्ये ही तूज दासी जनी ॥४८॥
याप्रमाणें देवाचा धांवा केला, तरी देखील देव कोठें दिसत नाहीं असें पाहून जनाबाई रागावल्या व देवाला म्हणाल्या,

॥ ओव्या ॥ ( जात्यावरील )
“ तूं मेल्या ! कपती खरा । बळें आलास माझ्या घरा ।
गोड गोडशा देउनी थापा । केला जन्माचा मातेरा ॥
आग लागो तव भूषणा । मी थुकेन त्याच्यावरी ॥
तूं जन्माचा चोरटा मज । केलेंस आपुल्यापरी ॥
बरे झालें कळलें आतां । तव संगत नाहीं बरीं ।”
गणु म्हणे ऐशा रितीं । माय रुसली देवावरी ॥

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
जनी चढवितां सुळीं सुळ तिथें निमाला पहा !
रमारमण राघवा ! तव कृती अगम्या महा ।
कदा न निज दास ते बुडविशी प्रभो ! संकटीं
तुला नमन हें असो ! तव निवास भीमातटीं ॥५०॥

॥ दिंडी ॥
रक्तमाळा तटतटाअ तुटुनी खालीं । पतन झाल्या श्रीकांत जिचा वाली ॥
आखिल जन ते लागले तिच्या पायीं । ‘ धन्य ’ म्हणती ‘ तूं जगतिं जनाबाई ! ’ ॥५१॥

॥ श्लोक ( मालिनी ) ॥
जय जय जयकारें देव ते गर्जतात ।
थय थय थय तैशा अप्सरा नाचतात ॥
वदनिं सुर जनींचे गूण वाखाणितात ।
हरि - भजनिं जने ! तूं ख्यात सार्‍या जगांत ॥५१अ॥
राजा म्हणाला,

॥ पद ( रणधीरा श्रीवर ) ॥
“ अधम ख्रा मी नर पामर शरण तुझ्या चरणा ॥ध्रु०॥
जनना, मरणा, करि हरणा, हा भवदुस्तर, देउनियां कर, यांतुनि उद्धर, मज दीना ॥१॥
कृपा - करा, ठेइ शिरां, दे थारा, गणु नत तव पदिं, मान्य करी कवना ॥५२॥ ”

॥ ओवी ॥
साडी, चोळी, चंद्रहार । घेऊनी राजा करी आहेर ।
दक्षिणेसाठीं साचार । ताट ठेविलें होनांचें ॥५३॥

॥ पद ॥ ( राग - पिलू, ताल - दीपचंदी )
“ नको मज साडी नसे मी रे ! उघडी ।
भक्तीची पैठणी नेसुनी बसल्यें राजा भविं मन विटलें ॥ध्रु०॥
वैराग्याची अंगांत चोळी ।
‘ केशव ’, ‘ राघव ’ नग हे मी ल्यालें ॥ ॥ राजा० ॥
मीपण जाळुनि काजळ केलें ।
ज्यायोगें जग हरिरूप दिसलें ॥ राजा० ॥
सद्भावाचें कुंकू कपाळीं ।
गुरुरायानें मज लावियेलें ॥ राजा० ॥
त्या पुढतीं या तव भूषणांची ।
किंमत ना मज ” गणुदासबोले ॥ राजा० ॥५४॥
देव म्हणाले “ जने, कोणाला लोक हंसले, जाऊं दे, ये आतां ”

॥ श्लोक ॥ ( शार्दूलविक्रीडित )
“ न्हाऊं मी तुज घालितों, अजि जने ! ये बैस पाटावरी ।
लाऊं दे उटणीं त्वदीय तनुला, वाळा, हिन, कस्तुरी ।
पाणी या सतलांत मी विसणिलें आतां करी तांतडी ।
लावी आड सुखें मदीय करिंच्या पीतांबराची घडी ॥ ”
असें म्हणून जनीला देवानें पाटावर बैसविलें व स्वत: न्हाऊं घालूं लागला. ही वार्ता संतमंडळींना कळतांच,

॥ पद ॥ ( चंद्रकांत राजाची )
मौज पहाया ती न्हाण्याची संत सकल आले ।
अंतरिक्षिं ते सुरगण मिळुनी गौरविते झाले ॥ध्रु०॥
सभोंवती त्या दिव्य पताका, झणझणती झांजा ।
‘ धन्य जने ! तुज न्हाऊं घालितों पंढरिचा राजा ’ ॥
‘ जयजय विठ्ठल ’ या जयघोषें अंबर तें भरलें ।
दास गणु म्हणे देव, भक्त, हे एकरूप झाले ॥५६॥

॥ पद ( शाम छुनरिया ) ॥
कमल नयन गिरिधारी राम ॥क०॥
बार बार नरतनु नच लाधे जावो नच वाया सदय भो ! कंसारि
कांठिं भिमेच्या वससि विटेवरि ठेवुनियां निज हात कटिवरी
येवो दया गणुप्रत नित तारी ॥क०॥५६अ॥

॥ पुंडलिकवरदा ! हरि विठ्ठल ! ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP