॥ आर्या ॥
ऐकुनि हनुमंताचें, वच ऐसें हास्य राघवें केलें ।
वात्सल्यप्रेम जेथें, तेथ कुणाचें न कांहिंही चाले ॥२६॥
॥ ओवी ॥
श्रीराम म्हणे हे मारुती । ही जनकतनया जानकी सती ।
आज या पलंगावरती । शयन कराया इच्छीतसे ॥२७॥
मारुती म्हणाला,
॥ पद ॥ ( आनंदें नाचें )
मंचकीं रामा करुं द्या कीं, शयन अजि या जानकीला ॥धृ०॥
( चाल ) आपण उभयतां येथुनि जाऊं । मानेल मनास स्थल तें पाहूं ।
खरोखरी आलि आहे झोंप तिला ॥मंचकीं०॥१॥
( चाल ) सेवेस अपुल्या दास मी तत्पर ।
अडचण मुळिं नच उरलीं तिळभर ।
बळें करि कपि अशी, तेथ लीला ॥२॥२८॥
तें ऐकून राम म्हणाले,
॥ झंपा ॥
तुझा हट्ट कां जवळिं वा राहण्याचा ।
मला सांग हे मारुते शीघ्र साचा ॥धृ०॥
मदिय आज्ञा भली, कधिं अवमानिली ।
स्वामि तूं महाबली वानराचा ॥१॥
आज ऐसें पिसें लागलें तरि कसें ? ।
उमज ना होतसे मजसि याचा ॥२॥२९॥
मारुती म्हणाला,
॥ लावणी ॥ ( भला जन्म )
कामावांचुन तव पायाच्यापासुन मी अजवरी ।
झालों नव्हतों राघवा दुरी ॥
आज मात्र ही कठिण मातली ओंगळ वेळा खरी ।
म्हणूनी मन झुरतें अंतरीं ॥
( चाल ) जो प्रीय तोच मी आज नकोसा तुला ।
जाहलों; नशिब हें खडतर कळलें मला ।
माकड मुळिंच मी योग्य तुझ्या सेवेला - ।
नाहीं नाहीं; दाशरथे ! हें नको जगणें भूवरीं ।
देतों प्राण आतां सत्वरीं ॥३०॥
॥ श्लोक ॥ ( पृथ्वी )
असें म्हणुनि मारुती स्वकिय जीभ ओढावया ।
तयार जयिं जाहला, तयिं प्रभू निवारी तया ॥
अगा कपिवरा ! नको करूंस आत्महत्या अशी ।
जगांत तुजवांचुनी प्रिय नसेच कांहीं मशीं ॥३१॥
सीतेनें मनांत विचार केला कीं, कांहींतरी काम सांगितल्याशिवाय मारुती येथून जाणार नाहीं. त्या उद्देशानें युक्ति सुचवून सीता रामचंद्रास म्हणते -
॥ श्लोक - शार्दूल - विक्रीडित ॥
रामा ! पंचवटीमधें पुनितशा त्या गौतमीच्या तिरीं ।
प्रेमाची विसरून एक मि अलें वस्तू पहा साजिरी ॥
यासाठीं हनुमान हा तुम्हि तिच्या शोधार्थ कीं पाठवा ।
वेगाच्या पुढतीं उणी खचित कीं येईल याच्या हवा ॥३२॥
हें ऐकून राम मारुतीला म्हणतात -
॥ पद ॥ ( भैरवी - त्रिताल )
आण फ़णी सीतेची, वत्सा ! आण फ़णी सीतेची ।
कां कीं अतिशय ती बघ आहे । जानकिच्या प्रेमाची ॥
क्षणांत गोदावरिच्या कांठीं । तुझिच गती जाण्याची ॥३३॥
आपल्या शेंपडाकडे पाहून मारुती म्हणाला,
॥ दिंडी ॥
बरें पुच्छा ! जा पंचवटीलागीं ।
फ़णी मातेची शोध जागजागीं ॥
गवसल्यासी घेऊन शीघ्र यावें ।
जरि न गवसे गोदेस विचारावें ॥३४॥
शेंपूट ती फ़णी ताबडतोब घेऊन आलें. तो मारुती म्हणतो,
॥ पद ॥ ( जाके मथुरा )
गोदावरिच्यापासुनि अंबे ! ही तव फ़णि अणिली ।
रावण नेता तुजला गुंफ़ेंत, जी होती पडली ॥
तव प्रेमास्तव जी गोदेनें सांभाळुनि ठिवली ।
दासगणु म्हणे शेपूट जातां ती त्यातें दिधली ॥३५॥
सीतामाई स्वत:शीं म्हणतात,
॥ पद ॥ ( तुज काय सांग )
हा वद्य षष्ठिचा इंदु पहा प्राचीला, मनिं मुदितचि झाला ।
आल उदयाला, पाहून आपली वधू रजनि जी तिजला ॥१॥
रजनि ही झालि तय्यार आलिंगायाला, अहो शशि निजपतिला ।
परि हा आला, आडवा उभयतांमधें मेघ कीं काळा ॥२॥
हटवितां प्रभंजन एक जगतिं कीं याला, परि तो तर पडला ।
पिता मग बाळा, धुडकावि कसा तो उलट करिल चोजाला ॥३॥
गणुदास म्हणे संवाद असा जरि झाला, परि तो नच कळला ।
कषीरायाला, रात्रिची कुठुन जाणीच व्हावि सूर्याला ? ॥३६॥
सीतेचें स्वगत ऐकून रामचंद्रप्रभु विचारांत पडले. हें पाहून मारुती म्हणतो,
॥ श्लोक ॥ ( मंदाक्रांत )
चिंता ऐसी प्रबल कसली लागली रामराया ।
सांगा सांगा झणिं मजप्रती जोडितों मी करां या ॥
सौमित्राच्यास्तव तव कृपें आणिला द्रोण रामा ।
अद्री हें तूं, म्हणुनि कथणें सेवका सौख्यधामा ॥३७॥
राम म्हणतात,
॥ पद ॥ ( वसंतीं बघुनि )
गृहस्थी व्यवहार न कळला ।
तुजसि मारुते ! म्हणुनि वाटतें वाइट बघ मजला ॥
मागें धूर्तपणा केला ।
त्वांच अहीमही घेऊन जातां मज महिकावतिला ॥
( चाल ) तें तव धोरण अज दिवशीं ।
गेलें सांग कुठें मजसी ।
अवघें वेड्यापरि करिसी ।
ऐसें उचित न हें तुजला ।
व्यवहारातें काय शिकवुं मी पोरासम तुजला ? ॥३८॥
मारुती म्हणाला,
॥ आर्या ॥
गृहांत स्थित जो आहे त्याला म्हणती ‘ गृहस्थ ’ मज ठावें ।
मीही गृहस्थ झालों, वनचर आतां मला न लेखावें ॥३९॥
राम म्हणाले,
॥ श्लोक ॥
गृहस्थ गृहिणीमुळें, वसत गेहिं तो ना खरा ।
अतूल बलवान तूं जगतिं ब्रह्मचारी पुरा ॥
कदा न पति - पत्निच्या विबुध जाय शय्यागृहा ।
तिथें जंवर जोडपें, कथित शास्त्र ऐसें पहा ॥४०॥
मारुती म्हणाला,
॥ कटाव ॥
रामा ! आतां अडचण मोठी । पडली येथें बसण्यासाठीं ।
ढेंकुण, मुंग्या, मुंगळे बेटे । बसले असतिल दडून कोठें ।
ते पाहूं द्या निरखुन मजला । हीच विनंती आहे अपणाला ।
ऐसें बोलुन जाजम गाद्या । फ़ेंकुं लागला । ढेंकुण मुंग्या ।
पाहता झाला, पतंग फ़िरती दिव्याभोंवतीं । ते माराया
धांवे मारुती । चांडाळांनो ! शास्त्राज्ञेला, कसे तुडवितां ?
सांगा मजला । ऐसें पाहतां राम हांसले, दासगणूला नवल वाटलें ॥४१॥
॥ पद ॥ ( मज गमे ऐसा )
बहुपरी सेवा सतत ही, घडेल आतांsss ॥ध्रु०॥
( चाल ) शयनागारा या रघुवीरा ।
ढेकुण चिलटांप्रति तो थारा ।
मिळुं नच द्याया करीन पहारा ।
साच हे मानी जानकिनाथा ! ॥सेवा०॥४२॥
हें ऐकून राम म्हणाले,
॥ श्लोक - वसन्त तिलक ॥
झाल्यास जाण अतिरेक पहा विनोद ।
सर्वांशिं होउन बसे जगतांत वाद ॥
आल्यास जांभइ मला त्रुटि वाजवावी ।
सेवा अशी महाबले ! मम तूं करावी ॥४३॥
मारुती म्हणाला,
॥ पद ॥ ( कधिं तिला )
असें जरी असेल नाथा ।
ये नच येथुनि मज जातां ॥ध्रु०॥
( चाल ) कां कीं, जांभइसी, पहाण्यासी, तुजपाशीं ।
पाहिजे उभेंच आतां ॥४४॥
राम म्हणाले,
॥ ओवी ॥
कांही गुप्त गोष्टी करावया । जानकी आली ये ठायां ।
म्हणून तुज दूर जाया । कांहीं काळ प्राथींतसें ॥४५॥
मारुती म्हणाला,
॥ लावणी ॥ ( आहे त्याचि मला )
तूं राम पुरुष साक्षात् प्रकृती सिता ।
कोठेंहि तुम्हांवांचून, राहिला ठाव ना रिता ।
मग दुर कुठें मी जाउं स्थान दाखवा ।
अणुरेणु तुवां व्यापीलें, जग सर्व तूंच राघवा ॥
( चाल ) मी कुठें निराळा तरी, राहिलों दुरी, तुझ्याहून हरी ॥४६॥
ज्ञान हें झालें, तव कृपें मला चांगलें ॥
राम म्हणाले,
॥ दिंडी ॥
अस्ति - भातीठाई न भेद कांहीं ।
नामरूपाचें परी तसें नाहीं ॥
दृश्य अवघा व्यवहार द्वैतसंगें ।
जगतिं या कीं साचार घडूं लागे ॥४७॥
॥ आर्या ॥
म्हणुनी व्यवहारातें समजुनिया त्याच मापिं मोजावें ।
पंथा मापुनि घ्याया, काय अधोली नि शेर आणावे ? ॥४८॥
॥ ओवी ॥
वाट माझ्या जांभईची । तुज नको पाहणें साची ।
तव चुतकी वाजतांचि । मज ती येईल ध्यानीं धरी ॥४९॥
॥ दिंडी ॥
बरें म्हणुनी हनुमान निधुन गेला ।
तया योगें सीतेस मोद झाला ॥
करुनि तांबुल रामास नमुन देई ।
तई ऐका वर्तलें नवल कांई ॥५०॥
॥ श्लोक ॥ ( पृथ्वी )
त्रिट्याच कपि वाजवी बसुन साच एकीकडे ।
भराभर करें पहा मुळिं न खंड त्यासी पडे ॥
म्हणून प्रभुच्या मुखा सवड ना मिटायाप्रती ।
मिळे; बघुन घाबरी स्वमनिं झालि सीता सती ॥५१॥
जानकी घरांतील वडील मंडळीस सांगण्यासाठीं धांवत गेली व म्हणाली, “ वसिष्ठा ! -
॥ पद ॥ - ( हा काय तुमचा )
चला वसिष्ठा ! श्रीरामाचें आनन ना मिटतें ।
काय जाहला वात, कळेना या मज अबलेतें ॥
( चाल ) सौमित्रा ! घ्या भरता, शत्रुघ्ना, नृपमाता ।
कौसल्या ही बरोबरी तो, आणा वैद्यातें ॥५२॥
तें ऐकून वसिष्ट म्हणाले,
॥ पद ॥ ( मित्रा मम )
साक्षात् प्रभु राम तया वात होत का ? ।
कांहिं तरी मख्खि यांत घाबरूं नका ॥ध्रु०॥
आहे काय सूर्य कधीं माखला तमें ।
वा निधीस आग कधीं लागली रमे ! ॥५३॥
॥ ओवी ॥
कौसल्या सुमित्रा कैकयी ॥ भरत शत्रूघ्न तोही ।
या सर्वांसह त्या ठायीं । मुनि वसिष्ठ पातले ॥५४॥
॥ आर्या ॥
हनुमंत कुठें हें पुसतां सीतेनें सर्व कांहिं सांगितलें ।
ऐकुनि वसिष्ठ म्हणती कपिच्या चेष्टा आहेत ह्या कळलें ॥५५॥
वसिष्ठ मारुतीला म्हणाले,
॥ पद ॥ ( राधे कृष्ण बोल )
चुटकी वाजविणें सोड, मिटतें मुळिं न प्रभुचें तोंड ॥ध्रु०॥
( चाल ) कां करुन अशा खेळासी । रामास त्रासभूत होसी ? ।
सांगणें हेंच आहे तुजसी । दे टाकुनि ओंगळ खोड ॥मिटतें०॥
॥ श्लोक ॥ ( शार्दूल विक्रीडित )
आले मारुतिच्यासहीत सगळे रामास भेटावया ।
बोले दाशरथी सुरासुरपती श्रीराम ऐसें तया ॥
आल्या जांभइ तूंच तूंच त्रुटिला वाजीव ती पाहुनी ।
कां कीं मी बसलों सदैव तुझिया बा चित्त - सिंहासनीं ॥५७॥
राम सीतेला म्हणाला,
॥ पद ॥ ( शब्द शिलेच्या )
कळलें का तुज सीते । मारुति मजला प्रीय किती तें ॥धृ०॥
( चाल ) मज जाणुनि तो मद्रूप झाला ।
अम्हां उभयतांमाजिं न उरला ।
द्वैतभाव तो समज येतुला ।
उरला मम सेवेतें । धरूनिया कीं कपिदेहातें ॥कळलें०॥५८॥
सीता म्हणाली,
॥ श्लोक - वसंत तिलक ॥
अर्धांगि मी असुनिया बडिजाव याचा ॥
कां सांगतां निशिदिनीं तरि माकडाचा ॥
अद्वैततत्त्व कपि कोठुन जाणणार ? ।
ज्या भागले जगतिं शोधुन थोरथोर ॥५९॥
सीतेला नमस्कार करून मारुती म्हणाला,
॥ पद ॥ ( नृपममता )
आई ! नकोस अशी रागावूं । हृदयिंचा राम का दावूं । तुजप्रती ॥
( चाल ) हा पहा तुझ्यासह राम, सुजन सुखधाम, घेत आराम ।
दासगणु बोले । असें म्हणून हृदय फ़ाडीलें । तत्क्षणीं ॥६०॥
॥ दिंडी ॥
रामसीतेसह हृदयिं देखियेला ।
मारुतीचा अधिकार कळून आला ॥
झालि सीता गलिताभिमान तेणें ।
केलें केवळ कौतूक हें लिलेनें ॥
वसिष्ठांना परमानंद झाला.
॥ दिंडी ॥ ( प्रतिकूल होईल )
पूर्ण ज्ञानि असुनी लुटि हा भक्तिसौख्य साचा ।
धन्य धन्य जगतीं कळलें तनय अंजनीचा ॥धृ०॥
धवल, रुचिर, पातळ मिळुनी दूश होय जैसें ।
कर्म - ज्ञान - प्रभुपदिं नत जो सफ़ल जन्म त्याचा ॥
मारुतीला धन्यवाद देऊन सर्वांनीं प्रभूची मंगल आरती केली.
॥ पद ॥ ( व्यर्थ गोविलें )
जयजयाजि हे जानकीवरा । जयजयाजि हे गूणगंभिरा ! ॥
( चाल ) पदनतास, दे सुखास, दैन्य त्रास, काळजीस ।
शीघ्र दुर करा । म्हणत हा गणू जोडितों करा ॥
समाप्त