श्रीपांडुरंग याप्रमाणे बोलल्यावर कान्होपात्रेस अतिशय आनंद झाला, तिने,
॥श्लोक (पृथ्वी) ॥
जगत्रयिं समावला असून तो भिमेच्या तटीं ।
विटेवरि उभा कटीं धरुनिया करां कीरीटी ॥
तनू सजल शामशी जलदतुल्य नी गोमटी ।
असा बघुन घातिली दृढ तिनें गळ्याला मिठी ॥६१॥
परमेश्वराच्या गळ्याला मिठी मारली आणि अत्यंत भक्तिभावानें ती देवाला म्हणाली,
॥दिंडी ॥
देइ मजला ह्रुदयात स्थान आतां । मायबापा हे पंढरिच्या नाथा ॥
अतां दूरि केल्यास ब्रिदाला रे । डाग तुझिया लागेल विठ्ठ्ला रे ॥६२॥
कान्होपात्रची भक्ति पाहून परमेश्वराने तिला आपल्या हृदयांत स्थान दिले.
॥श्लोक ( वसंततिलका ) ॥
ज्योतीस ज्योत हरिच्या समरूप झाली ।
वाटे जलांत जलगार असे विराली ॥
दुग्धामध्ये मिसळल्यावरि शर्करा ती ।
का ये कुणास करितां मग वेगळी ती ॥६३॥
कान्होपात्रा देवाचे दर्शन घेऊन येण्याकरिता गेली. तिला विलंब लागला त्यामुळे बादशहाचे चित्त व्यग्र होऊन तो ठाणेदारास म्हणाला,
॥साकी ॥
कान्हो नही है चमकत बिजली जैशी वो बादलमें ॥
देखो उस्से बहोत हुवा है देर जाके मंदरमें ॥
खडे क्यों यहां खाली । उसविन मेरी जान चली ॥६४॥
कान्होपात्रेस येण्यास उशीर झाला म्हणून तिचा तपास करण्यात हेरांस आज्ञा केली. काहीं वेळाने हे तपास करून आले. त्यांनी बादशहास हकिकत कळविली.
॥आर्या ॥
येऊनि हेर नृपाला, राउळींचा सर्व कथिति वृंतात ॥
निजदेहांत मिळविता झाला कान्होस पंढरिनाथ ॥६५॥
बादशाहालाहोरांचे बोलणे ऐकून अतिशय राग आला.
तो हेरांस म्हणाला,
॥साकी ॥
क्या फत्तरनें कान्हो छुपाया मेरा कलिजा दिलका ।
अभी बनाता उस्के टुकडे शहानशहा बेदरका ॥
मैं हूं ख्याल करो, बिलकुल उस्से तुम न डरो ॥६६॥
बादशहा सर्व सैन्यासह मूर्ति फोडण्याकरिता देवळाकडे आला.
॥पद ॥( शारदे.)
राउळीं अला भूपती, सैन्य संगती, घेऊनी अती, विठुस फोडाया ।
घाबरले पुजारी बडवे बहुत त्या ठायां ॥
नको फोंडू नृपा ईश्वरा, रमेच्या वरा, जोडितो करां अम्ही बघ तुजसी ।
तव खुदा करिम हा रहिम तसा हृषिकेशी ॥
ना मानि दगड याजला, तुझा हा अल्ला, आहे बिस्मिल्ला, वैर थोरासी ।
करुं नको, एवढया मान्य करी वचनासी ॥६७॥
बादशहा बडव्यास म्हणाला, काय हा खुदा आहे? शक्य नाही! हा फत्तर आहे! कारण
॥श्लोक ( वसंततिलका ) ॥
ना होय देव कधिहीं जगतांत धोंडा ।
कोंडयास घालून न ये करण्यास मांडा ॥
हा देव हें जरि म्हणाल तरी मला हो ।
दावा तदीय शिरिं ते कच येधवा हो ॥६८॥
तें ऐकून बडव्यांनी देवाची प्रार्थना करण्यास आरंभ केला.
॥ओवी ॥
बडवे पुजारी तें ऐकून । स्तवूं लागले रुक्मिणीरमण ।
म्हणती नृपाचे समाधान । केस दावून करावें ॥६९॥
बडवे पुजारी वगैरे सर्वजण अनन्यभावाने श्रीपांडुरंगाची स्तुति करू लागले.
॥पद ॥ ( चाल - नृपममता)
आलास भिमेच्या काठीं । तूं देवा भक्तासाठीं ॥ विठ्ठला ।
आम्हि अवघे पोटासाठीं । पूजितों तुला जगजेठी ॥
(चाल) भक्तार्थ तरी श्रीहरी, धरावें शिरीं, कच ये अवसरीं ।
प्रभो गोविंदा मग चालेल अमुचा धंदा ॥ विठ्ठला ॥७०॥
॥श्लोक ॥
तात्काळ तो कच धरी स्वशिरीं रमेश ।
कान्होस दावित तशी हृदयीं परेश ॥
त्या पाहतां नृपति तो अभिमान टाकी ।
तो भक्तवत्सल हरी नयनीं विलोकी ॥७१॥
॥साकी ॥
कान्हो दिसता जाय त्वरेंने, धांवत तो नृप तेथे
मोदक देखुनी ते घ्यायातें, शिशु जसें रांगत जातें ॥७२॥
॥श्लोक ॥
कान्होपात्रा वदत प्रभु हे सांवळ्या शेषशायी ।
भेटी ज्यातें त्वदिय घडली, दुर्गती त्यास नाहीं ।
ऐसें गेले वदुनि मुनि ते व्यास-वाल्मिकि मागें ।
तारी तारी म्हणुनि नृप हा, विठ्ठले! पांडुरंगे ॥७३॥
॥दिंडी ॥
स्पर्श होतां भूपास विठ्ठलाचा । असे पाटलाला दुष्टभाव त्याच ॥
लोह गेले परिसास झगडण्यातें । परी बसलें होऊन हेम तेंथें ॥७४॥
॥ पद ॥ ( नृपममता)
कान्होस दिली त्वां जागा । निजहृदयीं रुक्मिणिरंगा विठठला ॥
जी जगते दूरीं धरिली । ती गणिका त्वां उध्दरिली । विठठ्ला ॥
(चाल) जेथ तो भक्तिचा झरा, तेथ तूं खरा, रमेच्या वरा,
उभा नित राहसी । गणु बोले तारी मजसी ॥ विठठ्ला ॥७५॥