॥ लावणी ( भला जन्म हा ) ॥
यदाकदाचित सुत द्यायाचें जरि तूं नाकारिलें ।
आणि मी निमूटपणें ऐकिलें ॥
तरि ना शाश्वति; रोग होउनी तो मृत झाल्या जरी ।
उगिच तूं बसशिल ना भूवरीं ॥
( चाल ) सत्तीनें मलाही तो नेतां येइल ।
झाल्यास तसें रोषास पात्र होशिल ॥
भूपतीकृपेचा योग तुझा जाइल ॥
सर्व बाजुचा विचार करुनी ‘ हो ’ म्हण हें चांगलें ।
आहेत ना तीन आणखी मुलें ? ॥२१॥
ब्राह्मणाच्या डोक्यांत विचाराचें थैमान सुरूं झालें. तो आपल्या मनांत म्हणतो -
॥ लावणी ( तूं चारु तनू ) ॥
संकट केवढें तरी, आलें मजवरी ।
कसें देउं बली द्यायला, पुत्रास नृपाच्या करीं ॥
जरि नाहिं वचन मानिलें तरि न चांगलें ।
कोणाचें जगीं सत्तेच्या, पुढतीं न कांहीं चाललें ॥
हा सत्ताधिश भूपती, आवघे हातीं ।
याचेंच मानतिल सारे, गरिबाचें कुणि न ऐकती ॥
गणुदास म्हणे यापरी विचारा करी ॥
चित्तांत आंतल्या आंत, ना शब्द वदे वैखरी ॥२२॥
किंकर्तव्यमूढ झालेल्या त्या ब्राह्मणाच्या समाधानकरितां तो राजा पुन्हां म्हणतो - भटजी,
॥ श्लोक ॥ ( भुजंग. प्र. )
‘ अजीगर्त ’ यानें अपूल्या मुलाला ।
धना घेउनी ओपिलें रोहिताला ॥
‘ शुन:शेप ’ हे नाम होतें जयाचें ।
पहावें महात्म्यीं तया गौतमीचें ॥२३॥
भटजी म्हणाला -
॥ पद ॥ ( नृपममता )
बलि द्याया मजला न्यावें । परि लेंकरास सोडावें ॥ नृपवरा ॥
मम आतां होणें कांहीं । इहलोकीं उरलें नाहीं ॥
( चाल ) नांदोत मुलें तीं तरी, सौख्यसागरीं, कृपा त्यावरी ।
तुझी नित राहो । धनहिनता अवघी जावो ॥ तव कृपें ॥२४॥
राजा म्हणतो -
॥ ओवी ॥
तुशीं न माझें प्रयोजन । मुलगाच पाहिजे बळीकारण
नको गांगरूं देऊं मन । या वात्सल्यप्रेमानें ॥२५॥
॥ कामदा ॥
घेइ मोजुनी लक्ष मोहरा । मोह आवरी नाहिं हा बरा ।
भिंत नीटशी आसल्यावरी । चित्रें काढितां येति तीवरी ॥
॥ पद ॥ ( मित्रा मग )
कर्णमधुर मोहरांचा ऐकतां क्षणीं - ।
नाद, न्याय, रीत, प्रेम जाय विसरूनी ॥
नयनबाण कामुकास जेविं तरुणिचा ।
वा गुप्ता दारुड्यास होय दारुचा ।
चतकास मुदित करी मेघ स्वातिचा ।
धनहीना करि तसेंच द्रव्य या जनीं ॥२७॥
इकडे त्या ब्राह्मणानें त्या मोहरा एका मोडक्यातोडक्या पेटींत ठेवल्या व आपल्या धनलोभाच्या आनंदांत म्हणतो -
॥ श्लोक ॥ ( वसंत तिलक )
झालों अतां धनिक मी कमि काय मातें ॥
तैसाच प्रीय ठरलों निज भूपतीतें ॥
द्याया दिलें बलिं शिवाप्रति लेंकराला ।
येणें दुजा जगतिं तो चिलयाच झाला ॥२८॥
॥ कटाव ॥
आतां कशाची वाण न उरली । सुभगे ! अपुली दैना सरली ।
जगदीशाची कृपा जाहली बांधिन आतां मोठा वाडा ।
तसा बसाया गाडीघोडा । सदनाभोंवतिं बाग फ़ाकडा ।
कंठा कंठीं करीं सलकडें । पदिं ल्यायाला चमीं जोडे ।
पागोटें कीं शिरीं रोकडें । तलम सुताचें तें चंदेरी ।
अंगावरती शाल दुहेरी । लोकरीची भरजतारी ।
नृपदरबारीं मान मिळाला । महामहोपाध्याय म्हणतिल मजला ।
सर्वांआधीं अक्षत भाला । घेइन तुजला शालु पुण्याचा ।
पैठणीचा येवल्याचा । भरजरतारी दोंगोलाचा ।
बाळ्या बुगड्या नथ मोत्याची । टिका ठूशा त्या सरि सोन्याची ।
चंद्रहार नी शतपुतळ्यांची । माळ दुहेरी, वाक्या दंडीं ।
शिरीं केवडा, मूदराखडी । घालुनिया मधिं मौक्तिकपेंडी ।
गोठ पाटल्या, तोडे बिल्वर । जवेहिर्याचे वरति मनोहर ।
राहतिल दासी सेवेस तत्पर । बैस हमेशा पाटावरती ।
‘ भटिण भटिण ’ तुज कोणि न म्हणती । दासगणु म्हणे ऐशा रीतीं ।
मनोराज्य तो करिता झाला । मृगजलडोहीं पोहूं लागला ।
स्थिति पूर्वींची पार विसरला ॥२९॥
“ पतिराज ! कोणता मुलगा देण्याचें कबूल केलेंत ? ” त्यावर तो म्हणतो,
॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
तृतीय मुलगा प्रिये ! नृपवरास मी ओपिला ।
म्हणून आपणास हा विभवलाभ कीम जाहला ॥
तशीच मिळणार गे । समिपताहि मुक्ति मुला ।
सुयोग कवणा असा अजवरी नसे लाधला ॥३०॥
त्यावर बायको म्हणते,
॥ पद ( हो प्रगट ) ॥
पाहून विभव प्रियकरा ! मदिय मन रिझलें ।
समिपता कशाला म्हणति परी ना कळलें ॥
घेतला नृपानें पुत्र कशास्तव सांगा ।
कशि आलि हि दरिद्री - कुपा विभवरूप गंगा ॥३१॥
त्यावर भटजी म्हणतो,
॥ लावणी ( तूं चारु ) ॥
आल्यास आडवें मूल त्यास कापिती ।
वैद्यास आणुन यत्नानें, जननिला परी जिवविती ॥
ना दिला आपण जरि पुत्र, तरी भूपती ।
नेईल बलात्कारानें, नसे त्यास कुणाची भिती ॥
( चाल ) एवंच आहे जाणार, आपुलें पोर, म्हणून विचार ।
पोक्त करि कांहीं । संपदा सुखें भोग हीं ॥३२॥
धनलोभाच्या धुंदींत तो असें ब्रह्मज्ञान आपल्या कुटुंबास सांगूं लागला. असा परस्परांचा संवाद झाल्यानंतर तो राजा पुन्हां भटजीकडे आला व त्यास म्हणतो,
॥ श्लोक ॥ ( स्त्रग्धरा )
आला पुन्हां, भुपती तो घरा, जोडूनीयां करा, वीनतीला करी ।
अर्पियला पुत्र आम्हां जरी, गोम त्याभीतरीं राहिली ही खरी ॥
माता शिरा पाहिजे कीं धराया असावे तसे पाय ताता - करीं ।
आहे मला भाग हें ठेवणें शस्त्र, त्याच्या पहा कंठनालावरी ॥३३॥
॥ आर्या ॥
त्याप्रीत्यर्थ तुम्हांला देतों घ्या, दोन लाख ह्या मोहरा ।
पाप तुम्हा नच त्याचें भोगिल तें तो मुलास वधणारा ॥३४॥
॥ पद ॥ ( गोदावरीच्या )
निज रयतेच्या सुखार्थ भोगी पाप भूप ऐसा ।
मिळणारचि ना तुम्हांस कोठें मजवांचुनि सहसा ॥
बालकहत्त्या दोष मम शिरीं, तुम्हांस या मोहरा ।
म्हणून मनांतिल वेडेवांकडे विचार झणिं विसरा ॥३५॥
कवी म्हणतात - पहा ! जगांतला न्याय कसा आहे तो !
॥ श्लोक ॥ ( शार्दूल विक्रीडित )
स्वार्थी भूपतिची प्रजा नच खर्या सौख्यास भोगी कदा ।
घाण्याच्या मधल्या उसासम स्थिती होई तिची सर्वदा ॥
राजाज्ञा अवमानण्या विबुधहो ! कोणास छाती नसे ।
न्यायान्याय मुळीं अशा नृपतिला केव्हांहि ना तो दिसे ॥३६॥
॥ पद ॥ ( थोर थोर थकुनी )
मानितील कधिं कां जगती हीन आपणा ।
अनितिमूल ऐशा बुधहो ! वार - कामिना ॥
( चाल ) तेवि स्वार्थि जे कां असती । कपटपटू दुर्जन नृपती ॥
तेच थोर म्हणवुन घेती, नाडुनी जना ॥३७॥
तो राजा भटजीस म्हणतो,
॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
घ्या मोहरा भटजि ! मोजुनि दोन लाख ।
सेवा सदा गृहिणिच्या समवेत सौख्य ॥
जातो शिवास्तव तुझा मुलगा बळीं कीं ।
येणेंच होइल तया बहु लाभ नाकीं ॥३८॥
॥ दिंडी ॥
असें बोलुन भूपाल निघुन गेला ।
पुढें माघाचा वद्य पक्ष आला ॥
रडत बैसे पुत्रास धरुन पोटीं ।
माय होउन मानसीं बहू कष्टीं ॥३९॥
आई आपल्याला पोटाशीं धरून कां रडते याचें कारण त्या मुलाला कांहींच समजेना. म्हणून तो आपल्या आईस म्हणतो,
॥ पद ( व्यर्थ गोविलें ) ॥
धरुनिया मला रडसि कां अशी ।
सांग जननि ! हें येधवा मशीं ॥
( चाल ) बाकिच्यास, कां न घास, घालितेस, घेउन त्यास ।
अपूले मांडिसी । ग । बोल झटदिशीं ॥
काय यावरी, प्रेम तव नसें ।
मीच अवडिचा एक कीं असें ॥
( चाल ) समसमान, तूंज जाण, अम्हि असून अधिकन्यून ।
कां हे आचरसी । ग । उचित ना तुसी ॥