संतापानें फणफणून निघालेली ती गोरोबाची बायको माहेराला पायीं कशी जाऊं म्हणून पाठाळ पाहूं लागली. तोंच तिला जागृति देण्याकरितां गोरोबा म्हणतात :--
॥ लावणी ॥
पाठाळ कशाला पाहसि निराळें तरी ।
अभिमानरूपि नेहमींच्या गाढवावरी ॥
बैसोन करावें गमन पित्याच्या घरीं ।
निन ददातिचें जित्राप दुजें न यापरी ॥
( चाल ) लोभाचि रतिबी चंदि सुरूं तुझि त्यासी ॥ प्रतिदिवशीं
मोहाचि जबर होटाळि आहे तोंडासी ॥ पाठीसी ॥
दंभचि बडी वाकळ झांकाया त्यासी ॥ वेगेंसी ॥
क्रोधाचा तुझा कोरडा घेइजे करीं ।
गणु म्हणे गोरोबा सांगे वधुस यापरी ॥३६॥
॥ आर्या ॥
अभिमानरूप गर्दभ या भव सौख्याचिया उकिरड्यांत ।
चरत सद गे ! पाही ते नच गवसे कदापि इतरत्र ॥३७॥
एकाएकीं माहेराला मूल न घेतांच आलेली पाहून तिचे मायबाप घाबरून तिला विचारतात :--
॥ पद ( मित्र मम ) ॥
दु:खाश्रू नयनीं का ? सांग वाहती ।
बा टाकुन काय तुला बोलला पती ॥
अथवा तुज भाऊबंद कोणि बोलले ।
वा पतिनें सदनांतुन हांकुन लाविलें ।
सांग कुठें ठेविलेस त्वदिय तान्हुलें ॥
यापरी ते मायबाप तिज विचारिती ॥३८॥
॥ ओवी ( जात्यावरील ) ॥
जरी देशिल चोळी मला । अक्षयिची घालायाला ।
तरि सांग अवघें तुशीं । दु:खाचा डोंगर झाला ॥३९॥
॥ पद ॥
रडुं नको मुली तूं सांग हकिकत आज मला सगळी ।
तुजपेक्षां नच अधिक कांहीं देइन खचित चोळी ॥
वर वर नच हें भाषण माझें मुली मनीं आण ॥
इच्छा अवघी पुरविन आजी यास तुझिच आण ॥४०॥
॥ ओवी ॥
मातापित्याचें वचन । घेऊनिया करि भाषण ।
धाकुटिचें कन्यादान । माझ्याच पतीशीं करावें ॥४१॥
दुसर्या कन्यादानाचें काय कारण म्हणून मायबापांनीं विचारल्यानंतर त्या चतुर पतिव्रतेनें मोठ्या खुबीनेम उत्तर दिलें. स्त्री ही पतीची अर्धांगी. नवर्याकडून मूल मारलें गेलें असें न सांगतां ती म्हणाली,
॥ आर्या ॥
माझ्या सव्यकरानेम मच्छिशुचा घात जननि ! जैं झाला ॥
तैं क्रोधावश होऊनि पति माझा तो करी प्रतिज्ञेला ॥४२॥
॥ ( ओवी ) ॥
आजपासोन तुजसी । स्पर्श न करी निश्चयेंसी ।
मारिसी पोटिच्या लेकरासी । लाव तूं हें कळून आलें ॥४३॥
॥ दिंडी ॥
ज्येष्ठ कन्येची भीड तोडवेना । दिली कन्या गोर्यास दुजी जाणा ॥
लग्न झालें थाटांत श्वशुर - गेहीं । सासु -श्वशुराच्या सुखा पार नाहीं ॥४४॥
धाकट्या मुलीचा हात गोरोबाच्या हातांत देतांना सासुसासर्यांनीं त्यांना म्हटलें,
॥ श्लोक ॥
पहिलोई परचि दुसरी नित वागवावी ।
दृष्टी समान विबुधा ! अपुली असावी ॥
एकीस सौख्य, दुसरीस न दु:ख द्यावें ।
हे शब्द नित्य अमुचे मनिं वागवावे ॥४५॥
रुकार देतांना गोरोबांनीं आपल्या शपथेच्या अडचणीचा विचार करून म्हटलें,
॥ आर्या ॥
पहिली समान दुसरी वा दुसरीच्या समान पहिलीला ।
लेखावें म्यां सांगा मागुन ठेवूं नका मला बोला ॥४६॥
भोळ्या सासर्यानें रीतीप्रमाणें सहजच म्हटलें,
॥ कामदा ॥
वागवी दुजी पहिलिच्या परी । तेणें सुख अम्हा होय अंतरीं ॥
शपथ तुजला, फ़रक यामधीं । जावया ! नको करुंस बा ! कधीं ॥४७॥
लग्नसमारंभानंतर गोरोबा दोन्ही स्त्रियांसह घरीं आले. परंतु :--
॥ ओवी ॥
दोन्ही कामिनी टाकुन । गोरा करी पृथक् शयन ।
काम विकारें ज्यांचें मन । लिप्त न कदा जाहलें ॥४८॥
हा प्रकार धाकट्या बहिणीच्या लक्षांत येतांच ती वडील बहिणीस म्हणत्ये,
॥ ओवी ( जात्यावरील ) ॥
नाहीं केलेंस माझें बरें । ना बहीण तूं वैरिण ॥
असुनिया पति नाहिंसा । झाला लग्नाच्या पासुन ॥४९॥
॥ पद ॥ ( भूपती खरे )
धाकटी म्हणे थोरली प्रती रागानें ।
कापिली तुवाम मम मान खचित कपटानें ॥
तारुण्यरूपि काननीं काम हा वन्ही ।
भडकला, त्यांत मी एक गवसले हरिणी ॥
नवर्यानें वाहिली शपथ जणुं तारेचें ।
कुंपण यास, यांतून कठिण सुटण्याचें ॥
( चाल ) हें तुझ्यामुळें कीं सारें जाहलें ।
केलेंस तूंच वाटोळें मम भलें ।
मायबाप थाप देऊनी फ़सविलें ।
गाळांत लोटिली गाय फ़ेडशिल कोठें ।
गणु म्हणे स्त्रियांना ब्रह्म रती - सुख वाटे ॥५०॥
वडिलांचा तरी काय उपाय होता ? बापानें वचन घेतांनाच घोटाळा झाला. तेव्हां आतां धाकटीचें समाधान तरी कसें करावयाचें ? तथापि ती म्हणत्ये,
॥ आर्या ॥
चंदन सुवास घ्याया म्यां तुजला एथ आणिलें बाई ।
परि सर्पदंश झाला तव दैवें; बोल तो मला नाहीं ॥५१॥
॥ दिंडी ॥
नको सोडूं तूं व्यर्थ धीर बाई । युक्ति यातें ती आज करूं कांहीं ॥
निशी झालीया आपण एक होऊं । बलात्कारें निज हेत तडिस नेऊं ॥५२॥
॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
देतो मन्मथ ताप फ़ार म्हणुनी तत्पारिपत्यास्तव ।
पूजूं ये प्रभु नीलकंठ भगवान् जो का मृडानीभव ॥
शाळुंका निज वक्ष कल्पुनि बरें वक्षोज लिंगावरी ।
गोर्याचे कर बिल्वपत्र बरवें वाहूं गडे ! सत्वरी ॥५३॥
ठरल्याप्रमाणें रात्रीं ‘ दोन्हीकडे दोन्ही जाया, मध्यें गोरोबाची शय्या ’ या जनाबाईंनीं वर्णन केल्याप्रमाणें दोघींनीं गोरोबांचे दोन्ही हात आपल्या अंगावर घेतांच ते खडबडून जागे झाले व पाहातात तों हातांकडून असा प्रमाद घडला. लागलीच ते उठले. त्यांना चुकून इंद्रियांकडून घडलेल्या प्रमादाबद्दल पश्चाताप वाटून ते म्हणतात,
॥ पद ॥
करुं मि तरि काय करें घडलें । पाप भयंकर शपथ मोडुनी ॥
तुझी विठोबा नितीपथा त्यजिलें ॥ध्रु०॥
( चाल ) तोडून टाकिन कर हे आतां ॥ भिमातट - निवासिया अनंता ! ॥
त्या दुष्टांची संगत करितां ॥ दुष्ट जगीं मी बनेन बरें कळलें ॥५४॥
॥ ओवी ॥
घेतले हात छेदून । गोरा झाला थोटा पूर्ण ।
तें पाहून जगज्जीवन । अश्रूं ढाळूं लागला ॥५५॥।
देवाच्या डोळ्यांतून अश्रुपात होतो आहे असें पाहून रुक्मिणीनें आतुरतेनें विचारिलें. तेव्हा देवांनीं तिला सर्व वर्तमान सांगितलें.
॥ पद ॥ ( नमुं तुजला )
कर माझे छेदिले ! । भक्तवरानें कमले । माझ्या ।
कां कीं गोरस गोकुळांत मीं याच करें हरिलें ॥ध्रु०॥
( चाल ) त्याचें नच ते, माझे तुटले ॥ माझेंपण तें त्यानें हरिलें ॥
चित्त तयाचें अभेद गे । गणुनें ज्या गायिलें ॥५६॥
गोरोबांनीं हात तोडून घेतल्यामुळें मडकीं घडण्याचें काम सहजच बंद पडलेले पाहून गांवांतील कुटाळांना व संतनिंदकांना तो एक चर्चेचा विषयच झाला. ते परस्पर म्हणूं लागले
॥ आर्या ॥
शपथेसाठीं तोडुन कर थोटाअ होउनी पहा बसला ।
भीमातटस्थ प्रस्तर पाहूं अतां पोषितो कसा याला ॥५७॥
॥ पद ( गुरुदत्तदिगंबर )
भक्तार्थ विठाबाई । जाहली कुलाल की पाहीं ॥
वैजयंति वनमाळा टाकुनि किरिट शिरींचा मोठा ।
क्षेत्र पंढरी त्यजूनि निघाली माय बालेघाटा ॥
मांजरपाठी बंडी अंगीं; धोतर जाडें भरडें ।
गरुडाचें त्या केलें हरिनें लांबकानि घोडे ॥
प्रेम - भातुकें गोणिंत भरुनी ‘ झा झा ’ करित निघाला ।
दासगणू म्हणे अंतरिक्षीं सूर वानितात देवाला ॥५८॥
खाण्याच्या पदार्थांची रेलचेल करून परमात्मा ‘ मी तुमच्या माहेराहून बापाच्या सांगण्यावरून आलों ’ असें त्या दोघी स्त्रियांना सांगून निघून गेला. वारीहून परत आल्यावर गोरोबांना बायकांकडून सर्व वर्तमान कळलें. घरीं सुबत्ता झालेली पाहून दोघींनीं पंढरीला वारीला येण्याची इच्छा दर्शविल्यावरून
॥ ओवी ॥
दोघी कांता बरोबरी । गोरा आला करण्यास वारी ।
बैसला कीर्तनामाझारीं । नामयाच्या श्रवणार्थ ॥५९॥
॥ पद ( सत्त्वहरायासी ) ॥
कीर्तनांत बदला । नामया । कीर्तनांत वदला ॥
पाणिपताका उभारूनियां ‘ विठ्ठल मुखिं बोला ’ ॥
( चाल ) ऐकुन तयाचे बोल सर्व त्यापरी ॥
वर्तलें विबुध हो ! श्रोते अत्यादरीं ॥
मृदुंग वाजती मधुर टाळ झल्लरी ॥
दु:खित तैं झाला । गोरोबा । दु:खित तैं झाला ॥
पाणिपताका करुं कशाच्या थोतेपण मजला ॥६०॥
॥ श्लोक ॥
यावें कराया कर ते पताका । या कीर्तनीं भो ! मम लाज राखा ।
थोटेपणा तो बरवा प्रपंचीं । भक्ता कदा ना प्रभुराज वंचीं ॥६१॥
॥ आर्या ॥
कीर्तनगजरीं फ़ुटलें कर गोर्यासी अनंद सर्वत्र ।
राहील अशुभ कैसें जेथ उभा भक्तवरद श्रीकांत ॥६२॥
भजनांत गोरोबाला दोन्ही हात फ़ुटलेले पाहतांच दोन्ही स्त्रिया आश्चर्यानें थक्क झाल्या. नामदेवरायाच्या कीर्तनांत परमात्मा प्रगट झालेले पाहून,
॥ लावणी ॥
धांवल्या दोघी कामिनी जशा काय काननिंच्या वाघिणी ।
धरुनिया करा बोलल्या प्रभुस गर्जुनी ।
दिसतोसी बरा बाहेरी, परी अंतरी कुटिल कोळसा ।
तव नादें जाहला पती आमुचा पिसा ॥
संसारें मुळीं होइना, माग तूं लागलास कीं शनी ।
टाकिलें पतीनें बाळ पदीं तुडवनी ॥
लाविना अम्हला हात, मिळेना अन्न खावया घरीं ।
तळतळाट तुज लागेल विचारा करी ॥
नवर्यासी दिलेसी हात, कसें त्वां टाळ कुटाया तरी ।
येऊं दे तसें दुडदुडा, कीर्तनीं बाळ माझें रांगत ।
ना तरी डोकें फ़ोडीन जाण मी इथं ॥
यापरी गोर्याची वधू, बोलतां तटस्थ झाली सभा ।
गणु म्हणे दिसेना असुन विठोबा उभा ॥६३॥
॥ श्लोक ॥ ( शार्दूलविक्रीडित ) ॥
काळ्या ! तूं विभवीं न सार म्हणुनी लोकांप्रती सांगसी ।
आणी आपण नेसुनी भरजरी पीतांबरा बैससी ! ॥
कंठा, गोफ़, कडीं, कशास तुजला मेल्या ! मुदी चौघडा ।
घेतें सर्व हिरावुनी मग सुखें वाजीव तो चौघडा ॥६४॥
॥ आर्या ॥
वाक्यसुमनें हीं सेवुन प्रेमें झाला प्रसन्न भगवान ।
खाय कण्या विदुराच्या कौरव - पतिचें रुचेम न पक्वान्न ॥६५॥
त्या दोघींच्या विनंतीला मान देऊन गोरोबाच्या पदरीं पडल्याचें भाग्य xखाणून देव म्हणतो,
॥ पद ॥ ( नृपममता )
नेई न कदा त्या काळ । ज्याचा करीन मी सांभाळ ॥ पाही गे ॥
रक्षिलें तुझें मुल बाई । अजवरि मी होऊनि दाई । साच गे !
( चाल ) नवर्याचा राग सत्वरीं, तान्हुल्यावरी, काढिशील खरी ।
भितिहि अंतरीं । वाटली मजला ॥
यासाठीं येथ बाळाला ॥ आणिलें ॥६६॥
॥ कटाव ॥
अंगि अंगि ती मखमालीची । बहुत मजेची, शिरीं असे ज्या भरजरि कुंची । केस वाकडे कुटील काळे । पदी सांखळ्या तोडर वाळे । कटिं करगोटा सुवर्णाचा, घुंगुराचा । गळ्यांत कंठा तो मोत्यांचा । बिंदलि कड्यानें मंडित पाणी । रांगत येतां हलती दोन्ही । डूल भोंकरें ज्याच्या कानीं । दृष्टमणी मनगट्यामधोनी । जोड दंड कडे दंडीं ज्याच्या । खालिं कोपर्या नागमोडिच्या । बावनकशी सुवर्णाच्या । भालीं पिंपळपानावरती । नानापरिचीं रत्नें असती । किरणें ज्यांचीं केंसावरती । पडुन अतीशय शोभा देती । सजलघनीं जणुं वीज तळपती । गालबोट गालास लाविलें । काजळ डोळ्यांमधें घातलें । भालिं कस्तुरी चिन्ह रेखिलें । रंगित रिंगणें हस्तीं धरिलें । असें बाल तें रांगत आलें । निज जननीच्या पायापाशीं । येऊन ओढी करें लुगड्यासी । बहु अतुरतें पाहें मुखासी । त्या सोहोळ्यासी पाहुनी घाला । भक्तवरद श्रीपंढरिवाला । दासगणू ज्या अंकित झाला ॥६७॥
॥ ओवी ॥
शिशुरूपी चंद्राप्रत । पाहून मन तें चंद्रकांत ॥
मणी स्रवतें झालें तेथ । आलें भरतें प्रेमासी ॥६८॥
॥ श्लोक ( शिखरिणी ) ॥
जसें वर्षाकाळीं जलद जलधारा महिवरी ।
करीती वर्षावा स्तनयुगुल त्याची कृति वरी ।
पयातेम प्रेराया दम न धरितां हो ! घडिभरी ।
हजारी कारंज्यासम स्रवति धारा शिशुवरी ॥६९॥
॥ ओवी ॥
पुढें आदिमाया श्रीरुक्मिणी । गोर्याच्या वधू करीं घेऊनी
बोलती झाली मधुरवचनीं । तया भक्तवरातें ॥७०॥
॥ साकी ॥
या तव भार्या आज तुला मी पहा पुनरपी देतें ।
‘ शपथ मोकळी ’ म्हणे विठोबा, ‘ घाल मला भिक्षेतें ॥
जनरितीं दोघींला । वागिव, मागत हें मी तुला ॥७१॥
याप्रमाणें गोरोबांनीं प्रभू - इच्छेला मान देऊन पुन: संसार केला.