॥ पद ( त्रिवट हिंदोळ ) ॥
जरी झाली निशा भेसुरशी, तरी तमाच्या प्रतिकाराला, ।
उजळतील दीपाशीं ॥ध्रु०॥
कालगतीनें दिवस निशा हे, भेद होती प्रति दिवशीं ॥१॥ जरी०
दासगणु म्हणे म्हणुन नृपाला, जपणें जरूर रात्रीशीं ॥२॥ जरी०
॥ आर्या ( गीति ) ॥
मुकुंदराजास ( राजास ) -
हे जरि उत्तम रितिनें कळलें असतें तुला जयत्पाला ! ।
तरि तूं या लोकांशीं कधिं नचहि लावितास कामाला ॥६२॥
॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
स्वपक्षमंडण बरें करिशि शब्द योजोनिया ।
परी किमपि सार ना समज शब्दजालांत या ॥
समर्थ नच दावण्या मुळिंच शब्द ब्रह्माप्रति ।
तिथेंच कर टेकिते नृपवरा ! तयाची मति ॥६३॥
॥ पद ( भूपती खरें तें ) ॥
बक्षिसें दिलीं नटनाट्यनृत्यगीताला ।
धरिलेंस बिगारी हरी जपति जे त्याला ॥
हें जरि झाले उदरार्थ संत या जगतीं ।
तरि सेव्य घाण गंध्याचे दुकानिं न येति ॥
( चाल ) ना मिळे शिरापुरि खाया ती जरि ।
म्हणुनि का राहाए उपवासी । भूवरी ॥
भागविणें भूक खावूनी । भाकरी ।
गणू म्हणे तसा हा न्याय; चाहि सन्नितिला ।
दुग्धार्थ दोहणें गाय, नको सुकरीला ॥६४॥
मुकुंदराजाचें भाषण राजाला बरेंच लागलें. कलेची निंदा त्याला बरी वाटली नाहीं. त्यानें कलेची कड घेऊन त्यांच्या म्हणण्याची दुसरी बाजू त्यांच्यापुढें मांडली.
॥ पद ( भला जन्म ) ॥
विविध कला त्या अनादि कालापासुनि चालत आल्या ।
कुणीही ना त्य आवमानिल्या ॥धृ०॥
नृत्यपटू गंधर्व अप्सरा पुरंदरें ठेविल्या ॥
( चाल ) तुंबर करि गानास घेउनी विणा ।
शिव प्रसन्न झाला गायनेंच रावणा ॥
गायनेंच रिझवी नारद नारायणा ।
पंचवदन विरूपाक्ष सदाशिव तांडवनृत्या करी ॥
नाचला यमुनातटिं श्रीहरी ॥६५॥
मुकुंदराजास ( राजास ) -
॥ श्लोक ( शार्दूल विक्रीडित ) ॥
या सार्या असती कला नच बर्या सन्मार्ग लावावया
केरा झाडित शोधिनी म्हणुन का ती योग्य पूजावया ॥
भूपा ! गायन हें करील जगतीं चैनी समाजाप्रती ।
मद्याची चट लागल्या पय, खवा कोणी न वाखाणती ॥६६॥
मुकुंदराज्याच्या म्हणण्याचा हेतु जयत्पालाच्या लक्षांत आला व तो सारासार विचाराचें महत्त्व जाणून म्हणूं लागला -
॥ पद ॥ ( भाव धरा रे० )
मणि कांचेचे, दिसतात हिर्यापरि साचे ।
म्हणुनि का डबींत ठेवावें ॥
वा मालिकेंत गोवावें ।
नसतेंच मुखें वानावे । काय गुण त्याचे ।
चकमकी गार ना तैसी ।
म्हणुनि का करणें नाहींशी ॥
शोधून काढुनी तिजसी, ढीग वाळूचे ॥ दि० ॥ ॥६७॥
॥ ओवी ॥
ऐशा नृपाच्या भाषणीं । मुकुंदराज तोषले मनीं ॥
म्हणती प्रगट झाला याचे मनीं । सारासार विचार ॥६८॥
मुकुंदराजास ( राजास ) -
॥ दिंडी ॥
नृपा ! अंब्याच्या गांठि बांधल्यास ।
तुरट, अंबट लागती म्हणुन त्यास ॥
काय कोणी पाडिती अवर्जून ।
पूर्ण होतां त्या पावतील मान ॥६९॥
इतर, अपरा, विद्या व ब्रह्मविद्या यांतलें अंतर राजाच्या ध्यानांत येत असलेलें पाहून मुकुंदराज म्हणतात,
॥ झंपा ॥
ब्रह्मविद्या खरी एक या भूवरी ।
ब्रह्म जीवा करी हीच राया ! ॥
एक तोची असे जन्ममृत्यु नसे ।
हेंच कीं मिळतसे अनुभवाया ॥
कर्मभक्तीविना ही न लाभे कुणा ।
जेविं का शिशुपणा, थोर व्हाया ॥
लोणि ताकीं असे, ब्रह्म शब्दीं तसे ।
बुधचि त्या घेतसे, घुसळूनीया ॥
दासगणु हा म्हणे, म्हणुन सावधपणें ।
सत्य नित शोधणें, जगिं तराया ॥७०॥
मुकुंदराजांच्या भाषणाचा भावार्थ ध्यानीं आणून आपण जो ढोंगी साधूंच्या सुळसुळाटाला आळा घातला तो योग्य जाणून राजा म्हणाला,
॥ आर्या ॥
तेंच मी येथें केलें या अवघ्या वेषधारि लोकांस ।
लावुन कामावरतीं शब्दच्छलाचाच चुकविला त्रास ॥७१॥
तथापि शब्दानें त्याचें थोडेंच समाधान होणार होतें ! ब्रह्मवस्तूचा साक्षात्कार करून देण्यास हेच योगी समर्थ आहेत, हें जाणून राजा म्हणाला,
॥ श्लोक ॥ ( भुजंग प्रयात )
समाधान शब्देंच तें मानिल्यास ।
कधीं येइ का ब्रह्म तें प्रत्ययास ॥
न मी ऐकण्या, ब्रह्म पाह्यास आलों ।
झणीं दाखवा, ना तरी हा निघालों ॥७२॥
॥ पद ॥ ( नृप ममता )
भूपाळ सिद्धची झाला, परतून गेहि जायाला ।
( चाल ) रिकिबींत ठेविला पाय, तईं गुरुराय, ॥
सोडुनी ठाय, धांवुनी आले, ।
गर्जून नृपासी वदले । या रितीं ॥७३॥
॥ दिंडी ॥
जरि न अजुनी अधिकार तुझा झाला ।
शुद्ध कैसें तें ब्रह्म पहायाला ।
तरी सामर्थ्या मदिय खर्चुनीया ।
तुला दाखवितों ब्रह्म पहा राया ! ॥७४॥
॥ आर्या ॥ ( गीति )
घोड्यासह भूपतिची लावियली श्रीमुकुंदरायांनीं ।
शुद्ध समाधी बुध हो ! अपुल्या नुसत्या कृपाकटाक्षांनीं ॥७५॥
॥ श्लोक ( मालिनी ) ॥
चलनवलन झालें बंद त्याचें क्षणांत ।
निघुनि दिवस गेले तीन ऐशा स्थितींत ॥
नृपवर अदितत्त्वीं पूर्ण रंगून गेला ॥
लवणकण जसा का सागरीं तो विराला ॥७६॥
याप्रमाणें योगीवर्य़ मुकुंदराजांनीं जयत्पाल राजास ब्रह्मसाक्षात्कारानें कृतार्थ केलें !