॥ आर्या ॥
सेना वारिक नामें, होता हो भक्त एक श्रीहरिचा ॥
बादशहाचे पदरीं, ऐका वृत्तांत हा तुम्ही त्याचा ॥१॥
॥ दिंडी ॥
बहमनीचें महाराष्ट्रिं राज्य थोर । नगर बेदर वैदर्भ विजापूर ॥
असे झाले तद्भाग वेगळाले । यवन - धर्मा प्राबल्य सहज आलें ॥
॥ ओवी ॥
एका बादशहाचे पदरीं । सेना होता चाकरी ॥
अहोरात्र भजन करी । सप्रेम पांडुरंगाचें ॥३॥
॥ कटिबंध ॥
सांवळा तनूचा वाण, भरिव ती मान, वळविली छान,
कान्सुलावरती ॥ झुलपें तीं वांकडीं, भव्य जयाची छाती ॥
धोकटी वाम बगलेंत, दर्पणासहित, असे कंठांत, माळ तुळशीची ॥
डोईस पिळ्याची पगडि पीत रंगाची ॥
सलकडें रुळे मनगटीं, शिपाईधाटी, जरिचा कटि, कसियला शेला ॥
पायांत चांदिचा तोडा, अंगि अंगाला ॥
( चाल ) करकरा चढावू वाजे, चालतां ॥
बाणली जयाच्या अंगीं, लीनता ॥
दवडिना काळ केव्हांही, तो वृथा ॥
विमलशा तदिय अंतरीं, मुखाभीतरीं नाम हें गाजे ।
निज कर्म कराया, म्हणत गणू नच लाजे ॥४॥
॥ श्लोक ॥
श्मश्रू करी बहुत उत्तम संत सेना ।
नाहीं असें निजमुखें न म्हणेच कोणा ॥
वाणी तदीय रतली नित रामनामीं ।
जाऊं न एक घडी दे कधिंहि रिकामी ॥५॥
सेना न्हावी हा पंढरपूरचा वारकरी होता. एका वारीला जाण्यासाठीं त्यानें बादशहाला रजा मागितली. पण बादशहानें ती दिली नाहीं. सेना न्हावी नोकरी सोडून जाण्यसहि तयार होता. पण त्याचा मालक जो बादशहा, त्यानें आपल्या सत्तेनें नोकरी सोडूं दिली नाहीं. यामुळें त्याचा नाइलाज झाला होता. त्याचें सगळें लक्ष काय तें पंढरपुराकडे लागलें होतें. पण सत्तेपुढें शहाणपण उपयोगाचें नाहीं, असें समजून तो स्वस्थ बसला.
एकादशीचे दिवशीं आज न्हावी रिकामे सांपडतील असें समजून,
॥ अभंग ॥
काहीं गौळियाच्या म्हशी । आल्या होत्या भादरण्याशी ॥
अन्य वारिक आढळेना । खुंटावरती होता सेना ।
परि तो वारिक मोठ्याचा । हिय्या होईना गवळ्याचा ॥
गणु म्हणे थोरांप्रती । लोक सहजासहजीं भीती ॥६॥
॥ ओवी ॥ ( जात्यावरील )
म्हशी भादरण्याशीं आल्या । नाहीं वारिक खुंटावरी ।
काम नसल्या येती मेले । ताक मागायाला घरीं ॥७॥
॥ दिंडी ॥
कोपवश ना व्हावें तूं मायबाई । गरिब न्हाव्यांना कधिं न दोष देई ॥
काय आहे, तव काम मला सांग । नको न्हाव्यांचा करूंस वृथा राग ८।
॥ छक्कड ॥
गौळण म्हणाली,
तूं असुन नसुन सारखा । तुला मी काय काम सांगूं ? ।
कण्या कां कुबेरास मागूं ? ॥ध्रु०॥
माझी डोबड मोरी - भोरी नदीच्यावरीं भादराया ॥
गुराखी आला घेऊनिया ॥
तूं बारिक न आमुचा, बादशहाचा वतनदार ॥
अम्हां पाहिजे बलोतदार ॥
गणु म्हणे, दुधाला वाटी, ताका नरवंडि, न्याय ठरला ।
चणे ना देती हलगटाला ॥९॥
॥ श्लोक ॥
सेना म्हणाला,
थोराचे जितुके तयावरि असे, सत्ता जगाची खरी ।
गंगेला बुध भूप विप्र खलहि, येऊन पाणी भरी ॥
सूर्याचीं किरणें समान सकलां, मेघोदरीचें जल ।
केली कां महिने कधीं निवड ती, हा सुष्ट वा हा खल ॥१०॥
॥ दिंडी ॥
चाल येतो मी नदिस तुझ्या संगें । सर्व डोबडिला भादरीन अंगें ॥
आम्ही वारिक आहोंत त्याचसाठीं । खर्सडा कां कुणि बैसविती पाठी ॥११
॥ ओवी ॥
इतुक्यामध्यें सेनाची । कांता आली तेथ साची ॥
करून तयारी पूजेची । निज पतीला बोलावण्या ॥१२॥
इतक्यांत सेनाची बायको त्याला अंघोळीला बोलविण्यासाठीं तेथें आली व आपला नवरा म्हशी भादरण्यासाठीं जात आहे, हें पाहून म्हणाली :-
॥ ओवी ( जात्यावरील ) ॥
दिली देवानें आपणा । मानपानाची भाकरी ॥
ती टिकवावी साजणा । तिथें जाउन वेळेवरी ॥१३॥
“ अहो, परमेश्वराच्या कृपेनें तुम्हांला बादशहाच्या खास दरबारची नोकरी लागली आहे. तुम्ही हें म्हशी भादरण्याचें काम करून, ती गमावूं नका. ”
॥ दिंडी ॥
सेना म्हणाला,
भूपतीच्या सेवेंत अर्थ नाहीं । सुळावरली ती पोळी दुजी पाही ॥
वरी झकपक परि आंत घाण फ़ार । राजसेवा जणु शहरिचें गटार ॥१४॥
॥ ओवी ॥
सेना न्हावी नदीवरी । गेला गौळणीचे बरोबरी ॥
म्हणे जावो राहो वा चाकरी । या समजसेवे पुढें ॥१५॥
॥ गज्जल ॥
हजामकू जल्द ले आना । चले जाव देर मत करना ॥
मुलाजिम होके ह्या पैं क्यौं । हजर रहेता नही सेना ॥
बनायेंगे बाल पहिले । करेंगे हम पिछे खाना ॥
दवडो भागे इसी वख्त तुम । बात उस्की कछु न सुनना ॥
॥ आर्या ॥
सदनीं सेना वारिक, स्नान करूनी पूजेप्रती बसला ।
तो इतुक्यामध्यें आला बादशाहाचा शिपाई दाराला ॥१७॥
॥ पद ॥
कशी आफ़त आली ही बाई । म्हशीमुळें वेळ जाहला ॥
जावया नौकरीवर आतां रक्षण करि विठ्ठला ॥
( चाल ) जा उठा, उठा लौकरि । नौकरीवरी । जाइल चाकरी ।
आशा ढंगानं ॥ करा मागुन हरिपूजन ॥१८॥
॥ श्लोक ॥
सेना म्हणे मी उठणारा नाहीं । जा दे शिपायास सांगून कांहीं ।
सारीन पूजा अवघी हरीची । पर्वा न त्याच्या मज नौकरीची ॥१९॥
॥ आर्या ॥
नाहीं घरांत वारिक, आल्या इतुक्यांत राजवाड्यासी ।
धाडुन देइन त्यातें, व्यर्थ बसा ना उगीच ओट्यासी ॥२०॥