मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
चरित्र १

मुकुंदराज - चरित्र १

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
सभाग्य महाराष्ट्र जो हृदय आर्यभूमिप्रती ।
जिथें जनन पावले सुभट, संत नी सन्मती ॥
अशा पुनित देशिं त्या धरुन जन्म आले क्षितीं ।
असो नमन हें तया द्विज मुकुंदराजाप्रती ॥१॥

॥ दिंडी ॥
आदि कवि वा मागून असे झाला ।
जन्म कोठें वा कोण पिता याला ॥
थांग याचा इतिहासशोधकांसी ।
अजुन कांहीं लागे न निश्चयेसी ॥२॥

॥ ओवी ॥
कोणी म्हणती वर्‍हाडांत । जन्म याचा असावा सत्य ।
कां कीं बैतुलाजवळील खेड्यांत । किल्ल्यांत समाधी असे कीं ॥३॥
वैनगंगेचें तिरीं । अंभोरें नामें नगरी ॥
तया ग्रामामाझारीं । समाधि हरिनाथाची ॥४॥
प्रत्यक्ष गुरु रघुनाथ । यांची समाधी झिंदवाड्यांत ॥
म्हणुन मुकुंदराजाप्रत । तत्प्रांतीं ठरविलें ॥५॥
परि विचार पाहतां । हा महाराष्ट्रीय ब्राह्मण सर्वथा ॥
याचेविषयीं दंतकथा । विरूद्धाविरुद्ध असती रूढ ॥६॥

॥ पद ॥ ( लावणी )
महाराष्ट्रिं येऊन यवनांनि तक्त स्थापिलें ।
बहिमनी नाम यांचेंचि, पुढें पांच भाग जाहले ॥
( चाल ) वैदर्भ, विजापुर, नगर । कुतुबशाहि, बिदर ।
गंगेचें तीर । आलें वांट्याला ।
नगरिच्या निझामशाहिला ॥७॥

॥ ओवी ॥
या निझामशाही परगण्यांत । आले महाराज जन्माप्रत ।
कोठें तरी महाराष्ट्रांत । आसमंत भागीं गोदेच्या ॥८॥

॥ दिंडी ॥
स्थूलमानें ऐसें किं कळुन येतें ।
मुकुंदाचें उपनाम शेष होतें ॥
म्हणुन कवि हा राहणार नांदेडीचा ।
असावा कीं ऋग्वेदि विप्र साचा ॥९॥

॥ पद ॥ ( चाल शारदे० )
मूरि ती मुकुंदराजाची, अष्ट वर्षांची, सोडमुंजीला ।
आलीसे हर्ष ना माय जननि - जनकाला ॥
कमरेची मुंज सोडिली, तयारी झाली, काशियात्रेची ।
बांधण्या सिधा धांदल उपाध्याची ॥
आधींच पोर सुंदर, मनोहर फ़ार, दुजा बालार्क ।
शोभवी मुखा गांभीरपणाची झांक ॥
( चाल ) घातिले विविध सोन्याचे, दागिने ।
हिरकणी, हिरे, मोत्याला, नच उणें ।
भुषविलें भालाभागाला, चंदनें ।
कृष्णसा तिलक कस्तुरी, भृकुटिभीतरीं, अंगिं नव शेला ।
गणु म्हणे किति त्या वानुं राजबिंड्याला ॥१०॥

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
देता करीं दधि, पदां नमिले मुकुंदें ।
“ येतो कृपा मजवरी जननी असूं दे ॥
मी त्वत्कृपें पशुपती अपुला करीन ।
अज्ञान जीव भवसागरिं उद्धरीन ” ॥११॥
सोडमुंजीचा विधि म्हणजे केवळ सोंगाची संपादणी, परंतु मुकुंदराजांच्या मनांत, आंत एक बाहेर एक अशी दांभिकत्वाची भावना नव्हतीच. विधींतील क्रxप्रामाणें ते घोड्यावर स्वार तर झालेच आणि खरोखरच,

॥ पद ॥ ( धपधपा मारी )
घोड्यास मारुनी टांच, निघुनिया गेले ।
अहो, परत न फ़िरले, चकित जन झाले ॥
घरिं मायबाप त्यायोगें बहुत घाबरले ।
पितयानें शोध करण्यास, धाडिले स्वार ॥
पहा, बहु दुर दूर, परि ते बेजार ।
झाले; दासगणु म्हणे शोधि रविस अंधार ॥१२॥

॥ श्लोक ( शार्दूल विक्रीडित ) ॥
योगभ्रष्ट मुळींच तो गुरुचिया सन्नीध जातांक्षणीं ।
आले त्या समजून ईश जगता आहे कसा व्यापुनी ॥
येतें कीं परिसासवें विबुध हो ! हेमत्व लोहास तें ।
वा येतां उदया रवी रजनि ती जैशी पहा संपते ॥१३॥
सद्गुरुची गांठ पडून मुकुंदराजांनीं अनुग्रह घेतल्यानंतर,

॥ पद ॥ ( प्रियासी रमवाया जाऊं )
तुरग पुढें, परत गृहा पाठविला ।
अंगावरचे नग सोन्याचे, गोफ़, कडीं, शेला ॥
( चाल ) जननीजनका पत्रें लिहिलीं ।
“ परमार्थाची आस उदेली ॥
म्हणून मी ऐसी कृति ही केली ।
नच करणेम शोकला - ” तुरग० ॥१४॥
वडील कसें तरी धीर धरतील. मातृहृदयाला कुठून धीर धरवणार ! म्हणून तिच्याकरितां पुन: दुसरें पत्र त्यासोबत दिलें.

॥ पद ॥ ( तूं सगुण सुरुप० )
आई करूं नको शोकास मजविशीं जरा ।
उद्धार तुझा करण्यासी, वश करिन पार्वतीवरा ॥
ध्रुव बाल पांच वर्षांचा निघुन कानना ।
गेला किं शोधण्यालागीं, जगदीश्वर नारायणा ॥
( चाल ) निज पितर तारण्यासाठीं । भगीरथजेठी ।
करून खटपटी । आणाया गेला ।
कैलासिं, स्वर्गगंगेला ।
त्यापरिच पुत्र हा तुझा तपा बैसतो ॥
येईन परत भेटीला, एकदां बघुन ईश तो ।
( चाल ) तोंवरी आई दम धरीं । दु:ख ना करीं ।
मनाभीतरीं । क्षणिक भव सारा ॥
गणु म्हणे विचारा करा ॥१५॥

॥ आर्या ॥ ( गीति )
वारू नगसह येउन, जननीजनकांचिया पदां नमिलें ।
अघटित या पशुकृतिला पहातां सारे चकीत जन झाले ॥१६॥

॥ श्लोक ॥
लहान परि रम्यसी नगरि नाम अंबापुरी ।
जगज्जननि अंबिका वसत जेथ जोगेश्वरी ॥
अश पुनित पट्टनीं जयतपाळ राजा असे ।
स्वधर्मरत सन्मती, कपट ज्यास ठावें नसे ॥१७॥

॥ पद ॥ ( भला जन्म )
त्या नगरींच्या सभोंवतालीम बागबगीचे अती ।
जणुं कां हरिची द्वारावती ॥
स्वार प्रभातीं मैदानावर घोड्यांना फ़िरविती ।
पंथें गजघंटा वाजती ॥
( चाल ) रोहिणीरमण नक्षत्रिं विराजे जसा ।
शोभला मध्यभागास हर्म्य कीं तसा ।
दारिं बंदोबस्त शिपायांचा असे फ़ारसा ॥
करीं जयांच्या तलवारी त्या चपलेवत् तळपती ।
गणु म्हणे कवनीं वानूं किती ॥१८॥

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
प्रभातसमयीं करी गमन भूप अंबालया ।
जगज्जननि जी तिचे सुखद पाद वंदावया ॥
तिथें बसुन प्रत्यहीं सकल धर्मबाबींप्रती ।
पहात; निरपेक्षता त्यजि न साच ज्याची मती ॥१९॥
याप्रमाणें तो भाविक, मुमुक्षु, राजनीतिपुण जयत्पाळ राजा राज्यकारभार चालवीत असतां एके दिवशीं असा चमत्कार झाला कीं,

॥ आर्या ॥ ( गीति )
मंदिरच्या दरबारीं असनावरि एक येउनी बसला ।
योगी, योगबळानें शिपयाला बैसतां न जो दिसला ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 13, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP