( भाग पहिला )
॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
शुची धवल कीर्ति जो प्रिय हरीस प्राणाहुनी ।
दुजा सगुण भक्तिचा ध्वजचि काय वाटे जनीं ॥
अखंड रतली गिरा हरिचिया सुनामामृतीं ।
करीत गणुदास त्या नमन नामदेवाप्रती ॥१॥
॥ आर्या ॥
नरसी - बामणि नामें, आहे खेडें प्रसिद्ध महाराष्ट्री ।
कोणी कृष्णातटिं या, दाविति कोणी कयाधुच्या कांठीं ॥२॥
॥ दिंडी ॥
तुम्ही ऐका त्या चरित नामयाचें । हरण करितें जें पाप ताप साचें ॥
शिंपियाच्या वंशांत जन्म ज्याचा । भक्तिपंथीं आचार्य होय साचा ॥३॥
॥ श्लोक ( वसंत तिलका ) ॥
झाला असे नरहरी अवतार जेव्हां ।
प्रल्हाद होउनि धरी पद हाच तेव्हां ॥
हाची पुढें तनय वालिस शोभला हो ।
केले पुढें गमन यानिंच गोकुला हो ॥४॥
॥ कटिबंध ॥
वैकुंठिं म्हणे श्रीकांत, मिळवुनि संत, विचार ऐकावा ।
महितलीं जन्म घेउनि भक्तिपथ दावा ॥ध्रु०॥
जाहले लोक जर्जर पातकी फ़ार, म्हणुनि आवतार, तुम्हां हा घेणें
कलियुगिं नाममहिम्यास त्वरित वाढविणें ॥
( चाल ) मीं कलिंत एक नामाच्या वांचुनी ।
ना होय लभ्य कवणाही लागुनी ।
या पुढें योगजपजाप्यादिक उणी ।
कलियुगिं, एक तें सार नाम साचार, हेंच आधार, जिवा तरण्याला ।
गणुदास म्हणे यासाठीं “ विठ्ठल ” बोला ॥५॥
॥ ओवी ॥
प्रमोद नाम संवत्सरीं । शके अकराशें ब्याण्णवांतरीं ॥
कार्तिक शुद्ध एकादशी रविवारीं । आला नामया जन्मातें ॥६॥
॥ दिंडी ॥
पांच वर्षांचे नामदेव झाले । तईं ऐकाहो काय घडून आलें ॥
शेटि दामा गांवास असे गेला । म्हणुन पूजेसी नामदेव आला ॥७॥
॥ श्लोक ( इंद्रवज्रा ) ॥
पूजा करूनि अवघी हरीची । जोडोनिया हात प्रभूस याञ्ची ॥
दुग्धांत ही भाकर कुस्करून । खा पांडुरंगा मम राख मान ॥८॥
॥ ओवी ( जात्यावरची ) ॥
ही न खाशिल भाकर जरी । मज मारील माझा पिता ॥
असें म्हणूनि तोंडापुढें । नेई भाकर धरूनि हाता ॥९॥
॥ लावणी ( जानवें करून वादिचें० ) ॥
ध्रुव बाल पांच वर्षांचें । काननांत समजाविलें ।
नेऊन अढळशा जागीं । त्यालागीं तुंवा बसविलें ॥
( चाल ) शेंबड्या गोपगौळणी । वैकुंठभूवनीं । आणिल्या नेऊनी ॥
पंढरीनाथा, खा भाकर माझी आतां ॥१०॥
॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
देवा, तूं बहु थोर या त्रिभुवनीं; मी पोर कीं शेंबडें ।
श्रेष्ठत्वा जपण्यास काय अपुल्या दुर्लक्ष माझ्याकडे ॥
केलेंसी अवमानुनी नच कळे या भाकरीला हरी ।
प्रल्हादास्तव तूंच त्या प्रकट कीं झालास स्तंभांतरी ॥११॥
॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
लोहास चुंबकमणी जशि दे गतीला ।
झाले असे बिबुध त्यापरि राउळाला ॥
नारायणें बघुन भाकर हास्य केलें ।
नाम्यास पाहुन विठू मग काय बोले ॥१२॥
॥ पद ॥ ( गोदावरीच्यापासुनीअंबे. )
खातो भाकर आज तुझी परि येथुनि या पुढती ॥ध्रु०॥
आग्रह ऐसा कधीं न धरावा नाम्या, कल्पांतीं ।
प्रेमळ भाविक भक्त अवडता तूंची या जगतीं ।
कोणालाही प्रकार आजिचा नाम्या, मुळिं न कथी ॥१३॥
॥ दिंडी ॥
गृहीं येतां गोणाइ पुसे त्यासी । कुणालागी नैवेद्य दीधलासी ॥
म्हणे नामा, हें मज न विचारावें । दिली आहे ताकीद, आइ, देवें ॥१४॥
॥ पद ॥ ( धपधपा मारि भागुस. )
म्हणे नामदेव जननीस आई ऐकावें, हा मुळिं नच भावें ।
नैवेद्य पांडुरंगाला, झणि गोडगोडसे, लाडु करूनिया द्यावें ॥
कां कीं तो जगाचा तात । पंढरीनाथ । आहे लक्ष्मीकांत ।
त्या न शोभत । ही भाजी - भाकरी, आण कांही ध्यानांत ॥१५॥
॥ ओवी ॥ ( जात्यावरच्या चालीवर ) ॥
जी दिधली दुधभाकरी । त्वां माते मजकारणें ।
ती करितां मी आग्रहा । पहा भक्षिली नारायणें ॥१६॥
गोणाई म्हणाली,
॥ दिंडी ॥
आतांपासुनी खोटें न असें बोले । भाकरीचें मज सांग काय केलें ? ॥
प्रस्तराची त्या मूर्ति विठ्ठलाची । कशी खाइल भाकरी सांग साची ? ॥१७॥
॥ आर्या ॥
शपथ तुझ्या पायाची, खोटें मी यांत बोललों नाहीं ॥
संशय असल्या तुजला, भगवंताला विचारुनी येई ॥१८॥
॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
या भक्तराजवचनें जननीस आला ।
संताप फ़ार मग बोलत ती तयाला ॥
वेड्या, जगीं दगड ना कधिं बोलतात ।
सांगू नको मजसि ही बनवून मात ॥१९॥
॥ ओवी ॥
तेथें शेजारीण एक होती । ती बोलली गोणाई प्रती ।
बनवून सांगण्याची अक्कल ती । अजून न आली नाम्याप्रत ॥२०॥