मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीरोहिदास चरित्र ४

श्रीरोहिदास चरित्र ४

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ दिंडी ॥
दुजें कंकण मजपाशिं ना नृपारे ! । एक होतें तें तुजसि अर्पिलें रे ! ॥
शपत वाहतों अन्यथा यांत नाहीं । दुजासाठीं ना मदिय प्राण घेईं ॥६१॥

॥ पद ॥ ( मालकंस )
जा आठ दिवसांमध्यें कंकणासी ।
घेऊन यावें मज द्यावयासी ॥
हें ना घडे रे ! तरि जाण गेला ।
वेड्या, तुझ्या प्राण मृत्यूपथाला ॥६२॥

॥ लावणी ॥
दुर्दैवि मुळिं मि जन्माचा ।
मज सौख्य मिळे कोंटुनी ? ॥
पळसास तीन पानेंची ।
जरि गेला तो कोंकणीं ॥
( चाल ) त्यांतून सांगे व्यवहार, असावें फ़ार,
जपुन साचार । चोर, नृप, वन्ही ॥
यांशिं लगट करूं नये कुणि ॥६३॥

॥ श्लोक ॥ ( शार्दूलविक्रीडित )
राजा, पावक,व्याघ्र, खङ्ग, नग वा वापी, नदी, सागर ।
गेंडा, सूकर, सिंह, अस्वल, फ़णी यांपून राहीं दुर ॥
हे सारे जरि माननीय असले ना संगतीला बरे ।
सूर्या देव म्हणून गेहीं ठिविल्या जाळील तो तें खरें ॥६४॥

॥ पद ॥
संताशिं कपट म्यां केलें । त्याचें हें फ़ल मज मिळलें ॥ खचितची ॥
( चाल ) सत्यास कुठें ना भीति, शास्त्रें सांगतीं, मजही आसतीं ॥
ठावीं परि केला । म्यां तिकडे कानाडोळा ॥६५॥

॥ लावणी ॥ ( भला जन्म हा )
सन्मान वाढतो जगीं परंतू अपमानाचें हरी ।
वाटतें भय अक्षय अंतरीं ॥
ज्याला चाहतो परी तयाला नित ठेवी बाहेरी ।
जयाचा तिटकारा तो धरी ॥
( चाल ) भोंवतीं सुवासा केतकि लावी नवी ॥
सदनांत ओसरीवर विष्ठा सांचवी ॥
पडद्यांत वारयोषिता; गर्त नाचवी ॥
ऐशा ह्या माना अपमाना मूढ महति आणिती ॥
गणु म्हणे संत तया निंदिती ॥६६॥

॥ पद ॥ (  हा काय )
धन्य धन्य तूं पुण्य पुरुष या भूवर महाभागा ! ॥
विमल भक्तिनें शुद्ध वर्तनें वश केलिस गंगा ! ॥
( चाल ) जात तुझी चांभार, परि तूं बा बहू थोर ।
फ़णस फ़ळापरि तूंच म्हणाया एक जगीं जागा ॥६७॥

॥ लावणी ॥
निवडुंग मी हो भूदेवा । तुम्हि अगरुसार चंदन ॥
समाजरूपि पुरुषाचे । आहेत मुख ब्राह्मण ॥
( चाल ) क्षत्रियवर्ग तो कर, वैश्य उदर आम्ही पद थोर ।
असें आहे नातें । मुख कुठुनि पदा चाटतें ? ॥
इतुकीच विनंती आतां । परके न अम्हा मानणें ॥
ज्या ठायिं निर्मिलें देवें । तेथेंच सतत ठेवणें ॥
( चाल ) यासाठीं नमन ना करा, मला चाकरा, कशास्तव घरा,
आलां परतून । गणू म्हणे द्या तें सांगुन ॥६८॥
यावर शास्त्रीबुवा म्हणाले,

॥ श्लोक ॥
पुण्यश्लोक म्हणून कंकण तुला भागीरथीनें दिलें ।
होतें, तें अपुलेंच मी समजुनी भूपाप्रती ओपिलें ॥
“ तज्जोडी मज दे ” म्हणून नृपती हट्टा आतां पेटला ।
नाहीं तें मिळलें तरी मजसि तो मारावया बैसला ॥६९॥

॥ आर्या ॥
राजसभे मी येतों तुमच्यासह द्यावयास कंकण तें ।
कौतुक निधिचें इतरां, मत्स्यशिशू ना तयास डगमगतें ॥७०॥

॥ दिंडी ॥
राजवाड्या चांभार एक आला । द्यावयासी काढून कंकणाला ॥
चला त्याचें कौतूक पहायासी । प्रीय म्हणतो तो बहुत जान्हवीसी ॥७१॥
गुजराथी साहू म्हणूं लागले कीं,

॥ पद ॥
कंकण अपवा एक बेटो चमार आव्यो छे ।
‘ पाणी मां हूं कंकण काढिश ’ एवो बोले छे ॥
चालो जुव्वा गम्मत अपने राजाजीने घेर ।
दुकानदारी बंद करोजी अमथा होती देर ॥७२॥
राजवाड्यांत एक चांभार येऊन कंकण काढून देणारा आहे ही बातमी सर्व शहरभर झाली व हजारो लोक राजवाड्यांत जमा आहे. रोहिदास राजाला मुजरा करून म्हणाले कीं,

॥ ओवी ॥
पाणी भरून काथवटींत । आणा मजपुढें त्वरीत ॥
कंकण देतों येथल्या येथ । द्विजा न मारी नृपनाथा ॥७३॥

॥ पद ॥ ( मित्रा मम )
जग गंगे ! जगज्जननि ! जान्हवी शिवे ! ॥
‘ तीर्थ, तीर्थ ’ म्हणत तुजसि वेद निज रवें ॥
विष्णुपदीं विमलयशा, पापमोचनी ॥
अशिवव्याधिनाशक तूं सौख्यदायिनी ॥
गोदे, वरदे, करदे, भवसागरीं ॥
घे लौकरि, गणु पदरीं, त्र्यंबकोद्भवे ! ॥७४॥

॥ पद ॥ ( नृपममता )
मन गंगा ज्याची झाली । त्या गंगा चहुंकडे भरली ॥
हें तत्त्व सत्य असलीया । हो प्रगट शिवे ! पात्रीं या ॥ लौकरी ॥
( चाल ) कंकणा, देउनिया जना, देइ दर्शना,
म्हणुन प्रार्थना, तुझी मीं केली ॥
गणुदासाची हो वाली ॥ गौतमी ॥७५॥

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
असे वहन तो जिचा मगर, जी सुचंद्रानना ।
चतुर्भुज मनोरमा, कुटिलकेशि, सल्लक्षणा ॥
अशी प्रगटली पुढें विमलकीर्ति भागीरथी ।
चकीत जन जाहले टकमकां तिला पाहती ॥७६॥
सगुणरूप धारण करून गंगा प्रगट झालेली पाहतांच रोहिदास लोटांगण घालून प्रार्थना करूं लागला -

॥ श्लोक ( पंचचामर ) ॥
विष्णुपादपकंजोद्भवे ! सुशैलवासिनी ! ।
पापतापदु:खशोकसर्वव्याधिनाशिनी ॥
निर्मले ! सुमंगले च स्वर्धुनी ! सुशर्मदे ! ।
नमामि देवि ! गौतमी ! श्रेजान्हवी ! श्रीनर्मदे ! ॥७७॥
अशी प्रार्थना करतां क्षणींच,

॥ आर्या ॥
दिधलें द्वितीय काढून कंकण श्रीरोहिदास भक्ताला ।
पदिं नत होतां तो शिरिं गंगेनें वरदहस्त ठेवियला ॥७८॥

॥ अभंग ॥
मजपेक्षा माझ्या शिशूचें अर्चन । केल्या समाधान होतें मज ! ॥
संत माझे शिशू मी पाय तयांची । संत कल्याणाची खाण जाण ॥
संत हे डिंगर पंढरीरायाचे । सोपान स्वर्गींचे संत एक ॥
गणुदास म्हणे जान्हवीनें ऐसा । उपदेश खासा केला जना ॥७९॥

॥ दिंडी ॥
नृपासह ते तेथील पौरवासी । रोहिदासा मग आले पुजायसी ॥
तईं वदला तो त्यांस भक्ताराणा । ‘ पूजनासी मी योग्य ना सुजणा ! ’ ॥

॥ पद ॥ ( हा काय तु० )
पूजन माझें हेंचि बोला ‘ श्रीविठ्ठल ’ वाचें ।
आयु चाललें स्मरण करारे ! पंढरीरायाचें ।
श्रीविठ्ठल, जय विठ्ठल, हरि विठ्ठल, हे विठ्ठल ।
दासगणु म्हणे करो विठोबा रक्षण जगताचें ॥८१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 18, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP