॥ श्लोक ॥
मोठे निर्गुण तें अमंगळ निधी खोडाळ तोंडाळही ।
कापट्यावरी वरि अंगिकारि न गणी मानापमानासही ॥
भक्ता पाहुन आपुल्या खचित जें वेडें पिसें होतसें ।
ऐशा अद्भुत बालका गणु म्हणे वर्णूं तरी मी कसे ? ॥१॥
इतर अवतार आणि कृष्णा अवतार यामध्यें भागवताच्या कल्पनेप्रमाणें एक महत्त्वाचा भेद आहे. अवताराविषयीं “ एते चांशकला: पुंस: कृष्णस्तु भगवान् स्वयं ” इतर अवतार हे परमेश्वराचे अंशावतार असून कृष्णावतार हा पूर्णावतार आहे असें मानलें जातें. आणि तें सत्य आहे. कारण कृष्णावताराच्या कर्तृत्वाचीविविध लीलांची जी व्यापकता आहे ती इतर अवतारांत नाहीं. इतर अवतारांचें चरित्र एकमार्गी आहे.
इतर अवतार आणि कृष्ण अवतार यामध्यें भागवताच्या कल्पनेप्रमाणें एक महत्त्वाचा भेद आहे. अवताराविषयीं “ एतें चांशकला: पुंस: कृष्णास्तु भगवान् स्वयं ” इतर अवतार हे परमेश्व्राचे अंशावतार असून कृष्णावतार हा पूर्णावतार आहे असें मानलें जातें. आणि तें सत्य आहे. कारण कृषणावताराच्या कर्तृत्वाची विविध लीलांची जी व्यापकता आहे ती इतर अवतारांत नाहीं. इतर अवतारांचें चरित्र एकमार्गी आहे. कृष्णावतारामध्यें बरेंवाईत, शुची - अशुची, शुभ - अशुभ, बालीशता आणि गांभीर्य, श्रद्धा आणि बुद्धिवाद, पराक्रम आणि तडजोड, सत्य आणि असत्य या सर्वांची अशी विलक्षण सरमिसळ आहे कीं ज्या दृष्टीकोनांतून पहावें त्याला तें तसेंच वाटावें असें होतें. मात्र या सर्व लीलांचें अधिष्ठान परममंगल परम उदात्त आणि विश्वकल्याणकारी असल्यामुळें परब्रह्माच्या स्वरूपाची संपूर्णता कृष्ण चरित्रामध्यें आविष्कृत होते. असा हा कृष्ण अवतार यदु कुलामध्यें झाला. कंसाच्या कारागृहामध्यें बंदी असलेल्या वसुदेव - देवकी या दांपत्याच्या उदरीं भगवान् अवतरले. अष्टवर्षाची बालमूर्ति देवकी सन्मुख उभी राहिली. निसर्गाने स्वत:चें वैभव प्रगट करून भगवंताचें स्वागत केलें. देवकीनें भगवंतास हृदयासीं धरलें. तिच्या आनंदास पारावार राहिला नाहीं. त्यामुळीं भगवंतांनीं सांत्वन करीत मातापित्यास सांगितलें कीं, माझे बालसुख मी नंद यशोदेस दिलें आहे. यासाठीं मला गोकुळांत पाठवा. मोठ्या कष्टानें पण निरुपायानें नवजात बालकाचें स्वरूप धारण केलेल्या भगवंतास घेऊन वसुदेव गोकुळांत आले. द्वारपालांना भगवंताच्या लीलेमुळें कांहींहि पत्ता लागला नाहीं. नंदाची नुकतीच जन्मलेली मुलगी घेऊन वसुदेव परत येतांच कंस सेवकांना देवकीच्या प्रसूतीची जाणीव झाली आणि त्यांनीं कंसाला ती वार्ता कळविली. कंस धांवत आला आणि मुलगा का मुलगी याचा विचार न करतां आपल्या शत्रूचा नाश कराव्वा या एकाच कल्पनेनें तें नवजात बालक शीलेवर आपटण्यासाठीं त्यानें उचललें तोंच मूल हांतांतून निसटले आणि त्यांतून भगवंताची योगमाया आकाशांत प्रगट झाली. आणि त्या भगवती योगमायेनें कंसांची निर्भर्त्सना करून त्याला सांगितलें कीं, दुष्टा ! मला काय मारतोस ? तुला मारणारा माझ्या आधीं जन्माला आला आहे. तें ऐकतांच कंसानें स्वत:चा जीव वाचविण्यासाठीं एक वर्षाच्या आंतील मुलें मारण्यासाठीं अधिकारी नेमले. त्यांतील पहिली नेमणूक पूतनेनें स्वीकारिली व ती सहज मुलें मारण्याच्या कामासाठीं गोकुळामध्ये आली. नंदघरीं पुत्रोत्सव चालू होता म्हणून ती तेथें आली.
॥ श्लोक ॥
आली पूतना प्राण ते घ्यावयाला ।
म्हणे; तो कुठें बाळ दाखीव माला ॥
जनीं ऐकिलें धन्य तू नंदराणी ।
करी पूर्ण तूं येतुली गे ! शिराणी ॥२॥
पूरनेनें एका श्रीमंत सुंदर स्त्रीचें मायावी रूप धारण केलें होतें.
॥ लावणी ॥
कुटिल कुंटला हरिणाक्षी ती सुहास्य वदना खरी ।
कपटे अभिनव वेषा धरी ॥
द्वयाधराची प्रभा विराजे प्रवाल रागापरी ।
गुलाबी झाक कपोलावरी ॥
कुचद्वय ते गुच्छहि गमती अंबरपट त्यावरी ।
झळाले सौदामिनीच्या परी ॥
( चाल ) सडापातळ बांधा नाजुक शोभे किती ।
लवली नितम्ब भारें रंभोरू ती अती ।
वर वर नखरा केला परंतु हालाहल अंतरी ।
गणु म्हणें जाणत अवघा हरी ॥
तिच्या या रूपामुळें सामान्य जनांची फ़सवणूक झाली असली तरी बलरामानें तिचें हें ढोंग ओळखलें. आणि ते अन्योक्तीनें म्हणाले,
॥ श्लोक ॥
रे रे वंचक गोड गोड वदसी हेतू तडी न्यावया ।
बाह्यत्वें बहु दाविसी परि मनीं आहे क्षमा नी दया ॥
ढोंगाते करूनी अशा फ़सविसी ज्ञानाहिनाला अती ।
ज्ञानी ते परि ढोंग जाणुनि तुझ्या ना कश्यपी लागती ॥
‘ खायी त्याच्या मना खवखवें ’ तसें पूतनेस झालेंच. पण तिकडे दुर्लक्ष करून ती ती सरळ बाळंतघरांत आली. बहीणीचें नातें लावून यशोदेशीं लगट करून तिनें बालक दाखीव असें म्हटलें. यशोदा सहज म्हणालीं कीं, बळ डचकतो आहे. पूतना म्हणाली अग त्याला दृष्ट झाली असेल ? आण त्याला.
॥ ओवी ॥
मी काढितें दृष्ट उत्तम । आणा पंचरंगी रेशीम ।
ते ऐकतां पुरुषोत्तम । हसता झाला निजलीले ॥
रेशीम आणण्याच्या निमित्तानेम तिनें सर्वांना लांब पिटाळलें. आणि आपल्या स्तनामध्यें भरून आणलेलें वीष पाजण्यासाठीं कृष्णास मांडीवर घेतलें.
॥ ओवी ॥ ( जात्यावरील )
घेई ओसंगा पूतना । मांडी घालून नारायण ।
मुखी देई श्रीहरीच्या । विष पुरीत अपुले स्तन ॥
भगवंतापुढें विषाची मात्रा काय ?
॥ श्लोक ॥
चुर चुर चुर ओढी वीष तो देवराणा ।
बघत वरि हराया पूतना - प्राण जाणा ॥
निजबल अपुलेम तें एक ठायी करोनी ।
कवळि द्वय करांनीं पूतना चापपाणी ॥
वीष संपूनहि भगवंताच्या चोखण्यामुळें स्तनास ज्यावेळीं विलक्षण रग लागली. त्यावेळीं कासावीस झालेली पूतना म्हणाली, “ देवा ! मी ओळखिलें पण -
॥ पद ॥
मज सोडी रे ! सोडि अतां घननीळा ।
मम प्राण झाला गोळा ॥
जरि आले मी कपट करून ये ठायां ॥
लागले तुझ्या परि पाया ॥
( चाल ) तव पाय मुक्तिला देती ।
यापरी पुराणें वदती ।
तुज पुरुष पुराणा म्हणती ।
हे आणुनिया ध्यानिं उद्धरीं मजला ।
तू नागर बन्सीवाला ॥८॥
पूतनेच्या छातीवर लाथ मारून कृष्णानें तिला स्वर्गास पाठविलें. परमेश्वराच्या द्वेषानेंहि अशा अनेक राक्षसांचा उद्धार झाला.
॥ आर्या ॥
शकटासुर, दशकंधर, अतिकाया इंद्रजीत दुष्ट जरी ।
मुक्तिपद त्या दिधलें जे भोगी भक्तिच्या बळें शवरी ॥
मृत्यू पावतांच पूतनेचें मूळस्वरूप प्रगट झालें.
॥ ओवी ॥
पूतना पूर्वस्वरूपीं जाण । पसरली तेथें दंडायमान ।
हृदयावरी भगवान । खेळूं लागला तियेच्या ॥९॥
ती किती भयंकर होती,
॥ कटाव ॥
वर्ण सांगळा जणूं कोळसा । दांत मुखीचे नांगर जैसा ।
एकके बोट दुसरा वासा । वेष तियेचा अभिनव ऐसा ।
साठ योजनें लांबी धडाची । नाक बयाचें गुहा नगाची ।
खबर घेतली गोकुळाची । गाळण झाली आयावयांची ।
स्मृती कुणा नच भगवंताची । श्रीकृष्णाची ।
थकली वाणी दासगणूची ॥१०॥
पूतनेचा देहपात होतांच गोकुळास जणू हादरे बसले. सर्व लोक धावून आले. पूतनेचें मढें इतकें उंच होतें कीं, शिड्या लावून लोक त्यावर चढले.
॥ कटिबंध ॥
कोंकरें जशी पर्वती, पहा वेंधती, त्यापरि स्थिती, झालि नि:शंक ।
लावुनी मढ्याला शिड्या चढति वरि लोक ॥
गोकुळी गोप गौळणी, भयाभित मनी, बहुत होउनी, बहाती देवाला ।
हा कसा गोकुळी सांग घातला घाला ॥
श्रीवरा, कृपासागरा, करूनिया त्वरा, कृपा नर कांहीं ।
हे धूड पुराया स्थान महीवर नाहीं ॥
उचलील कोण तरि हिला, हिमाचल भला, गोकुळी आला, दुजा हा वाटे ।
जाया न स्थान संकटीं प्रभूविण कोठें ॥१२॥
कृष्ण खालीं येतांच त्याची ग्रहबाधा दूर होण्यासाठीं,
॥ ओवी ॥
वामपदाचा अंगारा । लाविती बाया शाङर्गधरा ।
देव वर्षती सुमन भारा । गोकुळावरी अति हर्षं ॥१३॥
पूतनेचें शव मोठें अवजड. तें वाहून कसें न्यावें या चिंतेंत पडलेल्या गोपांनीं ईश्वराचा धांवा केला त्यावेळीं,
॥ ओवी ॥
स्तुतीस त्याच्या देऊन मान । ओळंगला नारायण ।
कोपाग्नीनेंच दहन । केलें तिचें तेच ठायीं ॥१४॥
पूतनेचा नाश होतांच आपलें विघ्न गोकुळांत असल्याचें कंसास समजलें व कंसाचें महाबल नांवाच्या एका राक्षसास बालकृष्णाचा नाश करण्यासाठी ज्योतिषी पाहातांच बाया बापड्या त्याच्या भोंवतीं जमा झाल्या आणि त्यानेम त्यास कृष्णाचें टिपण मांडण्यास सांगितलें. कपटी राक्षसानें कुंडली मांडल्याचें करोन सांगू तो तोडगा केला पाहिजे अशी शपथ घेवविली, आणि म्हटले,
॥ पद ॥
अष्टमीस जन्मला म्हणुन हा आहे मुळावर खरा ।
कारटें कशाचें झडकर याला मातिंत नेउन पुरा ॥धृ०॥
पाय पांढरे वर्ण सांवळा वाटोळें हा करी ।
म्हणुन तुला सांगतो यशोदे ! ठेउं नको याला घरीं ॥
करून चोर्या घर घर हा कीं, भ्रष्टवील गौळणी ।
नाश कुळाचा करील वेडे ! हाच आपण होउनी ॥
असें कारटें कुणा न झालें दूर यास गे ! करा ।
दासगणु म्हणे उभा राहिला तो हा पंढरपुरा ॥१५॥
या भाषणानें गौळणी संतापल्या. मामाचा पाहुणा अहेरावाचून जाणें बरें नाहीं. या कल्पनेनें श्रीकृष्णानें त्याची अत्यंत फ़जिती करून जीव नकोसा होईल अशी शिक्षा देवविली.
॥ ओवी ॥
माभळ भटाची लाविली वाट । पूतनेपरेच हरीनें नीट ।
भक्तास पडतां संकट । देव निजांगें ते वारी ॥१६॥
श्रीकृष्ण जसजसें मोठे होवूं लागले तसतसें गोपींचें त्यांचेवरील प्रेम वाढतच होतें. त्या मोठ्या प्रेमानें कृष्णाचें नामस्मरण भजनासारखें करीत. गोकुळांत जणो प्रेमभक्तीचा सुकाळ झाला होता. हे भगवान् शंकरास कळतांच ते कृष्णभेटीसाठीं निघाले. तेव्हां कृष्णांनीं मातेजवळ एक विलक्षण हट्ट करण्यास आरंभ केला.
॥ पद ॥
घेउनी कडेवर कृष्ण उभी वेल्हाळा ।
म्हणे “ रडत सारखा नाहिं लागला डोळा ॥
भलताच हट्ट घेउनी रडे हा बाई ।
म्हणे ‘ चंद्र नभीचा आणुन खेळण्या देई ’
करूं काय यास हा करी अनन्वित चाळा ।’
गणु म्हणे जाहल्या भोंवतिं गौळणी गोळा ॥१७॥
॥ ओवी ॥
गौळणी सांगती युक्ति तेथ । की धाक घाली कृष्णा प्रत ।
बागुलबुवा आणून खचित । तुज त्या देऊन टाकीन मी ॥१८॥
॥ पद ॥
अरे हरि रे ! तूं गुपचुप राही भला ।
आला बागुलबुवा मुला ! ॥
त्यानें गोकुळचीं रडकीं पोरें भरलीं ।
बघ झोळिंत, म्हणुनी फ़ुगली ॥
तुज टाकिन, मी झोळिंत त्याच्या आतां ।
ये बाबा ! याहो नेता ? ॥
असें बोलुन ती कृष्णा ठेवुन गेली ।
द्वाराच्या मागें दडली ॥१९॥
आमंत्रण मिळतांच गोसावी बाबा आले. पण ते गोसावी होते काय ?
॥ श्लोक ॥
तो बाबा नच जोगडा पशुपती साक्षात होता खरा ।
कृष्णा सन्निध येउनी उचलि त्या प्रेरून दोन्ही करां ॥
झालेम ऐक्य क्षणांत त्या उभयतां गोदा नि भागीरथी ।
एके ठाइ मिळालिया निवडण्या चाले न तेथें मती ॥२०॥
श्रीकृष्ण दिसेनासे होतांच गौळनी कासावीस झाल्या आणि त्यांनीं गोसावी बाबास अडविलें. त्याची निर्भर्त्सना केली. शेवटीं त्यांच्या कृष्णभक्तीनें प्रसन्न होऊन शंकरांनीं बाळकृष्ण त्यांच्या स्वाधीन केला. गोकुळांतील प्रेम उत्कटतेनें वाढूं लागलें.
॥ ओवी ॥
गोकुळी आनंद घरोघरीं । कृष्णमय झाल्या गोपनारी ।
कृष्णावांचून दुसरी । गोष्ट मुखी न येतसे ॥२१॥
परमात्मा जरा मोठे होतांच त्यांनीं आपल्या खोडकरपणानें गोकुळ वासियांना जणु त्रस्त करण्याचें ठरविलें. नित्य नवी खोडी होउं लागली. आणि यशोदेस गौळनी आपापली दुर्दशा सांगू लागल्या. एक म्हणाली,
॥ पद ॥
मै छांड चली गोकुलकूं ॥धृ०॥
मै सोती थी अपने पलंगपर ।
बांध गया हरि मुझकूं ॥
धोति छीनके साडि पिनाई !
इन्ने मेरे खावन्दकूं ॥२२॥
दुसरी म्हणाली,
॥ लावणी ॥
किती यशोदे ! या कृष्णाच्या खोड्या सांगू तरी ।
आला ग ! निशिं अवचित आमुच्या घरीं ॥
पतिची दाढी वेणिस माझ्या बांधुन झाला दुरी ।
विझविला दीप ग ! आपुलें करी ॥
घेउन चिमटे रडवुन पोरां नेउन ठेवी दुरी ।
मांजरें सोडित अंगावरी ॥
पाजुन वत्सा रोज दुधाचे वाटोळे हा करी ।
गणु म्हणे नटनर्तक श्रीहरी ॥२३॥
शेवटीं गौलणीनें सांगितलें कीं, यशोदे श्रीकृष्णाच्या स्वभावांत अशी सुधारणा होणार नाहीं. तूं नवस कर.
॥ ओवी ॥
संकष्टीचतुर्थीव्रत । त्वां करावें यशोदे ! सत्य ।
सुबुद्धि देईल एकदंत । या कृष्णाकारणें ॥२४॥
यशोदेनें सोन्याचा गणपती करून सव्वाशें मेहुणे जेवावयास घालण्याचा नवस केला. नैवेद्यास लाडू करावयाचें ठरलें. लाडू खाण्याच्या लालचीनें मुलांनीं श्रीकृष्णास खोड्या थांबविण्यास विनंती केली. कृष्णांनें तें मान्य केलें. गणपती नवसास पावला. या कल्पनेनें नवस फ़ेडण्याची सिद्धता करून यशोदा पूजनास बसली. तोंच कृष्णानें निरांजन मालविलें. यशोदा निरांजन लावून आणण्यास आंत गेली. नैवेद्याचे सर्व लाडू कृष्णानें मुलामध्यें वाटून टाकले. उरलेले आपण खाल्ले, यशोदा परत येते तो लाडू नाहीसे झालेले पाहिलें. तिने कृष्णास विचारलें. येथले लाडू काय झाले ? कृष्ण म्हणाले,
॥ ओवी ॥
शेंदूलाचा धेवल पोट्या । आला उंदलावल बैसुनी ।
त्याने मोदक गतकाविले । दिले धेलीत थेउनी ॥२५॥