मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
गर्वहरण २

गरुड - गर्वहरण २

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


अशी सर्व यादवांची फ़जिती झाली. द्वारकेंत एकच हंशा पिकला.
इकडे बलरामहि नग्न स्थितींतच घराला आले, हें पाहून श्रीकृष्ण म्हणाले -

॥ आर्या ॥
कृष्ण म्हणे हो दादा ! वैराग्यासी असें कसें वरिलें ? ।
वानर कोठें सांगा पहाया मन्मन आतुर ज्या झालें ॥३१॥
त्यावर बलराम म्हणाले,

॥ पद ॥  ( वसंती बघुनी )
तो नच वानर कीं साचा ।
यमसम आम्हां काळ वाटला, बाल अंजनीचा ॥
वानूं प्रताप किति त्याचा ।
अम्हा घेउनि नभीं उडाला सहजगती साचा ।
केला नाशचि गर्वाचा ।
त्यानें माझ्या, समजविं त्यातें ही तुजसी यांचा ॥
ना तरी होइल सौख्याचा ।
नाश समुळ कीं येथें राहतां कुमर वायूचा ॥३२॥

॥ ओवी ॥
अभिमानरहित रेवतीरमण । झाला ऐसें पाहून ।
गरुडास बोले भगवान । वानर धरून आणावें ॥३३॥
नारद म्हणाले,

॥ आर्या ॥
बघ बाहू ते कृष्णा ! गरुडाचे स्फ़ुरण पावते झाले ।
याच सुचिन्हें समजा त्यानें कपिला धरूनि आणिलें ॥३४॥
 
॥ पद ॥  ( हा काय तुमचा )
नि:संशय हा धरून आणिल वाटे वानर तो ।
उत्पादक तूं ब्रह्मांडाचा, परि हा तुज वाहतो ॥
( चाल ) यापरिचें, बल याचें त्या कपिचें, मशकाचें ।
भूषण या नच, गज का कोठें जंबुक - भय वाहतो ? ॥३५॥
या नारदाच्या व्याजस्तुतीनें गरुड फ़ारच फ़ुगला; आणि

॥ झंपा ॥
उडाला नभीं तनय तो वीनतेचा । पुढें तुच्छ त्या वेगही मारुताचा ॥
कपीला म्हणे धरिन या पंजरानें नसे पाड माझ्यापुढें माकडाचा ॥
बली मी महा चंड हे दंड माझे । सदा वाहती भार श्रीकृष्णजीचा ॥३६॥

॥ आर्या ॥
गर्वें ताठुन गेला गरुड तया वानरा धरायासी ।
जेवीं खवळे मूषक जावा धरण्या दरींत केसरिसी ॥३७॥

॥ दिंडी ॥
सहज धरिला कपिवरें पाय त्याचा ।
तया योगें घाबरा गरूडाचा - ॥
प्राण झाला; परि गर्वयुक्त वाणी ।
वदे कपिसी मी “ गरुड मनीं आणी ”॥३८॥

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
ऐसें खगेंद्र वदतां भडकाविली कीं - ।
तोंडामध्यें; विहग ओकत रक्त तें कीं ॥
दंतावली पतन होउनि दीन झाला ।
तो वैनतेय मग बोलत मारुतीला ॥३९॥

॥ पद ॥  ( बल ज्याचें त्या )
मज सोडी कपिवरा ! ।
महाप्रबळ तूं झुरळ असें मी,
म्हणुनि कधिं न बघ,
करणें उचित वध, माझा तुझ खरा ॥
ससा वधुन का लौकिक होतो,
जगांत का, त्या वदे निका, केसरीचा साजिरा ॥४०॥

॥ श्लोक ॥ ( मालिनी )
विहगपति पळाला सोडितां मारुतीनें ।
वळुन वळुन पाहे मागुती त्या भयानें ॥
फ़ड फ़ड निज पक्षा हालवूनी क्रमीला ।
समुळ पथ तयानें, बापुडा दीन झाला ॥४१॥
कृष्णानें गरुडास मारुतीकडे पुन: जाण्यास सांगितले. त्यावर गरुड म्हणाला,

॥ पद ॥  ( शब्द शिलेच्या वरचे )
धाडुं नको मज आतां । त्या आणाया हे श्रीकांता ! ॥धृ०॥
( चाल ) नांव तयाचें घेतां साचें । पावति कंपा संधि तनूचे ।
धडकी भरली चित्ता । वाहुनि आलों मुखिंच्या दंता ॥
( चाल ) पुनरपि जातां प्राणचि जाइल । दर्शन तव हें मज ना होईल ।
सत्त्व न घेई आतां । या गरुडाचें पंढरिनाथा ॥४२॥
“ गरुडा ! तूंच त्याला घेऊन आलें पाहिजे. मी तुला एक युक्ति सांगतों. त्याप्रमाणें तूं कर म्हणजे तुझें काम होईल. त्यास असा निरोप दे,

॥ श्लोक - शार्दूल विक्रीडित ॥
कौसल्यात्मन भंगिता शिवधनू जो जानकीचा पती ॥
ज्यानें मर्दुनि त्राटिका उठविली स्पर्शें अहल्या सती ॥
वाली, रावण, कुंभकर्ण वधिले, जो वानरांचा भला ।
स्वामी दाशरथी सुरासुरपती तो ताम बाही तुला ॥४३॥
कृष्णानें सांगितल्याप्रमाणें गरुड मारुतीला आणण्यासाठीं गेला. कृष्ण परमात्मा बलरामास म्हणाले, “ दादा ! ”

॥ आर्या ॥
कृष्ण म्हणे बलरामा वरणें सौमिंत्र - वेष बरवा ।
मन जरि असेल इच्छित कीं येथुनि वायुतनय तो जावा ॥४४॥
त्यावर बलराम म्हणाले,

॥ पद ॥  ( शिवदर्शन )
सौमित्र पहा मी होतों ॥ध्रु०॥
दशरथनंदन, रघुकुलभूषण । कौसल्यात्मज जानकीजीवन ।
होउनि मंडित करि सिंहासन । पार्श्वभागिं मी राहतों ॥
श्रेष्ठपणा मी सांप्रत त्यजिला । सुखें घालवीं परि त्या कपिला ।
ही तों तव हरि सहजचि लीला । म्हणुनि विनंती करितों ॥४५॥

॥ ओवी ॥
नारदासी म्हणे भगवान । जा, या सत्यभामेसी घेऊन ॥
तिजला जनकतनया करून । हें संकट हरावया ॥४६॥
नारद तें ऐकून सत्यभामेकडे गेला आणि तिला म्हणतो,

( मंदाक्रांता )
व्हावें भामे ! जनकतनया जानकी येधवां तूं ।
श्रीकृष्णाचा त्वरित करणें एवढा पूर्ण हेतू ।
सौंदर्याची खनि त्रिभुवनीं तूजवांचून आन ।
नाहीं नाहीं तुजसि तुळितां ये रती साच ऊन ॥४७॥
सीता होण्याला जास्ती काहीं लागत नाहीं. तूं एवढेंच कर म्हणजे झालें.

॥ श्लोक - अश्वघाटी ॥
निरी अंबराची धरूनी करीं गे करावे वरी काठ ते सत्वरीं ।
करीचा अरी जो तयाच्या परी तन्व शोभे कटी ही तुझी ती बरी
घरी हेमपट्टा, सरी ती गळां, रेख भाळीं चिरी कुंकवाची खरी ।
करीं गोठ तोडे शिरीम कुंदपुष्पा मुकुंदाचिया बैस अंकावरी ॥४८॥
सत्यभामा नारदांनीं सांगितल्याप्रमाणें श्रृंगार करून दरबारांत कृष्णाकडे गेली. तिला पाहून देव म्हणतात,

॥ दिंडी ॥
अशी भामा पाहून शेषशायी ।
म्हणे मुनिला, ही खचित सिता नाहीं ॥
पिसें उसनीं लावून काक आला ।
म्हणून लेखावें काय मयुर त्याला ? ॥४९॥
देव असें म्हणताम्च सत्यभामेला पराकाष्ठेचा राग आला.

॥ श्लोक ॥ ( पृथ्वी )
स्त्रियास अवमानितां भरसभेंत त्या वाटतें ।
बरें मरण त्याहूनी नगशिरीं जसें वज्र तें ॥
कडाडुनि तडित् जशी दडून जाय मेघोदरीं ।
तसा वरून कोप तो गमन सत्यभामा करी ॥५०॥
मध्येंच नारद भेटले; आणि म्हणाले, “ सत्यभामे ! तुझा अपमान झाला होय ? राग मानूं नकोस. माझेंच चुकलें. अग ! सीता होण्यासाठीं असा थाट उपयोगाचा नाहीं. कारण ती वनवासांत होती हे तुला माहिती आहेच ! तेव्हां -

॥ पद ॥  ( अजि अक्रुर हा )
तूं चुकलिस गे थाट कराया पोरी । तुज म्हणुनि हरि दुर सारी ॥
दे टाकुन हीं वस्त्रभूषणें बाई । ले वल्कल तें लवलाही ॥
घे बोरीची काठी करामधें नीट । तसा भालिं भरी मळवट ॥५१॥
त्याप्रमाणें सत्यभामा तयारी करून दरबारांत गेली. तों पहिल्यापेक्षां जास्तीच हंशा पिकला. तें पाहून सत्यभामेला फ़ारच वाईट वाटलें. नारद म्हणाले, “ सीता जर भेटली नाहीं तर सगळ्यांनाच ही स्थिति येणार आहे. तुम्हांला जर खर्‍या सुखाची व कृष्णाच्या सहवासाची इच्छा असेल, तर तुम्ही सगळ्या मिळून आदिमाया जी रुक्मिनी तिला शरण जा. म्हणजे हें संकट टळेल. कारण मागच्या अवतारांत तीच सीता होती. बलरामसुद्धां लक्ष्मण झाला आहे हें लक्षांत ठेव. ”

॥ओवी ॥
अखेरीं मिळुनी अष्टनायिका । रुक्मिणीसी आल्या शरण देखा ।
जनक - तजयेचा वेष निका । घ्यावा तूं हे आदिमाये ! ॥५२॥

॥ पद ॥ -( पोरें नच थोर )
जय देवी जगज्जननी । आदिमाये अशिवमथिनी ।
भक्तवरद नारायणी । तूंच कमलजे ! ॥धृ०॥
निर्गुण जेम ब्रह्म पूर्ण । केलें त्वां तेंच सगुण ।
व्यापियलें हें त्रिभुवन । अपुलिया बळें ॥
तूंच जनक - नृपतिसुता । भीमकाची तूं दुहिता ।
म्हणुनि पुन्हां होय सिता । येउनिया करिल कहर ।
सागरिं बुडवील नगर । दासगणु म्हणे ॥५३॥
त्यावर रुक्मिणी म्हणाले, “ तुम्ही पुढें जा. मी आतांच तुमच्या मागोमाग येतें. तुम्हीं मारुतीची भीति धरूं नका. ”

॥ श्लोक ॥ ( दूतविलंबित )
कमलजा कमला विमला सती ।
गमन तें करितां करिणीप्रती ॥
रुणुझुणू ध्वनि गंभिर नूपरें ।
सुचविण्या करिती हरिला त्वरें ॥५४॥
आईसाहेब दरबारांत आल्या आणि -

॥ आर्या ॥
झाडुन दशाननातें रामांकीं होय अरुढ ती रामा ।
निजकर - वेली वेष्टुनि आलिंगी त्या अनंत सुखधामा ॥५५॥

॥ ओवी ॥
कृष्ण झाला रावणारी । जनकतनया अंकावरीं ।
तयीं यादव अत्यादरीं । जयजय रघुवीर गर्जिन्नले ॥५६॥
इकडे गरुड मारुतीला घेऊन आला. पण मनांत भीति वाटत होती कीं, येथें कृष्ण राम झाला असेल तर बरें. नाहींतर आपली कांहीम आतां धडगत दिसत नाहीं. पुरीं शंभर वर्षे भरलेली दिसत आहेत ! याकरितां युक्तीनें तो मारुतीला म्हणाला, “ मारुतराव ! तुम्ही येथें थोडे थांबा. कारण -

॥ पद ॥ ( नृपममता )
श्रीराम काय तें करितो । हें बघुनी मी बा येतों । कपिवरा ॥
तो अंतर्गृहिं असल्यासी । म्ग भेटी होइल कैसी ? ।
( चाल ) पर पुरुष बायकांमधीम, जाति ना कधीं, आण हें अधीं ।
मनीं गुणवंता । महाबली अंजनी - सूता । कपिवरा ॥५७॥
हें ऐकून मारुतीला राग आला आणि म्हणाला, “ पांखरा ! -

॥ आर्या ॥
शय्येवरीहि असल्या रत माझा राम जनकतनयेसी ।
तरि ना हरकत जाया मज तेथें सत्य सांगतों तुजसी ॥५८॥

॥ श्लोक - वसंत तिलक ॥
जो रावणांतक गमे कपि मारुतीला ।
तोची दिसे यदुपती विनतासुताला ॥
भक्तार्थ यापरि प्रभू बनला अनंत ।
तो हा असे गणु म्हणे स्थित पंढरींत ॥५९॥
मारुतीला सिंहासनावर राम दिसूं लागला व गरुडाला त्याच सिंहासनावर रुक्मिणीपति श्रीकृष्ण दिसूं लागला. दोघांनीं परमेश्वराला साष्टांग नमस्कार केला !

समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : August 12, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP