॥ लावणी ॥ ( पंचरंगी घोडा )
कोठें मी सुबक पुतळी । कोठें बाई मी चाफ़्याची कळी ॥
अंगास त्याचिया वळी असे किं ग पडली ।
लावून ठिगळ तरटाचें शाल नाहीं खुलली ॥
यासाठीं आपण होऊन । जाऊं कशि मी त्या बोलावणं ॥
इभ्रतिचा होईल अपमान, साजणि ग माझा ।
कोठें तो भिकार हलकारा, कुठें बाई राजा ॥४१॥
हें तिचें बोलणें ऐकून आत्याबाई फ़ारच रागावली.
॥ छक्कड ॥
नको बोलुं पुढें । तुझा मनींचा भाग मशिं कळला ॥
पाच, हिरे मोती । शौचकूपाप्रति ।
म्हणुन कां तो योग्य बैठकीला ॥
लाखाभक्त कुठें । पापिणी तूं कुठें ॥
मोरापुढें जणुं डोमकावळा ॥४२॥
॥ दिंडी ॥
असा वाक्शर सुटतांच इंदिरेचा । विवेकाला वरि भाव कन्यकेचा ॥
कांहिं मोहरा देऊन सेवकाला । धाडियेलें, लाखास द्यावयाला ॥४३॥
नोकरानें तें सर्व लाखाभक्तापुढें नेऊन ठेविलें. लाखानें पत्र वाचून पाहिलें. त्याला फ़ार वाईट वाटलें व त्यानीं तात्काल त्याच पत्राच्या पाठीवर लिहिलें कीं,
॥ छक्कड ॥
खाऊन मुलीची भाड कशाला जगुं या जगतांत ।
मला पोशील जगन्नाथ ॥
पोसावें असें वाटल्या तुझ्या मनिं आपुल्या बापाला ।
येइ तूं खेळ करायाला ॥
जोंवरी तनूला मांस तोंवरी खास असे चाळे - ।
चाल्ती जगामध्यें बाळे ॥
दे टाकुन तूं हे छंद फ़ंद वाउगा दिमाख नखरा ।
हरीचा येउन करी आसरा ॥
गणुदास म्हणे, या रितीं कन्यकेप्रती पत्र लिहिलें ।
तसेंच मोहरांस परत केलें ॥४४॥
इकडे जगदंबेची युक्तीं निष्फ़ळ झाल्यावर भगवान् म्हणतात :
॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
अतां कमलजे ! मला सुचलि एक युक्ती बरी ।
निरालसपणें करूं अपण त्याचि सेवा खरी ॥
तुं हो तदिय कन्यका नच अशक्य कांहीं तुला ।
जगास तुझियामुळें जगपणा मुळीं हा आला ॥४५॥
ही परमेश्वराची युक्ति जगदंबेला पटली व जगन्मातेनें त्याप्रमाणें तत्काळ सिद्धताहि केली.
॥ पद ॥ ( तोंवरि तळमळ )
झाली श्री अंबा । कोल्हाटिण जगदंबा ॥ध्रु०॥
वेणी फ़ुलाची सोडुनि बांधी अंबाडा आदिशक्ति ।
पचंग घालुनि लुगडें ल्याली, कंठा पिवळी माती ॥
बाळ्या, बुगड्या, पार काढिल्या डूल दोन्हीं कानांत ।
अंगीं चोळी तंग अतिशय, उरोभाग ठसठशित ॥
गाल गुलाबी, भ्रुकुटि धनुसम, शंक्वाकृति ती मान ।
दासगणु म्हणे सिंहकटी ती अनुपम तें लावण्य ॥४६॥
याप्रमाणें लक्ष्मीनें लाखाच्या मुलीचें सोंग घेतल्यावर -
॥ दिंडी ॥
जगन्नाथेंही त्याचपरी केलें । एक चिंधुक डोक्यास बांधियेलें ॥
भव्व्य छाती, लंगोटी चड्डि ल्याला । कंठिं पेट्या, नी काव शरीराला ॥४७॥
॥ ओवी ॥
उभयतां आले लाखाजवळ । चरणारविंदीं अर्पिलें भाळ ।
वृत्तांत कथिला सकळ । समयास त्या साजेलसा ॥४८॥
मुलीला पहातांच लाखाचा आनंद गगनांत मावेनासा झाला. तिच्या वृत्तींत अंतर पडून पश्चाताप वाटून ती परत आली आहे असें त्याला वाटूं लागले आणि म्हणून तो म्हणतो,
॥ लावणी ॥ ( वसंतीं बघुनि )
आलिस तूं फ़ार बरें झालें ।
जगदीशाची कृपा समज ही चित्त तुझें वळलें ॥
विषयें जें काळें झालें ।
( चाल ) पडतां अनीतिकूपांत । तुजला देउनिया हात ॥
ओढी मागें जगन्नाथ । आतां भय नाहीं उरलें ।
दासगणु म्हणे, हरीच्छेपुढें कवणाचें न चाले ॥४९॥
तिच्या पाठीमागून आलेल्या त्या तरुन कोल्हाट्याला पाहून तूं कोण आहेस ? ’ म्हणून लाखांनीं विचारलें. देव म्हणाले. “ मी कोल्हाटी आहे.
॥ पद ॥ ( नृपममता )
ब्रह्मजी पिता तो माझा । ज्या ठावठिकाणा नाहीं ॥
उपजतांच माता गेली । मम नयना दिसली नाहीं ॥
साक्षांत् आम्ही त्रयबंधु । ना पटत एकमेकाचें ॥
( चाल ) थोरला पर्वताशिरीं, तमोगुण वरी, धाकुटा घरीं ॥
रजोगुण त्याचा । व्यवसाय चित्रें करण्याचा ॥५०॥
लाखा त्यास म्हणतो,
॥ श्लोक ॥ ( वसंततिलका )
सद्वर्तनी अससि हें कळल्यास मातें ।
देईन या तुजप्रति मम कन्यकेतें ।
सद्वर्तना परि दुजी जगतांत नाहीं ।
बा ! संपदा विमल सौखद मोक्षदायी ॥५१॥
याप्रमाणें सर्व जोड जमल्यास पुन्हां खेळ सुरू झाला.
॥ कटाव ॥
गर्दी झाली खेळ पहाया । असंख्य जमले जन त्या ठायां ॥ रीघ मिळेना कुणा जावया । रजे अमीर उमरावांची ॥ आसनें पुढल्या ओळिस साचीं । त्यामागें ती धनिकजनांचीं । विद्वानांचीं । गोरगरीब ते उभे राहिले ॥ बंदोबस्ता शिपाई ठेले । अंतरिक्षिं ते सुरवर आले ॥ पंचवदन, विरुपाक्ष, सदाशिव । शिवगणांचा मेळा अभिनव । अग्नि, वरुण, यम, इंद्रायणिधव । व्यासमुनी, वाल्मीक, पराशर । अत्रि, अंगिरा, अरुंधतीवर ॥ बली, भीष्म, प्रल्हाद, युधिष्ठिर । ऐशापरिचे देव मिळाले । कौतुक हरिचें पाहूं लागलें । जो तो अपुल्या आसनिं डोले ॥ “ वाहवा, वाहवा ” जन ते म्हणती । मोहरा, पुतळ्या, होन फ़ेकिती । कुणी दुशाले, शालू देती । निर्धन जन ते टाळ्या पिटती ॥ दासगणु म्हणे, त्या सोहोळ्याप्रति । वर्णन करण्या उरलि न शक्ति । कुंठित झाली मति माझी ती ॥५२॥
राजवाड्यांत हें वर्तमान कळल्याबरोबर राजाची स्वारी स्वत: तो खेळ पहावयाला एके दिवशीं आली. स्वारी राजवाड्यांत परत आली. संतापानें त्यानें तिला म्हटलें.
॥ झंपा ॥
कपट कुलटे ! तुझें मजसि कळलें ।
व्यर्थ म्यां तुजवरी प्रेम केलें ॥ध्रु०॥
आणुनि वृंदावना शर्करेच्यामधें ।
घोळिलें परि न तें गोड झालें ॥
तूंच खेळांतरीं दिससी रंभेपरी ।
पाह्तां तुज घरीं गाल बसले ॥५३॥
राजा भलतीच शंका घेऊन कांहींतरी बोलतो आहे असें पाहून ती म्हणाली -
॥ श्लोक ॥
मुळिं नच कधिं गेलें खेळ तो मी कराया ।
त्यजुनि प्रियकरा ! हें गेह; बोलें न वायां ॥
निशिंदिनिं तव संगें काळ हा घालवीते ।
विरह तव करी कीं दग्ध माझ्या मनातें ॥५४॥
॥ पद ( भैरवी - त्रिताल ) ॥
सखया बोलुं नको भलतें ॥ध्रु०॥
तूं मधुनाथा ! मी एक भ्रमरी ।
सोडूं कशी मग तूंतें ॥
सजलघनासी सोडुन जाणें ।
रुचेल कसें मयुरातें ॥५५॥
॥ ओवी ॥
एके दिनीं ते दोघेजण । आले खेळ पहायालागुन ।
तों आपल्याच परीच कोल्हाटिण । नाचतां तिनें पाहिली ॥५६॥
जगदंबेला दोरीवर काम करीत आहे असें पाहून लाखाची मुलगी म्हणाली -
॥ पद ॥ ( हा काय )
हाय हाय ही कोण खेळते अभिनव वेल्हाळा ॥
माझ्या वेषें येउनि येथें, का मज भ्रम झाला ॥
( चाल ) ना कन्या, मजविण ती, या अन्या, लावण्या -
बघुनि इयेच्या, खचीत वाटेल लज्जा मदनाला ॥५७॥
खरोखर ! माझ्या बापची योग्यता फ़ार मोठी आहे. प्रत्यक्ष जगज्जननी जगदंबा माझ्या वेषानें माझ्या सन्माननीय पुण्यश्लोक वडिलांची सेवा करण्याकरितां आली आहे. छे ! माझें सगळेंच चुकलें. “ असें म्हणून तिनें राजपुत्राच्या हाताला हिसडा मारून हजारों लोकांच्या समुदयांतून धांवत येऊन आपल्या बापाच्या चरणकमलाला मिठी मारली.
॥ श्लोक ( मंदाक्रांता ) ॥
आली आली तदिय बुधहो ! कन्यका तेथ आली ।
होवोनीया पदिं नत पुढें बोलतीं त्यास झाली ॥
“ घालीं माझे विमल अपुल्या सर्व अन्याय पोटीं ।
गेली होती त्यजुनि तुज ही कारटी कीं करंटी ” ॥५८॥
तिला पाहून लाखाला फ़ारच आश्चर्यं वाटलें.
॥ दिंडी ॥
चकित झाल पाहून कन्यकेसी । कोण मग ही आलि खेळ करायासी ॥
उमग याचा कांहींच त्या पडेना । पाहि दोघिंस टकमका भक्तराणा ॥५९॥
लाखाला ‘ ब्रह्मजी पिता तो माझा ’ या देवाच्या बोलण्याची आठवण झाली. आणि तो आश्चर्यचकित मुद्रेनें त्या दोघांना पाहूं लागला आणि म्हणाला; “ देवा ! आतां मला फ़सवूं नकोस. ”
॥ श्लोक ॥
अगा हलधरानुजा ! प्रभुवरा ! जगन्नाथजी ! ॥
दिसे न बरवा तुला मुळिंच वेष हा त्या त्यजी ॥६०॥
धरीं मुगुट मस्तकीं करिं गदेस नारायणा ॥
आतूर जर हे तुयां त्वरित द्या विभो दर्शना ॥
अशी लाखानें प्रार्थना करतांक्षणींच
॥ पद ॥ ( अंकीं पदांबुजा )
प्रगटला किं तेथें तेव्हां ईश जगन्नाथ ।
धरुन लाखा हृदयीं त्याच्या ठेवि शिरीं हात ॥ध्रु०॥
मन्मथास लाजवि प्रभुची वदनचंद्रकांती ।
शंखचक्र हस्तीं शोभे कंठीं वैजयंती ॥
अमर मुखें लाखाचा तो धन्यवाद गाती ।
दासगणुस तारा देवा ! बुडत भवाब्धींत ॥६१॥
देव प्रगट झाल्यावर सर्वांनीं देवाची मंगल आरती केली.
॥ पद ॥ ( झंपा )
जय जय परेशा, प्रभो लक्ष्मीशा ॥
निवारीं हरी आमुच्या क्लेशपाशा ॥ध्रु०॥
दीननाथा, गोविंदा भो वेदवेद्या ।
ॐकाररूपा, अचिंत्या, अभेद्या ॥
जलीं, काष्ठिं, पाषाणिं, समावलासी ॥
आद्या, विलोकीं कृपेनें गणूसी ॥६२॥