मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीरोहिदास चरित्र २

श्रीरोहिदास चरित्र २

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


हें रोहिदासाचें भाषण ऐकून ब्राह्मण म्हणाला -

॥ झंपा ॥
पुरा तर्कटी तूं मला हें कळालें ।
निघे, जा खलारे ! करीं तोंड काळें ॥
क्रियेवीण वेदांत आला जयासी ।
विलोकूं नये चक्षुनेंहि तयासी ॥२१॥
हें ऐकून रोहिदास म्हणाले -

॥ आर्या ॥
जरि दाविलें तुम्हाला, मी यज्ञोपवित आपुल्या देहीं ।
मग तरि भूदेवा ! ब्रह्म कुठें तें वदाल का नाहीं ? ॥

॥ श्लोक ( पृथ्वी )
करीं धरुनि रापिला, चरचरा उरा कापिलें ।
तनूंत आपुल्या तया धवल जानवें दाविलें ॥
“ अतां तरि कथा मला द्विजवरा तुम्ही ब्रह्म तें
विबूध निज वाणिला कधिं न लाविती बाट तें ! ” ॥२३॥

॥ लावणी ॥
अम्ही कशाचे ब्राह्मण बापा आळ अम्हावर आला ।
कुलासीं कलंक मात्र लाविला ॥
अस्खलित तीं शास्त्रें वाचुनी अर्थ परा सांगतों ।
परी आम्ही जसे तसेच राहतों ॥
( चाल ) अभिमानें ताठतों ताडासम सर्वदा ॥
ना गणू पराचा मना आणितों कदा ॥
दक्षणा - परान्नावरी हेत सर्वदा ॥
तृप्त न राहे मनही केव्हां कुटील पण अंतरीं ।
झकाकी गणु म्हणे वरच्यावरी ॥२४॥

॥ पद ॥ ( मित्रा मम )
अधिकारी तुजसमान कोणि ना दिसे ।
त्या तुजला वद मग मी ज्ञान कथुं कसें ? ॥ध्रु०॥
कांचन तूं, सोनपितळ मी असें खरा ॥
भागीरथि, गोदा तूं ओहोळ मी पुरा ॥
मी आहें गार पुण्यपुरुष तूं हिरा ॥
तूंच भवीं तार मला, शरण मी असें ॥२५॥
तोंच रोहिदास म्हणाले, “ हां हां महाराज ?

॥ आर्या ॥
नमन मला न करावें मनिंचा अभिमान तेवढा सोडा ।
बळकटशा वृषभेंही पंकींचा ओढवे न वा गाडा ॥२६॥

॥ ओवी ॥
द्विजवराचें समाधान । केलें सांगून ब्रह्मज्ञान ।
महात्मा रोहिदास धन्य धन्य । नमन माझें तयातें ॥२७॥

॥ दिंडी ॥
मगर संक्रमनीं स्नान करायाला । लोक जाऊं लागले जान्हवीला ॥
अशा वेळीं पंथांत रोहिदास । बसुन सांधुन दे चरण - संपुटास ॥२८॥

॥ लावणी ॥
लक्ष ना तुझें संसारीं, करिशि हरि हरि,
जोडे सांधून फ़ुकट देसी ।
आम्हा उपवासी मारतोसी ॥
पोट आपुलें हातावर याचा विसर पडूं न द्यावा ।
जोडे सांधून दाम घ्यावा ॥
राबता बैल झालास, कधिं न गेहास, कसा येसी ।
अशानें अन्न कुठुन खाशी ॥
गणुदास म्हणे यापरी, सांगे सुंदरी, रोहिदासा ।
भावाचा लोभ पहा कैसा ॥२९॥

॥ ओवी ॥
पशू अवघे धन्य धन्य । मतलबी ना अमुचेसमान ।
ज्यांनीं आपूलें कातडें पूर्ण । फ़ुकट दिलें जगासी ॥३०॥

॥ लावणी ॥
मी वैदिक शास्त्रीबुवा, मला दे नवा,
करकरित जोडा । रेशीम भरुनि फ़ाकडा ॥
आम्हि माननीय विद्वान, आम्हांसी दान,
दिल्या हरि जोडें । दर्शनें पाय तें झडें ॥
वा बदलाबदली करी, जुने ठेव घरीं,
नवे आम्हांला । देऊन लावि वाटेला ॥
थोरवी जुन्याची अति, घडलि संगति,
पदाची त्याला । द्विज - लाथ भुषण विष्णूला ॥३१॥
ऐकून रोहिदास म्हणाले, “ महाराज ? -

॥ छक्कड ॥
नवे जोडे तुम्हा शिवुन द्याया ।
नाहिं शक्ति उरली माझ्या ठाया ॥ध्रु०॥
रिण काडुन सण, केल्या नारायण ।
जोडे नाहीं कधीं, अवघें वायां ॥
जुनें तेंच द्यावें, चांगलें सांधुन घ्यावें ।
शास्त्रीबुवा पडतों तुमच्या पायां ॥
वर्गणीचा खरा, नाहिं धर्म बरा ।
फ़ल येत नाहीं, तया ठाया ॥
एक्य शिवराइसी, देतों तुम्हापाशीं ।
हा घ्या बया - जान्हवीस वहाया ॥३२॥
हें ऐकून वैदिकबुवा म्हणतात्ल

॥ दिंडी ॥
एक पैशानें तृप्त होय कैसी । जान्हवी ती, हा ठेव तुझ्यापाशीं ॥
हिरे, मोहरा, माणकें, पाच, मोतीं । स्वर्धुनीला अर्पण्या लोक देती ॥
तें ऐकून रोहिदास म्हणाले,

॥ लावणी ॥
महाराज दरिद्री मी हो । मज हिरे, पाच मागतां ।
मुंगीस मेरुमांदरा । उचलण्या कसे सांगतां ॥
( चाल ) शिवराई एवढा करीं, घेऊनि आदरीं । जान्हवीतिरीं ॥
जलीं सोडवा । लई उपकार होतिल बुवा ॥३४॥

॥ आर्या ॥
काकुळती आलेला पाहुन तो रोहिदास चांभार ।
शास्त्रा म्हणे दे पैसा मुर्खपणाला तुझ्या नसे पार ॥३५॥

॥ ओवी ॥
काशीयात्रा अवघी केली । परी पैशाची न राहिली ॥
आठवण शास्त्रीबुवांस भली । विद्यामदें करून ॥३६॥

॥ आर्या ॥
तंबाखूची बटवी सोडून पहातां तयामधें दिसला ।
शिवराई; त्या घेऊन स्मित हास्या करून नदिंत झोकियला ॥३७॥

॥ श्लोक ॥
त्या मूर्ख चांडाळ चांभारड्याचा । पैसा असे हा अधमाधमाचा ॥
तो जान्हवी घें मजला अशाचा । होवो न संपर्क कदापि साचा ॥३८॥

॥ श्लोक ॥
काढूनिया कर जलावरि जान्हवीनें ।
पैशास त्या धरियेलें परमादरानें ॥
आणि म्हणे, “ मदिय बालक रोहिदास ।
द्या हा र्पसाद मम कंकण हें तयास ” ॥३९॥

॥ पद ॥ ( मित्रा मम )
पुण्यवान मी म्हणुन मजसि अर्पिलें ।
जान्हविनें कंकण हें, साच उमगलें ॥
हीन दीन पापि मुळिंच चर्मकार तो ।
केसरिच्या माना नच श्वास पावतो ॥
यज्ञपुरोडाश कुठुन सुकर सेवितो ।
केलें तदिय नाम निमित्तास समजलें ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 18, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP