मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीरामजन्माख्यान

श्रीरामजन्माख्यान

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ आर्या ॥
सनत्कुमारें दिधला जय - विजया शाप रोखिता त्यासी ।
असुर कुळीं जन्मा जा गोब्राह्मण ते छळावयास महिसी ॥१॥
श्री विष्णूच्या दारावर रक्षक असलेल्या जय - विजयांनीं सनत्कुमारांना विष्णूच्या दर्शनासाठी आंत जाऊं दिलें नाहीं. भक्तांना देवदर्शनासाठीं अडविणें हा फ़ार मोठा अपराध त्यांचे हातून घडला म्हणून सनत्कुमारांनीं त्यांना शाप दिला. त्याचा परिणाम म्हणून जय - विजय हे राक्षस कुलांत जन्मास आले.

॥ ओवी ॥
ते हे रावण कुंभकर्ण । मातले महीतलीं पूर्ण ।
देव वंदींत घालून । यजन याग विध्वंसिले ॥२॥

॥ पद ॥
लाधली शिवाच्या वरें संपदा ज्याला ।
परि असुरभाव तो किमपि नसे पालटला ॥धृ०॥
गुरु - सूर्य - शनीच्या करुनि पायर्‍या ज्यांनीं ।
वेदाचि पाडिली पदें असा जो ज्ञानीं ।
( चाल ) पंचांग विधी तो सांगे त्याजला ॥
नापीक तिथें मल्हारी जाहला ।
ध्वावया धुणें नेमीलें सटविला ।
गणुदास म्हणे पार ना तदिय भाग्यला
परि अनीतिरूप केतुनें सूर्य तो गिळिला ॥३॥
रावण पितृवंशाकडून ब्राह्मण, चांगला विद्वान पण सत्ता व ऐश्वर्य प्राप्त होतांच उन्मत्त होऊन सदाचार विसरला. चांगल्या गुणांचे असेंच होतें.

॥ पद ॥
ब्रह्मचर्य तोंवरी जोंवरी स्त्री नच पडली गळा ।
उदार कुणवी जोंवर त्याचा पिकला नाहीं मळा ॥धृ०॥
भाग्यवान कीं तोच जोंवरी आली नसे अवकळा ।
शूरत्वाच्या गोष्टी जोंवरि बत्ति न बंदूकिला ॥१॥
निरिच्छवृत्ति ढिग सोन्याचा जोंवरि नच देखिला ।
वैराव्याच्या गोष्टी जोंवर मिळविती मृत मातिला ।
तृप्त तें जोंवर नाहीं जठराग्नी भडकला ।
दासगणु म्हणे खरें न जें जें त्यांत न कांहीं कळा ॥४॥
राक्षसांच्या त्रासानें त्रस्त होऊन

॥ आर्या ॥
धेनू होउन भूमी विधि मुनिसह क्षीरसागरा गेली ।
लोचनि आणुन पाणी दीन वचें विष्णुची स्तुती केली ॥५॥
विष्णूंनीं आश्वासन दिलें कीं,

॥ पद ॥
मी भार हरिन गे ! तव साचा ।
रघुवंशामधें जन्म घेउनी ।
करिन खचित नि:पात । जाण त्या असुरांचा ॥धृ० ॥
( चाल ) कमला होइल जनक कुमारी ।
शंख चक्र हे येतिल उदरीं ।
त्या कैकयिच्या कीं निर्धारी ।
शेष होइल बंधु लक्ष्मण नांवाचा ॥६॥

॥ ओवी ॥
देव होतील वानर । मारुती भगवान शंकर ।
सेतू बांधून निधीवर । संहार करीन रावणाचा ॥७॥
इकडे अयोध्येमध्यें राजा दशरथ राज्य करीत असतांना एक विलक्षण गोष्ट घडली.

॥ लावणी ॥
घेउन स्कंधिं कावडी पुत्र श्रावण ।
काशीस चालला मायबाप घेउन ॥
झाडि जंगल मोठी दाट वाट उमगना ॥
रात्रिचा समय मातेचा शोष राहिना ॥
( चाल ) श्रावणा ! आम्हाला फ़ार लागली तहान । जल आण ।
देहास सोडुनी पाहे निघाया प्राण । मनिं आण ।
वाटेंत होइल ही काशि जलावांचुन ।
आण पाणी जपुन तूं मुला ! कठिण कानन ॥८॥
आईची इच्छा पूर्ण करण्यासाठीं,
॥ आर्या ॥
वृक्षीं कावड ठेवुन जल आणायास काननीं गेला ।
श्रावण, ढळेल कोठून कीं विधिचें लिखित जें असें भाला ॥९॥
त्याचवेळीं शिकारीसाठीं आलेला दशरथ राजा हा रात्रींच्या वेळीं शिकारीची वाट बघत सरोवराच्या कांठीं एका वृक्षावर धन्युष्य सज्ज करून बसला होता. पाणी आणण्यासाठीं श्रावण तेथेंच आला.

॥ पद ॥
बुड बुड झारीचा श्रवणिं ऐकुनी ।
प्रेरियला दशरथें किं बाण तत्क्षणीं ॥
ज्या बाणें श्रावण तो विव्हल जाहला
राम राम म्हणून भूसी लोळु लागला ॥१०॥

॥ ओवी ॥
ऐकुन ती मनुज वाणी । दशरथ साशंक झाला मनीं ।
स्वस्थानातें सोडुनी । सन्निध त्याच्या पातला ॥११॥
आपला बाण मनुष्याला लागला हें पाहून दशरथास अतिशय वाईट वाटलें. श्रावणाच्या मर्मीं बाण लागला होता. दशरथ जवळ येतांच त्यानें विचारिलें ‘ तूं कोण ? ’ , “ मी राजा दशरथ, माझाच बाण चुकून आपणास लागला. क्षमा करा. ” श्रावण म्हणाला ‘ तुझ्यासारख्या राजर्षीच्या हातून मरण येतें हे एकापरी बरेंच आहे. मला मृत्यूचें दु:ख नाहीं. माझे आईवडील तहानेले आहेत त्यांना येवढें पाणी नेऊन दे, आणि मग त्यांना हकिगत सांग. त्यांना सांभाळण्याचें काम मी तुझ्यावरच सोंपवित आहे. ’ असें म्हणून श्रावणानें शांतपणें प्राण सोडला. दशरथ राजानें पाण्याची झारी घेतली व श्रावणाच्या आईवडिलांच्या हातांत आणून मुकाट्यानें दिली. तेव्हा श्रावणाची आई म्हणाली,

॥ ओवी ॥ ( जात्यावरील )
बाळा ! कां रे अबोला तरी । मनीं धरिलास ये अवसरीं ।
तुज उदरीं मी वाहिले । त्याचि फ़ेड कां ऐशापरी ॥१२॥
तूं बोलल्याशिवाय मी पाणी पिणार नाहीं. दशरथाला आतां सर्व वृत्त सांगणें भागच झालें. तो नम्रपणें म्हणाला,

॥ श्लोक ॥
गेला श्रावण सोडुनी महितला वैकुंठ लोकाप्रती ।
झाला घात तदीय हो ! मम करीं ज्ञानांध मी भूपती ॥
आतां पुत्र तुम्हांस मीच समजा शंका न घ्यावी मनीं ।
जेम कांहीं घडतें न कारण तया कोणी हरीवाचुनी ॥१३॥
परंतु श्रावणाच्या आईवडिलांचें समाधान झालेम नाहीं. त्यांनीं संतापून राजास शाप दिला कीं,

॥ पद ॥
‘ पुत्र पुत्र ’ करुनि नृपा ! आमुच्यापरी ।
त्यजिशिल तूं प्राण खचित जाण भूवरी ॥
वृद्धाची टाकिलीस काठि मोडुनी ।
दावुं नको कृष्णवदन जाय येथुनी ॥
त्यजिले ते प्राण असें त्यास बोलुनी ।
पुत्रशोक वृद्धा नच साहे क्षणभरी ॥१४॥
तिन्ही प्रेतांची व्यवस्था करून राजा दशरथ खिन्नपणें राजधानींत परत आला. कुलगुरु वशिष्ठास हें सर्व समजल्यावर ते राजास  म्हणाले “ एकापरी बरेंच झालें. कसेंही असलें तरीं तुझा निपुत्रिकपणाचा दोष तरी जाईल.  परंतु तुझ्या माथीं निरपराध व्यक्तींच्या हत्त्येचें पापच लागलें आहे. त्यामुळें तुझ्या राज्यावर अवषण पडेल. यासाठीं इंद्राकडून अवर्षण पडणार नाहीं असें वचन घेऊन ये. ’ इतक्यांत राक्षसांशीं करावयाच्या युद्धांत सहाय्य करण्यासाठीं आपण यावें असा इंद्राचा संदेश घेऊन एक देवदूत आला. इंद्रास सहाय्य करण्यासाठीं दशरथ इंद्रलोकीं गेला. बरोबर त्याची लाडकी धाकटी राणी कैकयीहि गेली. युद्धामध्यें रथाचा आंख मोडला असतां कैकयीनें  तो आपल्या हातानें सावरून धरिला. दशरथाचा विजय झाला. कैकयीचें शौर्य व पतिनिष्ठा पाहून दशरथानें तिला दोन वर दिले. इंद्रहि दशरथावर संतुष्ट झाला व त्यानें अवर्षण न पाडण्याचें आश्वासन दिलें. मात्र विभांडकांचा पुत्र ऋष्यशृंग याच्या हातीं पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यास सुचविलें. दशरथ राजधानीस परत आला.

॥ ओवी ॥
इंद्रपुरीचें वर्तमान । सांगे वसिष्ठालागून ।
कीं इंद्रें बोधिलें मजकारण । पुत्रकामेष्टी यज्ञ करी ॥१५॥

॥ आर्या ॥
परी तो याग करावा ऋष्यश्रृंगास वाहुनी मानें ।
शक्रवचन गुरुवर्या ! सांगा हे काय आपणा मानें ॥१६॥
वसिष्ठ यजमानाचें हित पाहणारे उपाध्याय होते. त्यांनीं ऋष्यश्रृंगाच्या हातीं यज्ञ करविण्यास लगेच संमती दिली व ऋष्यश्रृंगास आमंत्रण पाठविण्यास सांगितलें. ऋष्यश्रृंग हे विभांडक ऋषींचे एकुलते एक पुत्र. स्त्री मोहापासून दूर ठेवण्यासाठीं विभांडक ऋषींनीं ऋष्यश्रृंगास स्त्रियाचें दर्शन म्हणून होणार नाहीं, अशा निबिड अरण्यामध्यें ठेविलें होतें. दशरथानें अप्सरांना ऋष्यश्रृंग ऋषीस अयोध्येपर्यंत घेऊन येण्यास सांगितलें. त्याप्रमाणें अप्सरा विभांडक घरीं नाहीं असें पाहून ऋष्यश्रृंगाचे आश्रमांत आल्या.

॥ लावणी ॥
अप्सरा मुनिवर नयनशरा फ़ेंकिती ।
जणुं काय भिल्लिणी हरिण धरूं पाहती ॥
जरि मेघ वर्षला जाउन खडकावरी ।
कोठून हरळ उगवेळ बिजाविण तरि ॥
( चाल ) पुसे श्रृंग ऋषि कोठुन तुम्ही हो आला । मशि बोला ॥
अभ्यास वेदविद्येचा कितिकसा केला । तुम्हि वहिला ॥
उपनिषद्भाग कोणता तुम्ही पाहिला । ते मजला ॥
साकल्य करावें कथन हीच वीनती ।
गुणदास म्हणें भास्करा कळे न रात्र ती ॥१७॥
अप्सरा म्हणाल्या,

॥ ओवी ॥
तारुण्यश्रमी ऋषि मन्मथ । रतीसंग हा वेद सत्य ।
शृंगारोपनिषदासहित । झाला आम्हां पढविता ॥१८॥

॥ श्लोक ॥
गलांड ऋषि आमुची जगप्रसिद्ध नामाभिधा ।
अम्ही निबिड काननीं वसत जाण नाहीं कदा ॥
मृगाजिन बसावया तुजप्रती आम्हां मंच तो ।
उभा तुजपुढें हरी अमुचिया पुढें काम तो ॥१९॥
अप्सरांनीं माती म्हणून कस्तुरी दाखविली आणि फ़लमूलांच्या नांवांनीं लाडू करंज्यासारखीं मिष्टान्नें खावयास दिलीं. कपटनीतीस पूर्णपणें पारखा, अज्ञानी असा पण तपश्चर्येच्या तेजानेम तळपणारा ऋष्यश्रृंग मोहित होऊन अप्सरांचे सह अयोध्येस आला . वसिष्ठादिऋषींनीं व राजा दशरथानें त्याचें प्रेमभरानें स्वागत केलें. दशरथानें आपली मानलेली कन्या शांता ऋष्यश्रृंगास विवाहविधीनें अर्पण केली आणि ऋष्यश्रृं पत्नीसह यज्ञासाठीं बसले. त्यांच्या सामर्थ्यामुळें यज्ञ समाप्त होतांच

॥ दिंडी ॥
वहिन तेथें कुंडांत प्रगट झाला ।
वाहूनियां सन्नीध भूपतीला ॥
करी त्याच्या देवून प्रसादासी ।
केलि आज्ञा द्यावया तो स्त्रियांसी ॥२०॥
अग्नीनें दिलेल्या प्रसादाची अधिकारानुक्रमें कौसल्या, सुमित्रा, कैकयी, अशी विभागणी केल्यामुळें कैकयीस राग आला.

॥ पद ॥
मी राजाची असुन लाडकी श्रेष्ठ भाग सवतिला ।
कसा दिला म्हणुनी कैकयिनेम पिंडचि भिरकाविला ॥
तो घारीनेम सहजगतीनें वरच्यावर झेलिला ।
मग दोन्हीतुनि अर्धा अर्धा देउन लाड पुरविला ॥२१॥
घारीनें नेलेल्या भागापासून पुढें अंजनीच्या उदरीं हनुमंतांचा जन्म झाला. योग्य कालानंतर अग्निनारायणाच्या कृपेनें दशरथाच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. त्यांचे डोहाळे विचारण्यासाठीं दशरथ ज्यावेळीं कौसल्येच्या मंदिरांत आला. त्यावेळीं कौसल्या आवेशानें म्हणाली,

॥ पद ॥
साह्य करुनि वानरांस रावणाप्रती ।
वधिन कुंभकर्ण कुठे दावि निश्चितीं  ॥
त्राटिकेस मर्दुनिया वधिन वालिला ।
निर्दाळुनि असुर मुक्त करिन साधुला ॥२२॥
नेहमीं नम्र व विनयी असलेल्या पत्नीचें तें वागणें पाहून दशरथ आश्चर्यानें थक्क झाला व कौसल्येस बहुधा भूतानें पछाडलें असावें असें त्यास वाटलें. त्याची ही भीति घालविण्यासाठीं महर्षि वसिष्ठ म्हणाले,

॥ पद ॥
भूत नव्हे हे जण नृपारे ! भूत नव्हे जाण ॥धृ०॥
पूर्णब्रह्म परमेश परात्पर । होत तुझे संतान ॥१॥
नारायण अघ - शमन दयानिधी ॥ हीच वाहत तुझि आण ॥२॥२३॥
इतकें म्हणून वसिष्ठांनीं गर्भास नमस्कार केला व स्तुति केली कीं -

॥ श्लोक ॥
आद्यंत तूं मुररिपो ! जगचालका रे ! ।
तूं पूर्णब्रह्म परसत् मधुसूदना रे ॥
अविनाश पद्मयुगुली मज दे विसांवा ।
तुभ्यं नमो भगवते । प्रभु देवदेवा ! ॥२४॥

॥ ओवी ॥
ऐसें म्हणून वसिष्ठऋषि । प्रदक्षिणा घाली कौसल्येसी ।
आनंद झाला भास्करासी । कीं राम कुळीं येतसे ॥२५॥
अशारीतीनें योग्यकाल पूर्ण होतांच,

॥ आर्या ॥
पुनर्वसूस वसंती नवमीला चैत्रशुद्ध पक्षांत ।
माध्याहिनस रवि येतां झाला अवतीर्ण जानकीनाथ ॥२६॥
रामचंद्र अवतीर्ण झाले. जातकर्मादि झाल्यावर सुवासिनींनीं प्रभु रामचंद्राला पाळण्यांत घालुन मंगल गायन आरंभिलें.

॥ पाळणा ॥ ( सारंग - धुमाळी )
बाळा जो जो रे ! रघुराया । भक्तवत्सला ! सदया ॥धृ०॥
त्रिभुवन पाळना तुजसाठीं शशिवदना ।
निद्रा करि बारे ! अघशमना । रामा राजिवनयना ॥१॥
ऋग् यजु साचार पाळण्याचे खूर ।
अठरा पुराणें निर्धार । उपनिषदें विणकर ॥२॥
गादी भावाची त्यावरती । उशि सोज्वल भक्तीची ।
रामा घातिली म्या, मधे साची । शाल वैराग्याची ॥३॥
शांति ही दोरी घेउनिया । मी बघ अपुले करी ।
हालविन तुजलागी रघुराया । दासगणूला तारी ॥४॥२७॥

॥ समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP