मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीनामदेव महाराजांचें चरित्र २

श्रीनामदेव महाराजांचें चरित्र २

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


भाग पहिला
नामदेव म्हणाले,

॥ दिंडी ॥
आई, दगडाचा नाहीं रमाकांत । बोलला तो मजसंगे राउळांत ॥
दूध - भाक्र त्यानेंच भक्षियेली । कथि न कोणा ताकीद अशी केली ॥२१॥
हें ऐकून गोणाईस वाटले,

॥ ओवी ॥ ( जात्यावरील )
गेला दुपारच्या अवसरीं । हा घेऊन नैवेद्याला ॥
जातां येतां कोठेंतरी । भुतबाधा झाली याला ॥२२॥

॥ अभंग ॥
ऐसें बोलुनिया नाम्यासि मारीत । तों आले घरांत दामाशेटी ॥
काय गोणें, वेडे, पोरा कां मारिसी । वाहिलेस त्यासि उदरीं त्वां ॥
तैं गोणाईनें वृत्त कळविलें । पोरासि लागले पिसें साच ॥
दुधभाकरीचा काला नारायणें । भक्षिला हा म्हणे राऊळांत ॥
क्षणिं पंचाक्षरी कोठुनियां आणा । झाला हा दिवाणा काय करूं ॥
गणुदास म्हणे बोलोनिया ऐसें । माय रडतसे धरूनि नामा ॥२३॥

॥ श्लोक ॥ ( शिखरिणी )
म्हणे दामाशेटी मुळिं नच करी शोक सुभगे ।
खरें किंवा खोटें वदत शिशु हा शोधुनि बघे ॥
उद्यां याच्या संगे गमन करुनि दोनप्रहरीं ।
विलोकी नेत्रानें, ग्रहण करि का भाकर हरी ? ॥२४॥

॥ ओवी ॥
गोणाई म्हणे पतीशी । तुम्हीच उद्यां राउळाशीं ॥
जाऊन खर्‍याखोट्याशीं । अवलोकन करावें ॥२५॥

॥ आर्या ॥
दुसरे दिवशीं नामा, मंदिरिं गेला पयास घेऊन ॥
वंदुनि समचरणांतें, पय प्यां हे, म्हणुनि बोलला वचन ॥२६॥

॥ भूपाळी ( घन:श्याम सुंदत. ) ॥
दीनदयाळा परमकृपाळा तमालनीळा हरी ।
दुधभाकरी तूं खाउन आणिला, आळ खोटा मजवरी ॥
माय म्हणाली, विठु दगडाचा, खाईल कशी भाकरी ।
वदून असें रे बहुत मारिलें, वळ बघ पाठीवरी ॥
अजूनही दिसती किती कथावें, दैन्य तुला ते तरी ।
गणु म्हणे आला तेंच पहाया बाप पुन्हां मंदिरीं ॥२७॥

॥ श्लोक ( मालिनी ) ॥
म्हणुनि कमलनाभा, एक वेळीं पुन्हां तूं ।
पय मम करिचें या पी, करी पूर्ण हेतू ॥
जरि नच करिशी हें, आज तूं देवदेवा, ।
तरी मग मजवरति आळ ये वासुदेवा ! ॥२८॥


॥ दिंडी ॥
लबाडीच्या आळास मी न भीतो । परि देवा, हा दोष तुला येतो ॥
प्रस्तराचा म्हणताति लोक तूंते । ऐकतां हें मज फ़ार दु:ख होतें ॥२९॥

॥ पद ( तेथेंच उभी. ) ॥
यासाठीं पंढरिराया । दूध हें झणीं प्यां सदया । श्रीहरी ॥
नातरी । गेंलिया घरीं । नाहीं गत बरी । विचारा करी ॥
माझी भगवंता । पय पी हे रुक्मिणीकांता । झडकरी ॥३०॥

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
म्यां आग्रहा पुनरपी न अशा करावें ।
सांगीतलें सकल तें मजलागीं ठावें ॥
येथूनियां परि तुला न कधीं करीन ॥
मी आग्रहा अजि विभो, मम राख मान ॥३१॥

॥ पद ( शिरिं तिच्या करा धरिलें. ) ॥
शस्त्र मी पुन: समरीं । धरि नच कधीं हें बोल हरी ॥ध्रु०॥
शेवटीं कां, तव गेलें । भगवंता । वद वहिलें । गोष्टहि तशीच दुसरी ॥३२॥

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
अशा परिसतां वचा प्रकटला पुढें श्रीधर ।
जगज्जनक सांवळा कमलनाभ पद्माकर ॥
पया सकल सेवुनी, म्हणत नामयाला हरी ।
पित्यासहित जा अतां मुदित मानसें बा घरीं ॥३३॥

॥ ओवी ॥
ऐसें कौतुक पाहून । दामाशेटी गहिंवरून ॥
गेला राऊळीं येऊन । हृदयीं धरिलें नामदेवा ॥३४॥

॥ दिंडी ॥
धन्य पोरा तूं जगतिं मला केलें । आम्हां शिंप्यांचें कूळ भूषवीलें ॥
तुझ्या अधिकारा कोठवरि वानूं । नामदेवा ! तुज पोर कसें मानूं ? ॥३५॥

॥ कटिबंध ॥
ऐकिलें पुरणांतरीं । सभेभीतरीं । देव नरहरी । प्रगट कीं झाला ।
लांकडामध्यें प्रल्हाद खरा करण्याला ॥ध्रु०॥
त्यापरी तुझी ही कृति । आज निश्चिति झाली श्रीपति ।
तुज्या वचनाला । मानून गाईचें दूध घटाघट प्याला ॥
( चाल ) उपमन्यू ध्रुव प्रल्हादासारखा ।
झालास प्रिय वैकुंठनायका ॥
कलियुगामधें तूं माझ्या बालका ।
तूं नसशि मानवी पोर । कुणि तरी थोर । धरुन अवतार ।
येथ आलासी । गणुदास म्हणे जडजीव उद्धरायासी ॥ध्रु०॥३६॥
असें म्हणून देवाला नमस्कार करून, नामदेवाला घेऊन, दामाशेटी आपल्या घरीं आले आणि बायकोला म्हणाले,

॥ श्लोक (  वसंततिलका ) ॥
गोणे निधान समजे अपुल्या गृहीचें ।
हा नामदेव, कथुं गे तुज काय वाचे ॥
याच्या करें बघितलेम हरि दूध प्याला ।
ताडूं नको पुनरपी कधिं नामयाला ॥३७॥
इतकेम झाल्यावर नामदेवाचे आईबाप नामदेवाला देवाप्रमाणें मानूं लागले. पण आईला असें वाटूं लागलें कीं, या नामदेवाचें लग्न माझ्या देखत व्हावें. भराभर सोयरिका येऊन याला पाहून जातात. पण पुन: कोणी घराला येत नाहीं ! आमच्या शिंप्यांच्या समाजांत हें वेडें मूल आहे, असा समज आहे. तेव्हां ही तक्रार ह्याच्या देवाकडेच नेली पाहिजे, असें म्हणून एक दिवस गोणाबाई दुपारच्या प्रहरीं देवाच्या दर्शनास गेली आणि श्रीपांडुरंगाला म्हणाली,

॥ आर्या ॥
दूध करीचें पीतां ऐसा आवडे बहू नामा ।
तोच खुळ्यासम वागे, प्रापंचाचा मुळिं न त्या प्रेमा ॥३८॥

॥ पद ॥ ( गोदावरिच्या पासुनि अंबे० )
सोयरिका त्या येऊं लागल्या, परि पाहुन नामा ।
कांहीं न वदतां परतुनि जाती, काय करूं रामा ॥
वय तें आठवें यास लागलें, आतां लग्नाची  ।
वेळ आली, परि कन्या द्याया छाति न कवणाची ॥
होत असे कीं, जो तो पाहुन ह्यास म्हणे वेडा ।
म्हणुनि दयाळा कांहीं तरी हो तोड यास काढा ॥३९॥

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
लग्नें तुझीं कितिक जाहलि नंदसूता ।
याचा विचार करुनि बघ कांहीं चित्तां ॥
त्या बा तुझ्या पदनताप्रति एक भार्या ।
कां रे नको वद मला झणि देवराया ! ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP